‘दुसऱ्याला आनंद देण्यातच खरा आनंद’
By Admin | Updated: November 19, 2016 02:27 IST2016-11-19T02:27:04+5:302016-11-19T02:27:04+5:30
साडेचार वर्षांंपूर्वी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या ‘कहानी’ सिनेमाने रसिकांवर जादू केली.

‘दुसऱ्याला आनंद देण्यातच खरा आनंद’
सुवर्णा जैन
साडेचार वर्षांंपूर्वी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या ‘कहानी’ सिनेमाने रसिकांवर जादू केली. या सिनेमातील विद्या बागची आणि त्यातील अन्य व्यक्तिरेखासुद्धा आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यावेळी अभिनेत्री विद्या बालन आणि सुजॉय घोष या अभिनेत्री-दिग्दर्शकाच्या जोडीने बॉक्स आॅफिसवर कमाल केली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी रुपेरी पडद्यावर कमबॅक करीत आहे. याच निमित्ताने अभिनेत्री विद्या बालनशी साधलेला हा दिलखुलास संवाद.
कहानीतील विद्या बागची ते कहानी-2मधील दुर्गाराणी सिंह या दोन वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. विद्या बागची ते दुर्गाराणी काय-काय बदल जाणवले?
नक्कीच विद्या बागची आणि दुर्गाराणी सिंह या दोघीही वेगळ्या आहेत. दोघी वेगळ्या दिसतात, दोघींचे व्यक्तिमत्त्व वेगळे आहे. दोघींचे जग वेगळे आहे. दोघींच्या जीवनात जे काही घडते, ते सगळे काही वेगळे आहे. कहानीच्या रिलीजला साडेचार वर्षे झाली आहेत. या काळात बरेच काही बदलले आहे. यादरम्यान माझे लग्न झाले, माझे रिलीज झालेले चारही सिनेमे आपटले. मात्र, ज्या रीतीने रसिकांचा कहानी-2 सिनेमाच्या ट्रेलरला प्रतिसाद मिळतोय, तो पाहून असे वाटत आहे, की कहानी सिनेमा त्यांनी कालच पाहिला आहे. अजूनही कहानीची कथा रसिकांच्या मनात- डोक्यात फिट्ट आहे. त्यांना प्रत्येक सीन माहीत आहे. कहानी सिनेमाला रसिकांचे जे प्रेम मिळाले, तेच प्रेम आजही कहानी-2 या सिनेमालाही मिळत आहे, असे वाटते. त्यामुळे वाटते, की साडेचार वर्षांत बरेच काही बदलले आहे. तरीही वाटते, की एवढा काळ मध्ये गेलाच नाही.
या सिनेमात सुजॉयने असा कोणता आव्हानात्मक सीन दिला होता का?
कहानी-2 सिनेमात एक सीन होता, तो वाचतानाच मी सुजॉयला म्हटले, की अरे हे काय लिहिलं आहेस? माझ्याकडून तू काय-काय करून घेशील? या सीनमध्ये मला एका मुलीचा कान चावायचा होता. ही मुलगी ट्रेलरमध्येसुद्धा आहे. सिनेमातील सगळे स्टंट आणि अॅक्शन मी केले खरे... मात्र, मला त्या सीनपेक्षा त्या मुलीची जास्त काळजी वाटत होती. पण, खरेच तो सीन खूप-खूप आव्हानात्मक असाच होता.
गेल्या दिवसांमध्ये तुला थिएटरशी संबंधित ठिकाणी हजेरी लावताना कॅमेऱ्यांनी टिपले आहे. त्यामुळे येत्या काळात थिएटर करण्याचा काही विचार?
काही दिवसांपूर्वी पृथ्वी फेस्टिव्हलला जाण्याचा योग आला. बऱ्याच वर्षांपासून या फेस्टिव्हलला यावे, असे वाटत होते; मात्र शक्य होत नव्हते. माझ्या करिअरमध्ये कुठे ना कुठे पृथ्वी थिएटरचेही योगदान आहे. कारण, त्या वेळी रामनाथ सर पृथ्वीमध्ये बालनाट्य कार्यशाळा चालवायचे. मी १५ वर्षांची असताना या कार्यशाळेत गेले होते. कार्यशाळा संपल्यानंतर छोटे नाटकही सादर केले होते. त्यानंतर माझा आणि थिएटरचा काही संबंध आला नाही. दरम्यानच्या काळात पृथ्वीमध्ये जाऊन नाटक पाहायचे; मात्र त्या वेळी सिनेमाचे शूटिंग नव्हते. मुंबईतच होते; त्यामुळे पृथ्वी फेस्टिव्हलला जाता आले. बऱ्याच वर्षांनंतर नसीरसाहेब, रत्ना पाठक यांना थिएटरवर काम करताना पाहण्याची संधी मिळाली. ‘चलती का नाम गाडी’ हे नाटकही पाहण्याची संधी मिळाली. सलाम ब़ॉम्बे या सामाजिक संस्थेने गरीब आणि गरजू ४० मुलांना एकत्र करून हे नाटक बसवले होते. ही संस्था या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलते. या नाटकात या मुलांचा जोश, उत्साह आणि सारे काही सलाम करावा असेच होते.
आगामी काळात काही बायोपिक सिनेमातही काम करतेयस, त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल?
येत्या काळात मी मल्याळी सिनेमात काम करीत आहे. हा एक बायोपिक आहे. प्रसिद्ध मल्याळी साहित्यिक कमलादास यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. कमलादास यांचे व्यक्तिमत्त्व वादग्रस्त होते, असे सांगितले जाते. त्यांचे लिखाण, त्यांची लिहिण्याची स्टाइल, त्या ज्या रीतीने आपले जीवन जगल्या त्या सगळ्या गोष्टींची आजही चर्चा होते. त्यामुळेच हा मल्याळी सिनेमा बनत आहे. कमलादास यांना जाणून घेण्याची मलाही प्रचंड उत्कंठा आहे. म्हणूनच मी या सिनेमात काम करीत आहे. ‘अलबेला’नंतर मराठीत एखादी चांगली स्क्रिप्ट आल्यास पुन्हा काम करायलाही आवडेल.
जॉय आॅफ गिव्हिंग म्हटले जाते. तुझा यावर किती विश्वास आहे? तुझ्या बाबतीत असा काही किस्सा घडला आहे का?
आपल्याकडे काही जास्त असेल, तर ज्यांच्याकडे काही नाही त्यांना ते दिले पाहिजे. त्यांना आपल्याकडील गोष्टी दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान विशेष असते. एकदा मी हातगाडी हाकणाऱ्या वृद्ध व्यक्तीला पाहिले. हातगाडी चालवताना त्यांना खूप त्रास होत होता, हे त्यांच्याकडे पाहून जाणवत होते. त्यांच्याकडे पाहून माझ्या डोळ्यांत पाणी आले. मी त्यांना थांबवले. त्यांना चहा, बिस्कीट आणि ब्रेड खायला दिले. ते खाऊन त्यांच्यात थोडी ताकद आली. त्यांच्यासाठी काही तरी करु शकले, याचा मला आनंद त्या वेळी झाला. बऱ्याचदा आपण आपल्या जगात धुंद आणि व्यस्त असतो. मात्र जेव्हा दुसऱ्याविषयी विचार करतो आणि आपल्याकडील गोष्टी त्यांना देतो, त्याचे समाधान काही वेगळेच असते.