अनुपम खेर साकारणार मनमोहन सिंग यांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 15:59 IST2017-06-06T12:34:42+5:302023-08-08T15:59:58+5:30
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आधारित चित्रपटात अभिनेता अनुपम खेर मनमोहन सिंग यांची भूमिका निभावणार आहेत

अनुपम खेर साकारणार मनमोहन सिंग यांची भूमिका
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आधारित चित्रपटात अभिनेता अनुपम खेर मनमोहन सिंग यांची भूमिका निभावणार आहेत. हा चित्रपट मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार संजय बारु यांच्या पुस्तकावर आधारित असणार आहे. संजय बारु यांचं पुस्तक "द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंह" 2014 लोकसभा निवडणुकीआधी प्रसिद्ध झालं होतं. या पुस्तकात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळावर टिप्पणी करण्यात आली होती. पुस्तक प्रसिद्द झाल्यानंतर खूप गदारोळ झाला होता.
विशेष म्हणजे या चित्रपटात भाजपाचे कट्टर समर्थक अभिनेता अनुपम खेर मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणार आहेत. अनुपम खेर यांनी ही भूमिका करण्यास तयारी दर्शवल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण अनेकदा अनुपम खेर यांनी अनेकदा तिखटपणे काँग्रेसवर टीका करत भाजपाची बाजू मांडली आहे. विरोधकांनीही याचमुळे अनेकदा अनुपम खेर यांनाही टीकेचं लक्ष्य केलं आहे.
हा चित्रपट डिसेंबर 2018 मध्ये प्रदर्शित होण्याती शक्यता आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक बुधवारी रिलीज करण्यात येणार आहे. सुनील बोहरा यांनी निर्मात्याची जबाबदारी स्विकारली आहे. हा चित्रपट एक राजकीय ड्रामा असेल, तसंच 1980 च्या दशकात आलेल्या "गांधी" चित्रपटापेक्षा भव्य असेल असा दावा त्यांनी केला आहे. चित्रपटाची पटकथा राष्ट्रीय पुरस्कार विजेता हंसल मेहता यांनी लिहिली आहे. या चित्रपटासोबत विजय रत्नाकर गुट्टे पहिल्यांदाच दिग्दर्शनाची जबाबदारी निभावताना दिसतील. मनमोहन सिंग यांच्या भुमिकेसाठी अनुपम खेर यांची निवड झाली असली तरी अद्याप इतर भुमिकांसाठी कोणते अभिनेते असतील हे मात्र नक्की झालेलं नाही.
या प्रोजक्टशी संबंधित लोकांनी सांगितलं आहे की, मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री कार्यालयात नेमकं कामकाज कशाप्रकारे केलं जायचं याकडे लक्ष दिलं जाईल. पत्रकार असलेले संजय बारु 2004 पासून पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार होते. 2008 पर्यंत त्यांनी हे पद सांभाळलं. त्यांच्या पुस्तकाने 2014 मध्ये एक राजकीय वादळ आणलं होतं. ज्यामुळे काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं, आणि भाजपाचा बहुमताने विजय झाला.