'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:05 IST2025-11-19T18:05:17+5:302025-11-19T18:05:57+5:30
ही एक थ्रिलर, सस्पेन्स वेबसीरिज असणार आहे.

'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित लवकरच एका इंटरेस्टिंग प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. नागेश कुकनूर यांच्या 'मिसेस देशपांडे' मध्ये माधुरी मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे ही थ्रिलर सीरिज असून माधुरी यामध्ये सीरियल किलरच्या भूमिकेत आहे. कधीही न पाहिलेल्या अवतारात आता माधुरी बघायला मिळणार आहे. सीरिजचा नुकताच फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. पहिल्याच लूकमधून माधुरीच्या एक्सप्रेशनने लक्ष वेधून घेतलं आहे.
'मिसेस देशपांडे' सीरिजचा २० सेकंदाचा टीझर माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागेश कुकनूर यांनी ती दिग्दर्शित केली आहे. सुरुवातीला माधुरी ग्लॅमरस लूकमध्ये दिसते. पिवळी साडी, मेकअप, दागिने अशा लूकमध्ये ती आरशासमोर बसते आणि सर्व मेकअप काढत असते. मध्येच खाली पाहून अचानक वर पाहते आणि तिचा लूक पूर्णपणे बदलेला असतो. तिच्या चेहऱ्यावर गूढ एक्सप्रेशन्स असतात. नंतर माधुरी इन अँड अॅज 'मिसेस देशपांडे' अशी सीरिजच्या टायटलची घोषणा होते.
ही सीरिज लवकरच जिओ हॉटस्टारवर येणार आहे. सीरिजमध्ये मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही दिसणार आहे. हिंदीतील लोकप्रिय अभिनेता प्रियांशू चॅटर्जीचीही भूमिका असणार आहे. माधुरीला सस्पेन्स सीरिजमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
काही रिपोर्टनुसार,'मिसेस देशपांडे'ची गोष्ट ही फ्रांसीसी सीरिजपासून प्रेरित आहे. यामध्ये पोलिस सायको किलर्सना पकडण्यासाठी एका दुसऱ्या सायको किलरची मदत घेतात जेणेकरुन ते त्यांची मानसिकता समजू शकतील. यामध्ये माधुरी अशीच सायको किलरची भूमिका करणार आहे.