ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 14:08 IST2025-10-20T14:00:57+5:302025-10-20T14:08:55+5:30
Madhuri Dixit : इतर सामान्य लोकांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रिटी देखील दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. पण आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितच्या दिवाळीशी संबंधित एका अशा घटनेबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हालाही धडकी भरेल.

ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
इतर सामान्य लोकांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रिटी देखील दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. पण आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या दिवाळीशी संबंधित एका अशा घटनेबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हालाही धडकी भरेल. बालपणी दिवाळीच्या दिवशी अभिनेत्रीसोबत एक मोठा अपघात झाला होता, याबद्दलचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला होता.
माधुरी दीक्षितने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आजही लोक तिच्या अभिनय आणि नृत्यावर फिदा आहेत. पण या बातमीतून आम्ही तुम्हाला अभिनेत्रीच्या बालपणीच्या एका आठवणीकडे घेऊन जात आहोत. एका मुलाखतीत माधुरीने तिच्या बालपणीचा तो किस्सा आठवत सांगितले होते की, एका दिवाळीला तिच्यासोबत खूप मोठा अपघात झाला होता.
अभिनेत्रीला अनेक दिवस ठेवावे लागलेलं टक्कल
माधुरीने सांगितले होते की, एकदा ती तिच्या मैत्रिणीसोबत दिवाळी साजरी करत असताना, एका मुलाने तिच्या हातात असलेल्या फटाक्याला आग लावली. यामुळे माधुरी दीक्षितसोबत अपघात झाला. फटाक्याची आग थेट अभिनेत्रीच्या केसांना लागली आणि तिचे सर्व केस जळून गेले. माधुरी दीक्षितने हे देखील सांगितले होते की, तिचे केस खूप जास्त जळाल्याने तिला अनेक दिवस टक्कल ठेवावे लागले होते.
"नाहीतर आज मी अभिनेत्री झाले नसते"
अभिनेत्रीने म्हटले होते की, "मी देवाचे आभार मानते की, त्यावेळी माझ्या चेहऱ्याला काहीच झाले नाही. नाहीतर आज मी अभिनेत्री झाले नसते." तो अपघात अभिनेत्रीसाठी एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता. या घटनेनंतर माधुरी दीक्षित आजतागायत दिवाळीच्या दिवशी फटाक्यांपासून दूर राहते. माधुरीसोबतच असे आणखीही काही कलाकार आहेत, जे दिवाळीत फटाक्यांपासून चार हात लांब राहणे पसंत करतात.