"मदत लागल्यास शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावता, पण.."; ठाकरेंच्या मेळाव्यात तेजस्विनी पंडित काय म्हणाली?
By देवेंद्र जाधव | Updated: July 5, 2025 15:45 IST2025-07-05T15:44:53+5:302025-07-05T15:45:41+5:30
तेजस्विनी पंडितने राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यासाठी हजेरी लावली. त्यावेळी तिने मराठी कलाकार एकत्र का नसतात, यावर बोट ठेवलं आहे

"मदत लागल्यास शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावता, पण.."; ठाकरेंच्या मेळाव्यात तेजस्विनी पंडित काय म्हणाली?
आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा पार पडला. वरळी डोम येथे हा ऐतिहासिक क्षण पाहायला तोबा गर्दी झाली होती. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने जनता आणि राजकीय नेते या सोहळ्याला उपस्थित होते. राज ठाकरेंनी हा मेळावा आयोजित करण्याआधी सर्व मराठी कलाकारांना या मेळाव्याला हजेरी लावण्याचं आवाहन केलं होतं. याशिवाय "कोण कोण येत नाही, हेही बघतोच", असंही सांगितलं होतं. परंतु या मेळाव्याला हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच कलाकार उपस्थित होते. त्यावर तेजस्विनी पंडितने संताप व्यक्त केलाय.
तेजस्विनी पंडितच्या कलाकारांच्या अनुपस्थितीवर ठेवलं बोट
मराठीसाठी मराठी कलाकार एकत्र येत नाहीत. समस्या असल्यास मात्र राज ठाकरेंकडे जातात. असा प्रश्न तेजस्विनी पंडितला विचारला असता ती म्हणाली, "मी माझ्यापुरतं बोलू शकते. मलाही हा प्रश्न पडलाय की, असं का होतंय? अशा पद्धतीने का बघितलं जात नाही. इतर वेळेला मदत लागते तेव्हा शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावला जातो. पण जेव्हा मराठीचा प्रश्न येतो तेव्हा कलाकार का एकत्र येत नाहीत? दुर्दैवी आहे हे. एक कलावंत म्हणून मलाही हा प्रश्न आहे."
"आज मूळातच हे सांगितलं गेलंय की, नो झेंडा फक्त अजेंडा, त्यामुळे मला वाटतं मी इथे येणं हेच त्याचं उत्तर आहे. आम्ही इथे मराठीसाठी आलेलो आहोत. मराठीचा जो विजय झालेला आहे तो साजरा करण्यासाठी आम्ही आलो आहोत. मराठी कलावंतांना काय अपेक्षित आहे माहित नाही. मी माझ्यापुरतं वैयक्तिक बोलू शकतो. कलावंतांना काय अपेक्षित आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. संपूर्ण महाराष्ट्र जे दृश्य बघायला आसुसलेलं होतो ते दृश्य आज आम्हाला मंचावरती दिसणारेय." राज-उद्धव ठाकरेंच्या या विजयी मेळाव्यात तेजस्विनी पंडितसह भरत जाधव, चिन्मयी सुमीत, सिद्धार्थ जाधव हे कलाकार दिसले.