प्रेमकथेचा द्वैभाषिक मसाला
By Admin | Updated: July 26, 2015 03:18 IST2015-07-26T03:18:15+5:302015-07-26T03:18:15+5:30
एक नायक असतो आणि एक नायिका असते, त्या दोघांचे प्रेम जुळते, पण एका कोणाच्या तरी घरून या प्रेमाला विरोध होतो, मग या दोन प्रेमी जिवांचा आटापिटा सुरू होतो.

प्रेमकथेचा द्वैभाषिक मसाला
- राज चिंचणकर (मराठी चित्रपट)
एक नायक असतो आणि एक नायिका असते, त्या दोघांचे प्रेम जुळते, पण एका कोणाच्या तरी घरून या प्रेमाला विरोध होतो, मग या दोन प्रेमी जिवांचा आटापिटा सुरू होतो. अशा प्रकारचा तोंडवळा हिंदी चित्रपटांनी पडद्यावर आणला आणि तेवढाच गाजवलासुद्धा. काही मराठी चित्रपटांची वाटचाल याच मार्गावरून होत असताना, हा फॉर्म्युला त्यात डोकावला नाही तर नवलच! अगदी त्यानुसार ‘कॅरी आॅन मराठा’ या चित्रपटात त्याचे प्रतिबिंब उमटलेले दिसते.
फक्त इथे वेगळेपण म्हणून मराठी व कानडी या दोन भाषांचा तडका व त्यात रंगलेल्या प्रेमकथेचा मसाला आहे. कोल्हापुरात स्वत:ची दुधाची डेअरी असलेला रांगडा नायक मार्तंड, दुधाचा टँकर कर्नाटकात घेऊन जात असताना रस्त्यात त्याची भेट कुसुम या कानडी मुलीबरोबर होते आणि तो तिला लिफ्ट देतो. प्रवासाच्या दरम्यान दोघांच्या गप्पा रंगतात आणि मार्तंड तिच्या प्रेमात पडतो. पण त्याचे हे प्रेम एकतर्फी असल्याचे पुढे सूचित होत जाते. त्यात पुन्हा मराठी मुलगा आणि कानडी मुलगी हा प्रकार अधिक तेढ निर्माण करतो. पुढेपुढे मार्तंडच्या आई-वडिलांची रहस्यमय कहाणी आणि कुसुमच्या पालकांच्या कथेचा ट्रॅकही समोर येत जातो. द्वैभाषिक प्रेमप्रकरण, नायक व खलनायकातला संघर्ष आणि भूतकाळातले अनेक संदर्भ जोडत ही गोष्ट साकार होत जाते.
निव्वळ मसालापट
मसालेदार तडका म्हटल्यावर ‘क’च्या बाराखडीतले प्रश्न विचारायचे नसतात. डोके बाजूला ठेवून चित्रपट फक्त एन्जॉय करायचा असतो. अर्थात, त्यांचीही तीच अपेक्षा आहे. या अपेक्षेनुसार चालल्यास चित्रपट मनोरंजन करण्याची खात्री देतो. चित्रपट पडद्यावर दिसतो मस्त; पण पटकथेवर अधिक काम झाले असते, तर हे सादरीकरण अजून दमदार झाले असते. पण या चित्रपटाचा, केवळ दोन घटका टाइमपास करणे उद्देश असेल, तर तो मात्र पूर्ण झाला आहे.
कलाकार आणि भूमिका : चित्रपटात बरीच स्टारकास्ट आहे. उषा नाईक (अक्का), अरुण नलावडे (तात्या), शंतनू मोघे (सुदामा), अमेय कुंभार (बिट्टू), देविका दफ्तरदार (नंदिनी), किशोरी बल्लाळ (अम्मा), ओमकार कुलकर्णी (व्यंकटेश) यांच्यासह इतर सर्वच कलाकारांनी त्यांच्या भूमिकांमध्ये यथायोग्य रंग भरले आहेत. डोक्याला फार ताप नको असेल आणि जस्ट टाइमपास करायचा असेल, तर या मराठ्याला ‘कॅरी आॅन’ म्हणायला हरकत नाही.