'माझ्या जन्मावेळी आई मरतामरता वाचली'; अभिनेता जितेंद्र जोशी झाला भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 17:59 IST2023-11-07T17:59:19+5:302023-11-07T17:59:53+5:30
जितेंद्रचं त्याच्या आईशी खूप घनिष्ठ नातं आहे. जितेंद्र बऱ्याचदा आपल्या आईविषयी भरभरून बोलत असतो, लिहीत असतो.

'माझ्या जन्मावेळी आई मरतामरात वाचली'; अभिनेता जितेंद्र जोशी झाला भावूक
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता जितेंद्र जोशीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाटक, टीव्ही, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये दमदार अभिनय करत जितेंद्रने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सोशल मीडियावरही तो कायम सक्रिय असतो. कधी तो सामाजिक विषयावर बोलत असतो तर कधी आपले अनुभव शेयर करत असतो. जितेंद्रचं त्याच्या आईशी खूप घनिष्ठ नातं आहे.
जितेंद्र बऱ्याचदा आपल्या आईविषयी भरभरून बोलत असतो, लिहीत असतो. आईवर त्याचा प्रचंड जीव आहे. एवढेच काय तर तो आपल्या नावापुढे आईचं नाव लावतो. जितेंद्र शकुंतला जोशी.. असं नाव तो कायम लिहीत असतो. यावरून त्याचं आईशी असलेलं बाँडिंग दिसून येतं. नुकतेच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता जितेंद्र जोशी आईबद्दल बोलताना भावूक झाला.
नाळमध्ये काम करताना आईचा किती विचार आला, या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला, 'आईचा विचार यायला आई वेगळी तर झाली पाहिजे. मी जो काही आहे तो माझ्या आईमुळेच आहे. आई नसती तर मी कुठे फेकला गेलो असतो माहिती नाही. माझी आई भारी आहे, मैत्रिण आहे माझी. माझ्यापेक्षा फक्त १७ वर्षांनी मोठी आहे'.
'तिचं सोळाव्या वर्षी लग्न झालं आणि १७ व्या वर्षी मी तिला झालो. १६ वर्षांत लग्न करुन देतं का कोणी, पण माझ्या आजी-आजोबांनी करुन दिलं. तिने आई-वडिलांचं ऐकलं आणि लग्न केलं. माझ्या जन्मावेळी आई मरतामरता वाचली होती. डॉक्टरांनी मुलगी जगवायची की बाळ असं विचारलं होतं. तर माझ्या आजोबांनी बाळ नाही मुलगी पाहिजे असं म्हटलं आणि आम्ही दोघे जगलो. जगाविषयीची कटूता बाजूला ठेवून तिनं खूप प्रेम दिलं, खूप मारलेही आणि खूप भांडलोही', या शब्दात तो आईबद्दल व्यक्त झाला.
अलिकडेच जितेंद्रच्या 'गोदावरी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याने फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही काम केले आहे. तो फक्त अभिनेता नाही तर गीतकारही आहे. त्याने 'मुरांबा' सिनेमातील 'अगं ऐक ना' हे गाणं लिहिलं आहे. याशिवाय जत्रा सिनेमातील लोकप्रिय गाणं 'कोंबडी पळाली' हे गाणं जितेंद्रनेच लिहिलं आहे. जितेंद्र आता 'नाळ २' चित्रपटात दिसणार आहे.