रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये दशरथची भूमिका साकारणार होते अजिंक्य देव, म्हणाले- "मी ऑडिशन दिलेली पण..."
By कोमल खांबे | Updated: November 16, 2025 09:56 IST2025-11-16T09:55:44+5:302025-11-16T09:56:11+5:30
'रामायण' सिनेमातील दशरथ राजाची भूमिका साकारण्यासाठी अजिंक्य देव यांना ऑफर होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत खुलासा केला.

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये दशरथची भूमिका साकारणार होते अजिंक्य देव, म्हणाले- "मी ऑडिशन दिलेली पण..."
नितीश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीराम तर अभिनेत्री साई पल्लवी सीता माताच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमासाठी अजिंक्य देव यांनीही ऑडिशन दिली होती. 'रामायण' सिनेमातील दशरथ राजाची भूमिका साकारण्यासाठी अजिंक्य देव यांना ऑफर होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत खुलासा केला.
"मी 'रामायण' सिनेमासाठी ऑडिशन दिली होती. दशरथ राजाच्या भूमिकेसाठी मी ऑडिशन दिलं होतं. त्यानंतर खूप वेळा गेला. आणि मग दोन महिन्यांनी मला फोन आला. दशरथ राजाची भूमिका साकारण्याबाबत खरं तर मी संभ्रमात होतो. दशरथ राजाची भूमिका हा खूप मोठा रोल होता. त्यात रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत मी दिसणार होतो. पण, त्यांनी मला सांगितलं की दशरथ राजाच्या भूमिकेसाठी तुमची निवड होऊ शकत नाही. पण, ते तुम्हाला एक दुसरा रोल ऑफर करू इच्छितात", असं अजिंक्य देव वरिंदर चावलाच्या पॉडकास्टमध्ये म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितलं, "मग त्यांनी मला विश्वामित्रच्या भूमिकेसाठी विचारलं. विश्वामित्रबद्दल मला एवढी माहिती नव्हती. रामाचा जन्म कशासाठी झालाय हे माहीत असणारी व्यक्ती म्हणजे विश्वामित्र. ते मला म्हणाले की तुम्ही विचार करून सांगा. मी त्यांना लगेच होकार सांगितला. आणि मला आनंद होतोय की त्या भूमिकेसाठी हो म्हणालो". आता 'रामायण'मध्ये अजिंक्य देव विश्वामित्र ही भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर दशरथ राजाच्या भूमिकेत अरुण गोविल दिसणार आहे. २०२६ च्या दिवाळीत रामायण सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.