नवरात्री उत्सवानिमित्त रसिकांच्या भेटीस येणार हा आगरी रॅप...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 07:01 PM2019-09-28T19:01:55+5:302019-09-28T19:02:21+5:30

‘असं कसं दीदी, तू जिलेबी आवरी सीधी’ हे आगरी रॅप २९ सप्टेंबरला रसिकांच्या भेटीस येणार आहे.

Aagri rap by Sarvesh Tare | नवरात्री उत्सवानिमित्त रसिकांच्या भेटीस येणार हा आगरी रॅप...

नवरात्री उत्सवानिमित्त रसिकांच्या भेटीस येणार हा आगरी रॅप...

googlenewsNext
ठळक मुद्देआगरी भाषेत सर्वेश तरे एक रॅप गाणं घेऊन येत आहेत. गाण्याचं नाव ‘असं कसं दीदी’ असून त्याचे गीत-संगीत सर्वेश तरे यांचे आहे.

सध्या समाज माध्यमांवर ताजा ट्रेंड असणारं वाक्य म्हणजे ‘असं कसं चालेल दीदी’ जसं की ‘दीदी चांगला नवरा मिळावा म्हणून सोळा सोमवारचा उपवास करते पण दीदी उपवासाच्या नावावर पातेलं भरून खिचडी खाते! असं कसं चालेल दीदी? अशा उपहासात्मक विनोदाची व्हाॅट्सॲप, फेसबुक सारख्या समाजमाध्यमात चांगलीच चलती आहे. 

मुळात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर भाषणात टीका करताना ‘ऐसा कैसा चलेगा दीदी’ असे वाक्य वापरले होते तेव्हापासून या ट्रेंडची चलती आहे आणि हेच दीदी पुरता मर्यादित न राहाता दादा, आई ते थेट सरकारची दुट्टपी भूमिका अनेकांनी या ट्रेंडच्या माध्यमातून मांडली आहे.

याच ट्रेंडचा वापर करत थेट आगरी भाषेत सर्वेश तरे एक रॅप गाणं घेऊन येत आहेत. गाण्याचं नाव ‘असं कसं दीदी’ असून त्याचे गीत-संगीत सर्वेश तरे यांचे आहे. प्रस्तुत गाणे खोटा स्त्रीवाद यावर आधारित आहे. अनेक मुली समानतेवर बोलत असतात. परंतु काही गोष्टीत जिथे पुढाकार घ्यायला हवा तिथे माघार घेतात. रंग-रूपावरून एखाद्याचं कर्तृत्व पारखतात. स्वत: भोवती एखादी चौकट उभी करतात किंवा एखाद्या ट्रेंडमध्ये स्वत:ला अडकवून घेतात. या सगळ्या गोष्टी प्रस्तुत गीतातून मांडल्या असल्या तरी या गाण्यात मुलींनी कोणत्याही चौकटीत न अडकता जिजाऊ आणि सावित्रींच्या लेकीप्रमाणे स्वत:ला योग्य पारखायला हवं आणि स्त्रीवादी न बनता स्त्रीसंवादी बनायला हवं असा संदेशही दिला आहे.

या गाण्यात सर्वेश तरे यांच्यासह प्रीती भोईर यांनी अभिनय केला असून याचे छायाचित्रण प्रशांत पाटील यांनी केले आहे. तसेच गाण्याचे संगीत संयोजन भाग्येश पाटील यांनी केले आहे. हे गीत येत्या २९ सप्टेंबर रोजी म्हणजे नवरात्री उत्सवानिमित्त युट्युबवर प्रकाशित होणार असून सर्व प्रमुख संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे. रॅप म्हणजे ठेक्यासह सादर होणारी शुद्ध कविताच असून मनोरंजातून प्रबोधन करण्याचं हे उत्तम साधन होऊ शकतं असे सर्वेश तरे यांनी ‘असं कसं दीदी, तू जिलेबी आवरी सीधी’ या रॅप निमित्त सांगितले.


 

Web Title: Aagri rap by Sarvesh Tare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.