बॉक्स आॅफिसवर ‘ख्वाडा’ची घोडदौड

By Admin | Updated: October 24, 2015 01:58 IST2015-10-24T01:58:38+5:302015-10-24T01:58:38+5:30

कुस्तीच्या फडातील घुमणारे आवाज, लाल माती आणि डीजेचा धुमाकूळ घेऊन महाराष्ट्राच्या ग्रामीण लोकेशन्सवर शूट केलेला अस्सल मराठी मातीतील रांगडा चित्रपट ‘ख्वाडा’ दसऱ्याच्या

'Khwada' thriller at Box Office | बॉक्स आॅफिसवर ‘ख्वाडा’ची घोडदौड

बॉक्स आॅफिसवर ‘ख्वाडा’ची घोडदौड

कुस्तीच्या फडातील घुमणारे आवाज, लाल माती आणि डीजेचा धुमाकूळ घेऊन महाराष्ट्राच्या ग्रामीण लोकेशन्सवर शूट केलेला अस्सल मराठी मातीतील रांगडा चित्रपट ‘ख्वाडा’ दसऱ्याच्या मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ११२ चित्रपटगृहांमध्ये सुमारे ९२४ शोजसह दाखल झाला. सर्वच शोजना दणक्यात ओपनिंग मिळाले असून, शुक्रवार, शनिवार आणि रविवारचे शो हाऊसफुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. दर शुक्रवारी प्रदर्शित होण्याच्या परंपरेला छेद, एक दिवस आधी, गुरुवारी दसऱ्याचे औचित्य साधून या मराठी चित्रपटाने खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन केले आहे.
पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कलादिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी ‘ख्वाडा’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज केला. तो मुंबईत २५ चित्रपटगृहांतील १८९ शोजसह दाखल होत आहे. ठाण्यामध्ये २६ चित्रपटगृहांमध्ये १६८ शोज, पुण्यात १८ चित्रपटगृहांमध्ये १४७ शोज शुक्रवारपासून दाखविण्यात येणार आहेत. पुणे, मुंबई आणि ठाण्याबरोबरच अहमदनगर, सातारा, सांगली, अमरावती, नागपूर, अकोला, सांगोला, मिरज, पंढरपूर, रत्नागिरी, धुळे, जळगाव, शिरूर, चाळीसगाव, बुलडाणा, उदगीर, परभणी, जालना, बीड अशा महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी ‘ख्वाडा’ चित्रपटगृहांमध्ये शुक्रवारी झळकला आहे. मराठवाड्यातील सगळ्या चित्रपटगृहांमध्ये ८४ शोज, धुळे, जळगाव आणि नागपूरमध्ये १६१ शोजद्वारे, तर मध्य महाराष्ट्र, कोकण या भागामध्ये १७५ शोजद्वारे ‘ख्वाडा’ शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी, छोट्या भागामध्येही मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याची ही घटना अतिशय वेगळी असल्याचे ‘ख्वाडा’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते चंद्रशेखर मोरे, मार्केटिंग सांभाळणारे अभिजित चवाथे यांनी सांगितले. भाऊराव यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी युवकांशी संवाद साधून मुंबई, पुण्यात वेगवेगळ्या मार्गाने चित्रपटाची माहिती देऊन उत्सुकता तयार केली आहे.
‘ख्वाडा’ या चित्रपटाला ‘स्पेशल ज्युरी मेंशन’ आणि ‘सिंक साउंड’ असे दोन राष्ट्रीय पुरस्कार, उत्कृष्ट पदार्पण निर्मिती, उत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शक, उत्कृष्ट रंगभूषा असे ५ राज्य पुरस्कार मिळाले आहेत. २०१५ च्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील उत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कारही मिळाला आहे. याशिवाय उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट पदार्पण (अभिनेता), उत्कृष्ट खलनायक असे ‘प्रभात २०१५’चे चार पुरस्कार मिळाले आहेत.
चित्रपटात मुख्य भूमिका शशांक शेंडे साकारत असून, भाऊसाहेब शिंदे यांनी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. यांशिवाय अनिल नगरकर, योगेश डिंबळे, रसिका चव्हाण, वैष्णवी ढोरे, चंद्रकांत धुमाळ, प्रशांत इंगळे, वैशाली केंदळे, अमोल थोरात, नाना मोरे, हेमंत कदम आणि सुरेखा यांनी विशेष भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: 'Khwada' thriller at Box Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.