किशोर कुमार यांचं 100 वर्ष जुनं घर पाडण्यासाठी नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2017 13:52 IST2017-07-14T13:52:54+5:302017-07-14T13:52:54+5:30
हिंदी चित्रपटसृष्टीतील विख्यात गायक, नट, हरहुन्नरी कलाकार किशोर कुमार यांचं घर पाडण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे

किशोर कुमार यांचं 100 वर्ष जुनं घर पाडण्यासाठी नोटीस
>ऑनलाइन लोकमत
खंडवा (मध्य प्रदेश), दि. 14 - हिंदी चित्रपटसृष्टीतील विख्यात गायक, नट, हरहुन्नरी कलाकार किशोर कुमार यांचं घर पाडण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. खंडवा महापालिकेकडून एके काळी किशोर कुमार यांचं वास्तव्य असलेल्या या घराला पाडण्याची नोटीस आली आहे. किशोर कुमार यांचं हे घर जवळपास 100 वर्ष जुनं आहे.
महापालिकेने किशोर कुमार यांच्या घराबाहेर ही नोटीस चिकटवली आहे. कधी काळी या घराच्या अंगणात किशोर कुमार यांनी आपले भाऊ अशोक आणि अनूपसोबत हसत खेळत आपलं बालपण घालवलं होतं.
घराबाहेर लावण्यता आलेल्या महापालिकेच्या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे की, "घर एकदम खराब परिस्थितीत असून दुरावस्था झाली आहे. हे घर कोणत्याही वेळी कोसळू शकतं. घर कोसळल्यास इतरांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घरात राहणं सुरक्षित नसून, लवकरात लवकर खाली करणं गरजेचं आहे". दिलेल्या वेळेत घर खाली केलं न गेल्यास पाडण्यात येईल असंही महापालिकेने स्पष्ट केलं आहे.
किशोक कुमार यांचं बालपण
किशोर कुमार यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ साली मध्य प्रदेशातील खंडवा या गावी झाला. त्यांचे नाव आभास कुमार ठेवण्यात आले. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे वकील होते, आई गौरीदेवी या एका श्रीमंत घराण्यांतील होत्या. किशोर कुमार आपल्या भावंडात सर्वात लहान होते. इतर भावंडे अशोक कुमार, सती देवी आणि अनूप कुमार.
बॉलीवुडमधील सुरुवातीचा काळ
अशोक कुमार बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध झाल्यावर, गांगुली परिवारांचे मुंबई दौरे वाढत गेले. आभास कुमार यांनी याच वेळी आपले नाव किशोर कुमार ठेवून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. बोंम्बे टॉकीज मध्ये ते समूहगायक म्हणून काम करीत. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट "शिकारी" (इ.स. १९४६) होता. या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोर कुमार यांना "जिद्दी" (इ.स. १९४६) या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. हे गाणे होते "मरने की दुआएं क्यों मांगू". यानंतर किशोर कुमार यांना बरेच गाण्याच्या संधी मिळाल्या. इ.स. १९४९ साली त्यांनी मुंबईत राहण्याचे निश्चित केले. बाँम्बे टॉकीजच्या व फनी मजूमदार दिग्दर्शित "आंदोलन" (इ.स. १९५१) या चित्रपटात त्यांनी हीरोचे काम केले. आपल्या भावाच्या मदतीने किशोर कुमार यांना अभिनेता म्हणून बरीच कामे मिळत असली तरी त्यांना एक यशस्वी गायक व्ह्यावयाचे होते. त्यांना अभिनयात विशेष रूची नव्हती पण अशोक कुमार यांना घाबरत असल्यामुळे ते अभिनय करीत राहिले.
किशोर कुमार संगीत शिकलेले नव्हते. सुरुवातीला ते के.एल्. सैगल यांची नक्कल करीत. सुप्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोर कुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली.
अभिनेता म्हणून किशोर कुमार यांनी बऱ्याच नामंकित दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. बिमल रॉय बरोबर "नौकरी" (इ.स. १९५४) आणि हृषीकेश मुख़र्जींबरोबर "मुसाफिर" (इ.स. १९५७). सलिल चौधरी, "नौकरी"चे संगीतकार किशोर कुमार यांना त्यांचे संगीतात शिक्षण नाही म्हणून गाण्याची संधी देऊ इच्छीत नव्हते, पण किशोर चे गाणे ऐकून, त्यांनी हेमंत कुमार च्याऐवजी किशोर कुमार यांना "छोटा सा घर होगा" हे गाणे गावयास दिले.
शेवटची वर्षे
किशोर कुमार यांनी निर्माता दिग्दर्शक म्हणून काही चित्रपट, १९७० च्या शेवटी व १९८० च्या सुरवातीला केले, उदा. बढती का नाम दाढी (१९७८), जिन्दगी (१९८१) व दूर वादियों में कहीँ (१९८२). परन्तु बॉक्स ऑफिस वर यातील कोणताही चित्रपट झळकला नाही. किशोर कुमार यांचा अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट "दूर वादियों में कहीँ" होता.
राहुल देव बर्मन व राजेश रोशन च्या पाठींब्याने अमित कुमार १९८० च्या दशकात आघाडीचे पार्श्वगायक बनले. याच वेळी किशोर कुमार यांनी अनिल कपू च्या पहिल्या चित्रपटासाठी (वोह सात दिन) व तसेच त्याच्या पहिल्या सुपरहिट चित्रपटासाठी (मिस्टर. इंडिया) गायिले. तसेच त्यांनी आर. डी. बर्मन साठी सागर ची प्रसिद्ध गाणी गायली. याच कालावधीत त्यांनी रीटायर होऊन खंडवाला जाण्याचे ठरवले. परंतु ऑक्टोबर १३, १९८७ साली हृदय विकाराने त्यांचे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह अंत्यविधीसाठी खंडव्याला नेण्यात आला.