Bhirkit Movie Review: गिरीश कुलकर्णी, सागर कारंडे, कुशल बद्रिकेचा 'भिरकिट' पाहायचा विचार करताय, मग वाचा हा रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 04:07 PM2022-06-18T16:07:51+5:302022-06-18T16:08:45+5:30

Bhirkit Movie: आजच्या काळातील भरकटलेल्या मानवी विचारांचं 'भिरकीट' या चित्रपटात पहायला मिळतं.

Bhirkit Movie Review: Girish Kulkarni, Sagar Karande, Kushal Badrike's 'Bhirkit' Thinking To Watch, Then Read This Review | Bhirkit Movie Review: गिरीश कुलकर्णी, सागर कारंडे, कुशल बद्रिकेचा 'भिरकिट' पाहायचा विचार करताय, मग वाचा हा रिव्ह्यू

Bhirkit Movie Review: गिरीश कुलकर्णी, सागर कारंडे, कुशल बद्रिकेचा 'भिरकिट' पाहायचा विचार करताय, मग वाचा हा रिव्ह्यू

googlenewsNext

कलाकार : गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, डॅा. याकूब सईद, उषा नाईक, तानाजी गालगुंडे, मोनालिसा बागल, श्रीकांत यादव, कुशल बद्रिके, सागर कारंडे, कैलास वाघमारे, नामदेव मुरकुटे, रोहित चव्हाण, बाळकृष्ण शिंदे, नितीन कदम, लक्ष्मण कांबळे
लेखक-दिग्दर्शक : अनुप जगदाळे
निर्माते : सुरेश ओसवाल, भाग्यवंती ओसवाल
शैली : कॉमेडी ड्रामा
कालावधी : २ तास १० मिनिटे
स्टार - अडीच स्टार
चित्रपट परीक्षण - संजय घावरे

गावातली माणसं आजही माणूसकी विसरलेली नाहीत. तिथल्या लोकांना आजही एखाद्यानं केलेल्या उपकारांची जाणीव आहे. त्यामुळंच गावातील एखादी व्यक्ती गेली की त्याला अंतिम निरोप देण्यासाठी अख्खा गाव गोळा होतो. मात्र त्याच्या घरच्यांना त्याचं किती सोयरसुतक असतं आणि त्यांना कशामध्ये रुची असते याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. सुरुवातीला हसवत ठेवत अनुप जगदाळे यांनी नंतर एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे. आजच्या काळातील भरकटलेल्या मानवी विचारांचं 'भिरकीट' या चित्रपटात पहायला मिळतं.

कथानक : कोणाच्याही मदतीला धावून जाणारा, कोणतंही काम यशस्वीपणे करणारा, सर्वांच्या सुख-दु:खात वाटेकरी असणारा तात्या आणि त्याच्या गावात घडणारी कथा यात आहे. बऱ्याच जणांना मिलमध्ये नोकरीला लावल्यानं गावात प्रचंड मान असणाऱ्या जॉबरचं निधन होतं. सर्व गावकरी मिळून जॉबरला अंतिम निरोप देतात. एकीकडं जॉबरच्या जाण्यामुळं हादरलेली वयोवृद्ध पत्नी पतीच्या निधनाच्या धक्क्यातून सावरलेली नाही, तर दुसरीकडं सुतकात निवडणूकीचा अर्ज भरता येत नसल्यानं गावातील बंटीदादा तेराव्यापूर्वीच सुतक दूर करण्याचा घाट घालतो. पका व मारुती ही जॉबरची मुलं आणि मुलगी वाड्यासहीत जमिनीची विक्री करायला तयार होतात. यावर तात्या कोणता तोडगा काढतो ते चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाची वनलाईन चांगली असली तरी कथेचा जीव फार छोटा असल्यानं पटकथेचा पसारा वाढवण्यात आला आहे. यासाठी बऱ्याच कॅरेक्टर्सचा आधार घेण्यात आला आहे.  हा चित्रपट पाहताना प्रियदर्शन यांच्या चित्रपटांची आठवण होते. त्यांच्या चित्रपटातही एक गाव आणि बरेच गावकरी असतात. यातही बऱ्याच गावकऱ्यांचा वावर आहे. प्रत्येकाचा आपला एक रंग आहे. त्यानुसार तो वागतो. मृत्यूसारख्या गंभीर प्रसंगीही विनोद निर्मिती करत मध्यंतरापूर्वीपर्यंत हा चित्रपट खूप हसवतो आणि मध्यंतरानंतर मात्र गंभीर होत जातो. निधन झालेल्या घरीही वाहिनीचा पदर वारंवार खांद्यावरून घसरलेला दाखवून विनोदनिर्मितीचा केलेला केविलवाणा प्रयत्नही यात आहे आणि प्रसंगानुरूप विनोदनिर्मितीही आहे. वडीलोपार्जित संपत्ती विकण्याच्या विचारधारेला छेद देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गावाकडचं मूळ तोडून शहरात वास्तव्य करण्याच्या विचारांना मूठमाती देण्यात आली आहे. मनोरंजनासाठी लव्ह ट्रॅकही आहे, पण मिस मॅच जोडीमुळं फसगत झाली आहे. गीत-संगीताची बाजू तितकीशी प्रभावी नसली तरी त्यातील सिनेमॅटोग्राफी आणि लोकेशन्स छान आहेत. बोलीभाषेच्या लहेजासोबतच गावातील वातावरण निर्मिती उत्तमप्रकारे करण्यात आली आहे.

अभिनय : गिरीश कुलकर्णीनं पुन्हा एकदा अफलातून अभिनय केला आहे. त्यानं साकारलेला तात्या गावागावांतील सर्व तात्यांचं प्रतिनिधीत्व करणारा आहे. तानाजी गालगुंडेला खूप मोठा ब्रेक मिळाला आहे. त्याची भूमिका नायकासमान वाटणारी असली तरी तो नायक नाही. त्याच्या जोडीला मोनालिसा बागलनं चांगलं काम केलं आहे. श्रीकांत यादवनं संधीसाधू मुलाची भूमिका साकारली आहे. कुशल बद्रिकेच्या रूपातील मारुती काहीसा इमोशनल आहे. कैलास वाघमारेची व्यक्तिरेखा छोटी असली तरी त्यानं ती नेटकेपणानं साकारली आहे. सागर कारंडेनं वठवलेला बंटीदादा थोडा ओव्हर वाटतो. ऋषिकेश जोशीनं दाजीची भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. डॅा. याकूब सईद, उषा नाईक, नामदेव मुरकुटे, रोहित चव्हाण, बाळकृष्ण शिंदे, नितीन कदम, लक्ष्मण कांबळे यांच्यासह सर्वांनीच चांगली साथ दिली आहे.

सकारात्मक बाजू : हा चित्रपट एक चांगला विचार मांडणारा असून, गावाकडचं विकून शहराच्या झगमगत्या दुनियेकडं धावणाऱ्यांचे कान टोचणारा आहे.

नकारात्मक बाजू : यात गीत-संगीतापासून मनोरंजनपर क्षणांचा भरणा असला तरी प्रेक्षकांना एकरूप करून घेण्याची किमया साधण्यात यश आलेलं नाही.

थोडक्यात : थोडा वेळ हसण्याचा आनंद उपभोगायचा असेल तर हा चित्रपट पहायला हरकत नाही, पण फार अपेक्षा ठेवून जाता कामा नये.

Web Title: Bhirkit Movie Review: Girish Kulkarni, Sagar Karande, Kushal Badrike's 'Bhirkit' Thinking To Watch, Then Read This Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.