सिद्धार्थ जाधव माझा मुलगाच! महेश मांजरेकर म्हणाले- "मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही, पण त्याने..."
By कोमल खांबे | Updated: April 18, 2025 10:50 IST2025-04-18T10:49:57+5:302025-04-18T10:50:21+5:30
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकरांनी सिद्धूचं कौतुक केलं.

सिद्धार्थ जाधव माझा मुलगाच! महेश मांजरेकर म्हणाले- "मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही, पण त्याने..."
लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी अनेक नवोदित कलाकारांना त्यांच्या सिनेमात संधी दिली. सिनेइंडस्ट्रीत सुरुवातीच्या काळात स्ट्रगल करत असताना अभिनेता सिद्धार्थ जाधवला मदत करणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी महेश मांजरेकर एक होते. सिद्धूच्या व्यक्तिमत्वाला आणि त्याच्यातील कलाकाराला बाहेर काढण्यात महेश मांजरेकर यांचा मोठा वाटा आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकरांनी सिद्धूचं कौतुक केलं.
महेश मांजरेकर यांनी लेट्स अप मराठी या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत सिद्धार्थ जाधवबद्दल बोलताना ते म्हणाले, "सिद्धार्थ हा अतिशय हुशार नट आहे. त्याच्यात जे आहे त्यातलं अजून ३० टक्के पण बाहेर आलेलं नाही. त्यामुळे यात माझा फायदा आहे. मी तरीही म्हणतो की तो माझाच मुलगा आहे. कारण, मी त्याच्यासाठी काहीच केलेलं नाही. पण, मी त्याला व्यवस्थित वापरून घेतलं. त्याचेच स्ट्राँग पॉइंट मी वापरुन घेतले. आज तो निर्माता झालाय. त्याच्याच आईवडिलांच्या नावाने संस्था काढतोय. यामध्ये जर मी त्याची मदत करू शकत असेन, तर यापेक्षा अजून काय पाहिजे".
सिद्धार्थ जाधवने नुकतीच आईवडिलांच्या नावाने 'ताराराम' ही त्याची निर्मिती संस्था सुरू केली आहे. या निर्मिती संस्थेद्वारे अॅनिमल या पहिल्या नाटकाची सिद्धार्थ निर्मिती करणार आहे. हे नाटक महेश मांजरेकरांनी लिहिलं असून त्याचं दिग्दर्शनही ते करणार आहेत.