‘शेवटचं सगळं तूच कर...’; आशालता यांची ही इच्छा अलका कुबल यांनी पूर्ण केली!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 06:56 PM2020-09-24T18:56:55+5:302020-09-24T18:58:38+5:30

शेवटच्या क्षणापर्यंत सोबत होत्या अलका कुबल

alka kubal reaction on veteran actress ashalata wabgaonkar | ‘शेवटचं सगळं तूच कर...’; आशालता यांची ही इच्छा अलका कुबल यांनी पूर्ण केली!

‘शेवटचं सगळं तूच कर...’; आशालता यांची ही इच्छा अलका कुबल यांनी पूर्ण केली!

googlenewsNext
ठळक मुद्देआशालता यांनी विविध भाषांतील 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. 

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे गत मंगळवारी कोरोनामुळे निधन झाले. शेवटच्या क्षणी अभिनेत्री अलका कुबल त्यांच्यासोबत होत्या. केवळ सोबतच नाही तर अलका कुबल यांनीच आशालता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केलेत. अलका कुबल यांचे पती समीर आठल्ये यावेळी उपस्थित होते. आपले शेवटचे सगळे काही अलका आणि त्यांचे पती समीर यांनीच करावे, अशी इच्छा आशालता यांनी मृत्यूपूर्वी बोलून दाखवली होती, त्यांची ही अखेरची इच्छा अलका यांनी पूर्ण केली.

माझं शेवटचं सगळं तू करायचं...
अलका कुबल यांनी स्वत: सांगितल्यानुसार, आशालता त्यांच्या कुटुंबावर काहीशा नाराज होत्या. रागावल्या होत्या. त्यामुळे अखेरच्या क्षणी माझं शेवटचं सगळं तू आणि समीरनेच करायचं, असे आशालता यांनी अलका कुबल यांना सांगून ठेवले होते. त्यानुसार अलका व समीर यांनी त्यांच्या इच्छेचा मान राखून सगळे सोपस्कार पार पाडले, कोरोना आणि सरकारी नियमांचे पालन करून साता-यात आशालता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेवटच्या क्षणापर्यंत सोबत होत्या अलका कुबल
आशालता रूग्णालयात असताना अलका कुबल व त्यांचे पती त्यांच्यासोबत होते. रूग्णालयात त्यांना कोरोना वार्डात ठेवले होते. केवळ काचेतून त्यांना बघता येत होते. याचदरम्यान अलका कुबल त्यांना केवळ काचेतून बघत होत्या. पण एक क्षण त्यांना राहावले नाही, मला आत जाऊ द्या, म्हणून त्यांनी डॉक्टरांना विनंती केली. अखेर डॉक्टरांनी त्यांना पीपीई किट घालून आशालता यांना आत जावून भेटण्याची परवानगी दिली आणि अलका आत गेल्या. यावेळी मला भूक लागली, असे आशालता अलका यांना म्हणाल्या. अलका यांनी त्यांना सात आठ घास पुलाव भरवला, पाणी पाजले. ती अलका व आशालता यांची अखेरची भेट ठरली...

अशी झाली कोरोनाची लागण?
आशालता यांनी नाटकांपासून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. 100 हून अधिक मराठी व हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले. गेल्या काही दिवसांपासून ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या शूटींगसाठी त्या साता-यात होत्या. अलका कुबल या मालिकेत मुख्य भूमिकेत असल्याने त्याही आशालता यांच्यासोबत साता-यात होत्या. या मालिकेसाठी मुंबईतून एका डान्स ग्रुप बोलवण्यात आला  होता. त्यातून आई माझी काळुबाई’च्या सेटवर कोरोनाचा फैलाव झाल्याची शक्यता व्यक्त केली गेली होती.  आशालता यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी अचानक आशालता यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.  

‘आई माझी काळुबाई’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या मालिकेत अलका कुबल देवी काळूबाईची भूमिका साकारत आहेत.  आशालता वाबगावकरांची यात महत्त्वाची भूमिका होती.
आशालता यांनी विविध भाषांतील 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. अनेक  मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. ‘अपने पराये’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नव-्याला, वहिनीची माया, माहेरची साडी  हे त्यांचे मराठी गाजलेले चित्रपट होते.  

Web Title: alka kubal reaction on veteran actress ashalata wabgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.