ख्वाडा- अस्सल मातीतली कणखर माणसं!

By Admin | Published: October 24, 2015 11:28 AM2015-10-24T11:28:22+5:302015-10-24T11:28:32+5:30

ग्रामीण पार्श्‍वभूमीवरची उत्तम लोकेशन्स चित्रपटात वापरली आहेत आणि वीरधवल पाटील यांचे छायांकन चांगले झाले आहे. अभिनयाच्या पातळीवर चित्रपट झकास चमकला आहे.

Khwada - the tallest man in the genuine! | ख्वाडा- अस्सल मातीतली कणखर माणसं!

ख्वाडा- अस्सल मातीतली कणखर माणसं!

googlenewsNext

ग्रामीण पार्श्‍वभूमीवरची उत्तम लोकेशन्स चित्रपटात वापरली आहेत आणि वीरधवल पाटील यांचे छायांकन चांगले झाले आहे. अभिनयाच्या पातळीवर चित्रपट झकास चमकला आहे. यातला कुठलाही कलाकार अभिनय करतच नाही; तर त्यांच्यातली स्वाभाविकता आपसूक बाहेर आल्याचे सतत जाणवत राहते. धरती हेच अंथरूण आणि आभाळ हेच पांघरूण, असे जिणे जगण्यासाठी मुळात अंगात तितकी रग असावी लागते. ही रग नसानसांत भिनवण्याची कामगिरी इथली माती पार पाडते. रोजचा दिवस पार करण्यासाठी लागणारी ऊर्जासुद्धा या काळ्या धनातून मिळते आणि दैनंदिन जीवनाचा गाडा त्वेषाने ओढला जातो. ही माती कपाळाला लावत 'ख्वाडा'मधली माणसे पाठीवर घेतलेल्या बिर्‍हाडासह रानोमाळ चालत राहतात आणि या मातीत घट्ट पाय रोवत हा चित्रपट माणसातल्या कणखरपणाचे सार्थ दर्शन घडवत राहतो.
एका गावाहून दुसर्‍या गावी भटकंती करत उदरनिर्वाह करणार्‍या धनगर कुटुंबाची गोष्ट हा चित्रपट चितारतो. मेंढरांचा कळप घेऊन रघू कर्‍हे त्याच्या कुटुंबासह गावोगाव फिरत असतो. पांडा व बाळू हे त्याचे दोन तरुण मुलगे त्याचे आधारस्तंभ ! यापैकी पांडाने वडिलांचा आदर्श समोर ठेवत त्यांच्यासारखेच आयुष्य जगण्याचे ठरवले असते; तर बाळूला पैलवानकीमध्ये रस असतो. बाळू पैलवान असला तरी त्याच्या मनात प्रेमभावनेला जागा असते आणि तो केव्हाचाच लग्नासाठी तयार असतो. या कुटुंबाच्या भटकंतीत बाळूला एक मुलगी सांगून येते आणि त्यांचे लग्नही ठरते. याच काळात या कुटुंबाचा मुक्काम एका गावात पडतो. अशोकराव हा कुटिल वृत्ती असलेला तिथला सरपंच, गावावर आणि गावकर्‍यांवर त्याची दहशत असते. रघूच्या कुटुंबालाही त्याची झळ पोहोचते आणि पुढे बाळू व सरपंच समोरासमोर उभे ठाकतात.
या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन भाऊराव कर्‍हाडे यांचे आहे आणि त्यांनी लेखनापासून लावलेला जोर शेवटपर्यंत कायम ठेवला आहे. चित्रपटातल्या व्यक्तिरेखांचे विश्‍व लेखणीतूनच दमदार उभे करण्यापासून पटकथेला फुलवण्यापर्यंतची त्यांची कामगिरी सरस आहे. नव्या दमाच्या कलाकारांची निवड करून त्यांनी मुदलातच बाजी मारली आहे आणि यातले प्रत्येक पात्र उत्तम वठले आहे.
अभिनयाच्या आहारी जाऊन मूळ कथा हातातून निसटणार नाही, याची प्रगल्भता त्यांनी यात दाखवली आहे. त्यामुळे कथेपासून अभिनयापर्यंत कुठलीही कसर यात राहिलेली नाही. अस्सल मराठी मातीतला चित्रपट देण्याचा त्यांचा हेतू यामुळे सफल झाला आहे. कलाकारांकडून त्यांनी उत्तम ते काढून घेतले आहे आणि त्यामुळे यातल्या सर्वच व्यक्तिरेखा ठोस उतरल्या आहेत. मेंढपाळ म्हणून काम करणारे कलावंत असोत किंवा घोडेस्वारी करणारे कलाकार असोत, यात कृत्रिमतेला कुठेच थारा नाही. कुस्तीचा आखाडा आणि इतर गोष्टींमध्ये फिल्मीपणा न उतरता त्या वास्तवतेकडे झुकण्यासाठी घेतलेले परिश्रम चित्रपटात दिसून येतात. त्यामुळे 'ख्वाडा' हा केवळ चित्रपट राहत नाही; तर खराखुरा जीवनानुभव ठरतो.
बाळू हा या चित्रपटातला नायक रंगवताना भाऊसाहेब शिंदे याने त्याच्यातल्या रांगडेपणाचे दर्शन घडवत भूमिका चोख होण्याकडे लक्ष दिले आहे आणि त्याची फळे या भूमिकेला लगडलेली दिसतात. शशांक शेंडे यांनी रंगवलेला रघू कर्‍हे अफलातून झाला आहे. सहजाभिनयाचे दर्शन घडवत त्यांनी त्यांची भूमिका रोखठोक सादर केली आहे. खलनायकी छटांची ताकदीने उधळण करत अनिल नगरकर यांनी यातला अशोकराव दणक्यात साकारला आहे. प्रशांत इंगळे, सुरेखा, चंद्रकांत धुमाळ, हेमंत कदम, वैष्णवी धोरे, रसिका चव्हाण आदी कलाकारांची उत्तम साथ चित्रपटाला लाभली आहे. एकूणच, मराठी मातीतला अस्सल अनुभव देणारा हा चित्रपट त्याच्या अनेकविध गुणवैशिष्ट्यांमुळे हटके ठरला आहे. ग्रामीण पार्श्‍वभूमीवरची उत्तम लोकेशन्स चित्रपटात वापरली आहेत आणि वीरधवल पाटील यांचे छायांकन चांगले झाले आहे. अभिनयाच्या पातळीवर चित्रपट झकास चमकला आहे. यातला कुठलाही कलाकार अभिनय करतच नाही; तर त्यांच्यातली स्वाभाविकता आपसूक बाहेर आल्याचे सतत जाणवत राहते.

Web Title: Khwada - the tallest man in the genuine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.