अनिकेत विश्वासरावने अशोक सराफ या त्याच्या गुरूंना दिली अशी गुरुदक्षिणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:27 PM2018-07-27T12:27:36+5:302018-07-27T12:28:43+5:30

सुपरस्टार अशोक सराफ यांना अनिकेत विश्वासराव गुरूस्थानी मानतो. त्याने सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

aniket vishwasrao gave gurudakshina to ashok saraf | अनिकेत विश्वासरावने अशोक सराफ या त्याच्या गुरूंना दिली अशी गुरुदक्षिणा

अनिकेत विश्वासरावने अशोक सराफ या त्याच्या गुरूंना दिली अशी गुरुदक्षिणा

googlenewsNext

गुरूपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या गुरूची आठवण काढतो. अभिनेता अनिकेत विश्वासरावने सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुपरस्टार अशोक सराफ यांना अनिकेत विश्वासराव गुरूस्थानी मानतो.
अनिकेतने आपल्या लाडक्या अशोकमामांविषयीच्या भावना एका पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत. हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट करताना तो सांगतो, सिनेमा पाहू लागलो, तेव्हापासून त्यांचा चाहता झालो. अभिनय करायला लागलो आणि त्यांना गुरू मानलं. गेल्या १२ वर्षांच्या सहवासात त्यांना कधी सांगितलं नाही, आज पहिल्यांदा माझ्या गुरूला लिहिलेलं हे मनोगत.  
त्याने पत्रात खालील मजकूर लिहिला आहे...

प्रिय अशोकमामा,
आज गुरूपौर्णिमेचा दिवस. या सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्या अगोदरपासूनच तुम्हाला गुरूस्थानी मानणाऱ्या माझ्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. अभिनय असो किंवा विनोदाची अचूक वेळ साधणं असो तुम्ही दोन्हीमध्ये ‘बाप’ आहात. हे तुम्ही वेळोवेळी सर्वांना दाखवून दिलंय. नाटक, टीव्ही आणि सिनेविश्वामध्ये तुम्ही आपल्या दर्जेदार कलाकृतीने ठसा उमटविला आहे.

हे माझं भाग्य आहे की, माझा पहिला सिनेमा ‘लपून छपून’मध्ये मला तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. विनोदासाठी भाषेवर प्रभुत्त्व असणं किती गरजेचं आहे, हे तुम्ही शिकवलंत. विनोदाची अचूक वेळ साधणं, यासाठी गरजेची असलेली वैचारिकता खरंच आमच्या पिढीने तुमच्याकडून शिकण्यासारखी आहे. 

अनेक सिनेमांमधल्या तुमच्या भूमिकांना विनोदाची झालर असायची. पण प्रत्येक भूमिकेची लकब, संवादफेक आणि हावभाव यातल्या वैविध्यावर तुम्ही डोळसपणे काम केल्याने तुमच्या विनोदात एकसूरीपणा कधीच जाणवला नाही, हे आमच्यासारख्या आजच्या अभिनेत्यांना शिकण्यासारखं आहे.

तुमच्यावर नेहमीच रसिकांनी विनोदी अभिनेत्याचे शिक्कामोर्तब केले. पण ‘बहुरूपी’, ‘भुजंग’, ‘कळत-नकळत’,’ अरे संसार संसार’, ‘भस्म’ यांसारख्या सिनेमांमधून तुमच्या अभिनयाची एक वेगळी छटा पाहायला मिळाली. 

मी तुम्हाला अभिनयातले आणि विनोदातले बादशाह मानतो. तुमची सर दुसऱ्या कोणत्याच अभिनेत्याला येणे शक्य नाही. तुमच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याने आपण एकत्र केलेल्या ‘आंधळी कोशींबीर’या दुसऱ्या सिनेमानंतर ‘तुझ्या विनोदाची वेळ चांगली आहे’, ही मला दिलेली दाद कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा मला जास्त आनंद देणारी होती.

गेली ५० वर्ष तुम्ही सातत्याने काम करत आहात, जेव्हा कधी मला काम करताना थकायला होतं. तेव्हा मी स्वत:ला प्रोत्साहन देताना तुम्हाला आठवतो. तुमची काम करण्याची ऊर्जा आणि सातत्य हे माझ्यासाठी नेहमीच आदर्श आहे.


 

Web Title: aniket vishwasrao gave gurudakshina to ashok saraf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.