मोबाइल क्रमांकासाठी करीनाचे अकाउंट हॅक
By Admin | Updated: January 3, 2017 05:11 IST2017-01-03T05:11:08+5:302017-01-03T05:11:08+5:30
आवडत्या सिनेतारकांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची एक संधी मिळावी, यासाठी चाहते अनेक शक्कली लढवतात.

मोबाइल क्रमांकासाठी करीनाचे अकाउंट हॅक
मुंबई : आवडत्या सिनेतारकांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची एक संधी मिळावी, यासाठी चाहते अनेक शक्कली लढवतात. बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर उर्फ बेबोचा मोबाइल क्रमांक मिळवण्यासाठी एका ‘चाहत्या’ने चक्क तिचे प्राप्तिकराचे अकाउंटच हॅक केले. सायबर सेलने या ‘चाहत्या’चा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, तो निमलष्करी दलातील कर्मचारी आहे.
करीना कपूर हिचे आयकर खात्याच्या ‘ई-फायलिंग’चे अकाउंट हॅक झाल्याचे तिच्या सीएच्या लक्षात आले. हॅकरने तिचे २०१६-२०१७चे बनावट प्राप्तिकर विवरणपत्र तयार करून, ते प्राप्तिकर विभागाकडे ई-फाइल केले होते. उल्लेखनीय म्हणजे, त्यात तिचे वास्तवापेक्षा कमी उत्पन्न दाखवले होते. या प्रकरणी तिच्या सीएने आॅक्टोबरमध्ये सायबर सेलकडे तक्रार दिली होती. त्यानंतर, सायबर सेलचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तपासात, या गुन्ह्यात राज्याबाहेरील हॅकरचा हात असल्याचे स्पष्ट झाले. निमलष्करी दलातील कर्मचारी मनोज तिवारी (२६) याच्याकडे अधिक विचारणा करताच, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पॅन कार्ड क्रमांकही मिळवला
हॅकर हा करीना कपूरचा चाहता असून, तिचा मोबाइल क्रमांक मिळविण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे समोर आले. हा कर्मचारी अन्य लोकांच्या प्राप्तिकराच्या ई-फायलिंगचे काम करायचा. त्यामुळे प्राप्तिकर खात्याकडे करीनाचा मोबाइल क्रमांक असेल, अशी त्याला खात्री वाटत होती. त्यातूनच त्याने इंटरनेटवरून करीनाचा पॅन कार्ड क्रमांक मिळविला. त्याच्या आधारे ई-इंटर मेडिएटर सॉफ्टवेअरचा वापर करून तिचे अकाउंट हॅक केल्याचे तपासात उघड झाली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी त्याला अटक केली असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती सचिन पाटील यांनी दिली.