लो बजेट सिनेमांची मोठ्ठी कमाई

By Admin | Updated: October 8, 2015 05:32 IST2015-10-08T05:32:37+5:302015-10-08T05:32:37+5:30

एखादा चित्रपट हिट व्हायचा असेल तर तीन खान, अक्षय कुमार, अजय देवगन आणि हृतिक रोशन हेच हीरो असणे आवश्यक आहे, असे चित्रपट क्षेत्रातील जाणकार सांगत असतात.

Low budget movies make big money | लो बजेट सिनेमांची मोठ्ठी कमाई

लो बजेट सिनेमांची मोठ्ठी कमाई

- दमदार कथेच्या भरवशावर मिळवले यश

एखादा चित्रपट हिट व्हायचा असेल तर तीन खान, अक्षय कुमार, अजय देवगन आणि हृतिक रोशन हेच हीरो असणे आवश्यक आहे, असे चित्रपट क्षेत्रातील जाणकार सांगत असतात. कारण, या सर्वांचे फॅन क्लब इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत की हा चित्रपट आपोआप हिट होऊन जातो आणि उत्पन्न कोटींच्या घरात जाते. परंतु काही चित्रपट असेही आहेत ज्यात ही सर्व स्टार मंडळी नाहीत तरी त्या चित्रपटांनी कोटीची उड्डाणे भरली आहेत. अशा चित्रपटाला जाताना दर्शक कोणतेही लॉजिक घेऊन जात नाहीत. मनोरंजन झाले पाहिजे इतकीच त्यांची माफक अपेक्षा असते. तलवार या चित्रपटाबाबत असेच घडले. तनू वेड्स मनू रिटर्न या चित्रपटानेही नुकताच १५० कोटींचा आकडा पार केला. यावरून एक लक्षात येईल की चांगली कथा असली की ती विकली जाते. अशाच कमी बजेटच्या पण हिट ठरलेल्या चित्रपटांविषयी...

तनू वेड्स मनू रिटर्न : ११ कोटी रुपये खर्चून तयार झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १० कोटींचा व्यवसाय केला. अगदी कमी कालावधीत हा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटाचे सॅटेलाइट प्रदर्शनाचे हक्क ७.५ कोटींना विकले गेले. आनंद एल. राय यांचा हा चित्रपट रसिकांना अगदी नवा आणि ताजा वाटला.

खोसला का घोसला : दिबाकर बॅनर्जीच्या दिग्दर्शनाखाली दिल्लीमधील मध्यमवर्गीय कुटुंब भू-माफियांमुळे कसे भरडले जाते ही कथा घेऊन ‘खोसला का घोसला’ हा चित्रपट बनविण्यात आला. बोमन इराणी, अनुपम खेर, प्रवीण दबास, रणवीर शौरी, विनय पाठक, तारा शर्मा आणि दिवंगत नवीन निश्चल यांना घेऊन हा चित्रपट बनविण्यात आला होता. प्रत्येक भूमिकेला देण्यात आलेल्या योग्य न्यायामुळे अनेकांना हा चित्रपट भावला. तीन कोटींपेक्षा कमी रकमेत बनविण्यात आलेला हा चित्रपट ७.५ कोटींची कमाई करून गेला.

तलवार : मेघना गुलजारचा ‘तलवार’ हा चित्रपट गांधी जयंतीदिवशी शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पेड प्रिव्ह्यूसह तीन कोटी रुपये कमावले. तेही केवळ दोन दिवसांत. असं पहिल्यांदाच घडतंय. कथेवरील पकड आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर कमाल करतोय.

दम लगा के हैशा : वायआरएफ स्टुडिओने आयुष्मान खुराना आणि नवोदित भूमी पडणेकरला घेऊन कमी बजेटमध्ये हा चित्रपट तयार केला. या चित्रपटाला सुरुवातीस बॉक्स आॅफिसवर अपयश आले. मात्र आतापर्यंत या चित्रपटाने सुमारे ३० कोटी रुपये कमावले आहेत. तोंडी झालेली प्रसिद्धी या चित्रपटाला फायदेशीर ठरली.

पान सिंग तोमर : भारतीय सैनिक आणि बंडखोर पान सिंग तोमर यांच्यावर आधारित हा चित्रपट तिग्मांशू धुलिया यांनी बनविला. ‘हासिल’नंतर तिग्मांशू आणि इरफान खान यांनी एकत्र काम केले. हा चित्रपट ८ कोटींमध्ये बनविण्यात आला होता. चित्रपटाने ३८ कोटींची कमाई केली. इरफानसोबत माही गिल, विपीन शर्मा आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांची भूमिका होती.

उडान : प्रसिद्धीच्या झोतात नसलेले कलाकार असल्यानंतर चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा तग धरू शकत नाही, मात्र विक्रमादित्य मोटवानी यांचा ‘उडान’ याला अपवाद ठरला. हा चित्रपट इतका चांगला होता की त्याची २०१० च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘उन सर्टन रिगार्ड’ या कॅटेगरीमध्ये निवड करण्यात आली. मोठ्या बॅनरचे अथवा प्रचंड पैसा खर्च केलेले चित्रपटच यशस्वी ठरतात, हा समज या चित्रपटाने दूर केला.

फंस गए रे ओबामा : राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी या चित्रपटाद्वारे आणखी एका विनोदी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात संजय मिश्रा, रजत कपूर, नेहा धुपिया, मनू ऋषी चढ्ढा आणि अमोल गुप्ते यांनी काम केलंय. ६ कोटी बजेटच्या या चित्रपटाने १९ कोटी रुपये कमावले. हा चित्रपट सुपरहिट घोषित करण्यात आला.

 - sameer.inamdar@lokmat.com

Web Title: Low budget movies make big money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.