'...आणि बुद्ध हसणार !' लॉस अँजेलिस मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 09:30 IST2016-04-06T16:30:13+5:302016-04-06T09:30:13+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागातील विद्यार्थ्यांचा लघुपट 'लॉस अँजेलिस' चित्रपट महोत्सवासाठी निवडण्यात ...

'...आणि बुद्ध हसणार !' लॉस अँजेलिस मध्ये
माध्यम व संज्ञापन अभ्यास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सृजनशील माध्यमकर्मी घडविणारा एक विभाग. गेली पंचवीस वर्षे हा विभाग माध्यम क्षेत्रात कार्य करणारे दिग्गज घडवत आहे. या शैक्षणिक वर्षातील म्हणजेच २०१५-१६ च्या तिसऱ्या सत्रात विभागाने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी सामुहिक लघुपट निर्मिती केली. सामाजिक वास्तवास धरून विविध लघुपट तयार झाले त्याच लघुपटांपैकी एक '...आणि बुद्ध हसला !'. विभागाने आखून दिलेल्या स्थळ-वेळेच्या कठोर मर्यादा पाळून अवघ्या चौदा ते सोळा तासांच्या चित्रणामधून तयार झालेला हा लघुपट आहे. आंतरजातीय प्रेमविवाह हा विषय दाखवताना नेहमीच टोकाचे उच्च-नीच किंवा गरीब श्रीमंत प्रेमी युगुल दाखविण्याचा प्रघात जणू चित्रपटसृष्टीत पडला होता. तो प्रघात मोडून काढत दलित असणाऱ्याच दोन जातींत सुद्धा किती उच्च नीचता पाळली जाते याचे चित्रण या लघुपटातून दिग्दर्शक महेशकुमार मुंजाळे यांनी केले आहे.
आजतागायत अहमदनगर च्या प्रतिबिंब राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचा 'परीक्षक पुरस्कार', फ्लिक आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि संकलक पुरस्कार '...आणि बुद्ध हसला!' च्या नावे जमा झाले आहेत. तसेच औरंगाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या क्लॅप राष्ट्रीय लघुपट महोत्सवामध्ये देखील हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला होता. आता विद्यार्थ्यांचा हा लघुपट 'लॉस अँजेलिस' चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी आणि खुला या दोन्ही गटांतील लघुपट स्पर्धेसाठी '..आणि बुद्ध हसला!' ची निवड झाली आहे. लोकमतशी बोलताना दिग्दर्शक महेशकुमार मुंजाळे यांनी त्यांच्या या आनंदाचे श्रेय सर्व सहकाऱ्यांना आणि मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांना दिले आहे.
" लघुपटाचा सारांश: 'गौतम बुद्ध' म्हणजे महार जातीचे प्रतिक अशी समजूत असताना घरात बुद्ध मूर्ती आणून कुटुंबात आणि समाजातील विविध घटकांत घडणारी खळबळ पाहून; समाज किंवा पोटचा मुलगा यापैकी एक काहीतरी निवडण्याची पालकांवर परिस्थिती ओढवून, पालकांच्या निवडीवरून त्यांच्या भूमिकेचा अंदाज घेऊन पुढील पाउले उचलण्याचे ठरवण्याऱ्या, मध्यमवर्गातीलच महार जातीतील प्रज्ञा(२१) या तरुणीशी लग्नाबाबत ठाम असलेल्या हिंदू-वडार जातीच्या सुरज(२३) ची कथा म्हणजे '...आणि बुद्ध हसला!' "