"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 11:54 IST2025-07-29T11:52:36+5:302025-07-29T11:54:04+5:30

मी तुझ्या अडचणी समजून घेतल्या. पण, आता माझ्याही काही अडचणी आहेत...

marathi actor vijay patwardhan post against director mandar devasthali for due payment of he man baware serial | "तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप

"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप

मराठी अभिनेता शशांक केतकरने काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक मंदार देवस्थळीवर (Mandar Devasthali) पैसे थकवल्याप्रकरणी आरोप केले होते. 'हे मन बावरे' (He Man Baware) या मालिकेचं मानधन न मिळाल्याने त्याने आवाज उठवला होता. नंतर अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि शर्मिष्ठा राऊतनेही याविरोधात सोशल मीडियावर भाष्य केलं होतं. प्रकरण सर्वांसमोर आल्याने मंदारने त्यांना मुदत मागवत काही पैसे दिले. आता इतक्या वर्षांनी मालिकेतील अभिनेता विजय पटवर्धनने (Vijay Patwardhan)आपलेही पैसे थकल्याचा खुलासा केला आहे. त्याने सविस्तर पोस्ट लिहित मंदार देवस्थळींवर आरोप केले आहेत.

विजय पटवर्धन लिहितात, "सुखाच्या सरींनी ……हे मन बावरे ! ही लोकप्रिय मालिका बंद होऊन, आता जवळपास पाच ते सहा वर्ष झाली. पण,माझ्या कामाचे पैसे अजूनही मिळाले नाही आहेत. इतकी वर्ष वाट पाहून आता नाईलाजाने मला व्यक्त व्हावे लागत आहे. मी मंदार देवस्थळी, यांच्या टीम वर्क अल्ट्रा क्रिएशन निर्मित हे मन बावरे या मालिकेमधे, नायिकेच्या म्हणजेच मृणाल दुसानीस ,हिच्या भावाची, 'सुनील'ची भूमिका केली. चित्रीकरणाच्या दरम्यान वेळ काळ न बघता, प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जीव तोडून काम केले. पुण्यात असताना तातडीने शुटिंगला बोलावल्यावर  लगेच मुंबईला  गेलो आहे.  कोविड काळातही बंधने शिथिल झाल्यावर मालिकेत काम केलं."

"मालिका संपल्यानंतर या मालिकेचा एक पैसाही मला मिळालेला नाही. पॅकअपच्या वेळेला मला काही रकमेचा जळपास ३ ला लाखाचा चेक देण्यात आला होता. पण तो भरल्यावर बाऊन्स झाला. त्याबद्दल विचारणा केली तेव्हा एका आठवड्यात फोन करतो असं सांगण्यात आलं. पण आजतागायत फोन आला नाही. एक उत्तम दिग्दर्शक आणि मित्र असल्यामुळे माझ्यासकट बऱ्याच जणांनी काही कंप्लेंट केली नाही किंवा कुठेही वाच्यता केली नाही. पण आता पाणी डोक्यावरून जायला लागल्याने  हे लिहावे लागले. बायकोच्या कॅन्सर ट्रीटमेंट साठी पैसे हवे होते त्यासाठी फोन केला, तो पण उचलण्यात आला नाही.

काही कलाकारांना त्यांचे पेमेंट मिळाले पण काहींना नाही मिळाले अनेक वेळेला फोन केला पण उचलला गेला नाही. प्रत्यक्ष भेट झाल्यावरही काही विषयही काढला गेला नाही. आम्ही प्रत्येक वेळी समजून घेतलं, नेहमीच सपोर्ट केला, पण आम्हाला फक्त तारखा आणि आश्वासनं मिळत गेली. मंदार खूप उत्तम दिग्दर्शक आहे. त्याच्याबद्दल नेहमीच आदर आणि प्रेम आहे आणि राहीलही. म्हणूनच इतके दिवस गप्प होतो. पण आता त्याच गोष्टींचा विचार करून खूप मानसिक त्रास होतोय. 

मंदार, हे सगळं इथे शेअर करतोय, कारण इतके दिवस मी तुझ्या अडचणी समजून घेतल्या. पण, आता माझ्याही काही अडचणी आहेत. ज्यातून मार्ग काढणं अवघड जातं आहे. माझ्या अडचणी तू समजून घ्याव्यास. एकदा माझ्या बाजूनेही विचार कर. मला कुणालाही दोष द्यायचा नाहीये. पण इतकी वर्ष वाट पाहूनही न्याय/पैसे न मिळणं कोणासाठीही खुप त्रासदायक आहे. आणि ह्या सगळ्यांत माझं काय चुकलं.?
तू ज्या अडचणीत आहेस अशी वेळ कुणावरही कधीच येऊ नये. लवकरच तू याच्यातून बाहेर पडावास माझ्यासारखे अनेक लोकांचे पैसे अडकले आहेत, ते लवकर मिळावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. मंदार, तू लवकर ह्या सगळ्यांतून बाहेर पडावं आणि पुन्हा पहिल्यासारखं जोमाने आणि जबरदस्त काम करावं हिच सदिच्छा..धन्यवाद..(तुझ्याबद्दलचा आदर म्हणून इतके दिवस कधी बोललो नाही. पण, आज मला व्यक्तं व्हावंसं वाटलं . चूकभूल माफ. मला लाईक्स आणि सहानुभूती मिळावी म्हणून मी हे लिहिलं नाहीये. ज्यांना असा अनुभव आला आहे, त्यांना माझं म्हणणं आणि माझी अडचण कळेल)"

त्याच्या या पोस्टवर शशांक केतरकरनेही कमेंट करत त्याला समर्थन दिलं आहे. मंदार देवस्थळीने निर्माता म्हणून आपली फसवणूक केल्याचं त्याने म्हटलं आहे. 

Web Title: marathi actor vijay patwardhan post against director mandar devasthali for due payment of he man baware serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.