"बाबा म्हणून...", लेकीच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदेंनी शेअर केला AI फोटो, भावनिक पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:26 IST2025-10-18T13:25:28+5:302025-10-18T13:26:12+5:30
Kedar Shinde And Sana Shinde : प्रसिद्ध मराठी चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांची मुलगी अभिनेत्री सना शिंदेच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

"बाबा म्हणून...", लेकीच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदेंनी शेअर केला AI फोटो, भावनिक पोस्ट व्हायरल
प्रसिद्ध मराठी चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांची मुलगी अभिनेत्री सना शिंदेच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सनाचा एक खास 'एआय' फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये लहान सना तिच्या आईच्या, म्हणजे मोठ्या सनाच्या कडेवर दिसत आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
केदार शिंदे यांनी सनाचा 'एआय' फोटो शेअर करत लिहिले की, "हा फोटो माझ्याकडे आला तेव्हाच ठरवलं की, आजच्या दिवशी हाच पोस्ट करणार. सनाच्या कडेवर छोटी सना. या AI च्या जमान्यात काय काय शक्य होतंय? मी आत्ताच्या सनासोबत जास्त रहातोय. या छोट्या सनाच्या कित्येक गोष्टी माझ्या व्यस्ततेमुळे मी मीस केल्यात. त्याचा पश्चात्ताप नक्कीच होतो. कारण ते दिवस पुन्हा येणार नाहीत."
आपल्या कामातील व्यस्ततेमुळे लेकीच्या लहानपणीचे काही क्षण गमावल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली, पण त्याच वेळी आजचे यश त्यावेळेच्या धावपळीतूनच मिळाले हे देखील त्यांनी नमूद केले. "आपण आयुष्यात खूप काही मिळवतोही. आणि गमावतोही. Part n parcel of life," असे ते म्हणाले. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी लिहिले, "आज तारीख, तिथी सगळं काही जुळून आलेला तुझा वाढदिवस आहे. मी सतत बरोबर आहेच. आणि स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. भय कशाचं? सूर्यफुलासारखी बहर. एक नवीन मार्ग समोर आहे. तुला जे चांगलं वाटो ते कदाचित मिळणारही नाही. पण स्वामी तुझ्यासाठी जे चांगलं आहे, तेच पदरात टाकणार." वडिलांनी मुलीला दिलेले हे आशीर्वाद आणि स्वामी समर्थांवरचा विश्वास दर्शवणारी ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे.
वर्कफ्रंट
केदार शिंदे हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक अत्यंत यशस्वी आणि लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांची ओळख विनोदी आणि कौटुंबिक विषयांवरील उत्कृष्ट कलाकृतींसाठी आहे. 'सही रे सही' आणि 'लोच्या झाला रे' यांसारख्या त्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास रचला आहे. 'श्रीमंत दामोदरपंत' हेही त्यांचे गाजलेले नाटक आहे. 'अगं बाई अरेच्चा!', 'जत्रा', 'यंदा कर्तव्य आहे', 'माझा नवरा तुझी बायको', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'महाराष्ट्र शाहीर' आणि अलीकडेच सुपरहिट ठरलेला 'बाईपण भारी देवा' हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'घडलंय बिघडलंय', 'साहेब, बीबी आणि मी' यांसारख्या मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. सना शिंदे हिने 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.