लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केला स्वत:चा ब्रँड, आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं नाव
By कोमल खांबे | Updated: August 22, 2025 09:29 IST2025-08-22T09:29:19+5:302025-08-22T09:29:47+5:30
लक्ष्याची लेक स्वानंदी बेर्डेने मात्र सिनेसृष्टीला बाजूला सारत स्वत:ची वेगळी वाट निवडली आहे. स्वानंदीने स्वत:चा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे. लक्ष्याची लेक आता बिजनेसवुमन बनली आहे.

लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केला स्वत:चा ब्रँड, आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं नाव
लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सिनेसृष्टीतील अजरामर नाव आहे. अभिनयाचं टॅलेंट आणि विनोदबुद्धीच्या जोरावर लाडक्या लक्ष्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय बेर्डेनेही कलाविश्वात पदार्पण केलं. पण त्याची लेक स्वानंदी बेर्डेने मात्र सिनेसृष्टीला बाजूला सारत स्वत:ची वेगळी वाट निवडली आहे. स्वानंदीने स्वत:चा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे. लक्ष्याची लेक आता बिजनेसवुमन बनली आहे.
स्वानंदीने तिच्या ज्वेलरी ब्रँडचं नावही खूप खास ठेवलं आहे. 'कांतप्रिया' असं तिच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव आहे. वडील लक्षमीकांत(कांत) आणि आई प्रिया यांच्या नावावरून स्वानंदीने तिच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव ठेवलं आहे. "काही स्वप्न ही फक्त आपण पाहत नाही तर त्यांचा जन्मच प्रेमापासून झालेला असतो. मी आज माझं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकत आहे. कांतप्रिया हे माझ्यासाठी एका ब्रँडपेक्षा खूप काही आहे. माझ्या हृदयाचा हा एक तुकडा आहे. कारण याची निर्मितीच माझे वडील(कांत) आणि आई (प्रिया) यांच्या नावापासून झाली आहे. त्या दोन व्यक्ती ज्यांनी मला घडवलं", असं स्वानंदीने म्हटलं आहे.
"दागिन्यांच्या व्यवसायातील माझा हा प्रवास म्हणजे त्यांचं प्रेम आणि वारसा जपण्यासाठी निवडलेला एक मार्ग आहे. कांतप्रिया हा केवळ एक ब्रँड नाही तर तो खड्यांचा उत्सव आहे. भारताची परंपरा आणि आधुनिक अभिजाततेचा संगम जो लग्न, उत्सव आणि प्रत्येक क्षण साजरा करण्यासाठी बनलेला आहे. माझ्या या स्वप्नाचा, प्रवासाचा भाग होण्यासाठी कांतप्रियामध्ये तुमचं स्वागत करते", अशी पोस्ट स्वानंदीने लिहिली आहे. तिच्या या नव्या प्रवासासाठी चाहते आणि सेलिब्रिटींनी स्वानंदीला शुभेच्छा दिल्या आहेत.