'ओम शांती ओम' की 'पठाण'? शाहरुख खानच्या वाढदिवशी सोशल मीडियावर चाहते आमने-सामने, सर्वोत्कृष्ट भूमिकेवरून चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:59 IST2025-11-04T18:58:08+5:302025-11-04T18:59:22+5:30
Shah Rukh Khan : बॉलिवूडच्या बादशाहचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बॉलिवूडवरील रेडिटर्स एकत्र आले आणि सुपरस्टारच्या अद्भुत प्रवासाचा उत्सव साजरा केला, त्यांनी आपल्या आवडत्या पात्रांना उजाळा दिला.

'ओम शांती ओम' की 'पठाण'? शाहरुख खानच्या वाढदिवशी सोशल मीडियावर चाहते आमने-सामने, सर्वोत्कृष्ट भूमिकेवरून चर्चा
बॉलिवूडच्या बादशाहचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बॉलिवूडवरील रेडिटर्स एकत्र आले आणि सुपरस्टारच्या अद्भुत प्रवासाचा उत्सव साजरा केला, त्यांनी आपल्या आवडत्या पात्रांची आठवण काढली आणि कोणती भूमिका खऱ्या अर्थाने 'किंग ऑफ बॉलिवूड'ची ओळख बनली, यावर चर्चा केली.
सर्वात वरची कमेंट होती, 'कभी हां कभी ना'मधील सुनील ही शाहरुखची सर्वात मोहक आणि वास्तववादी भूमिका आहे. एका रेडिटरने लिहिले, ''सुनील इतका खरा वाटतो, प्रेमात असलेला मुलगा जो आपल्या प्रेयसीसाठी काहीही करायला तयार असतो, जरी त्यासाठी थोडा खोडकर व्हावं लागलं तरी.'' अनेकांनी सहमती दर्शवली की हा सिनेमा ''अत्यंत सुंदर'' होती आणि ''एसआरके अप्रतिम होता.'' चाहत्यांच्या मते, त्याचे साधं आणि भावनिक पात्र साकारण्याचे कौशल्यच त्याला अजरामर बनवतं. एका चाहत्याने ‘चेन्नई एक्सप्रेस’मधील त्याच्या कॉमेडी भूमिकेचं कौतुक करत लिहिलं की, ''मला माहित आहे हे थोडं वेगळं आहे, पण राहुल म्हणून तो इतका गोंडस आणि मजेशीर होता, त्याच्या कॉमिक रोल्समध्ये मला तो फार आवडतो.''
नॉस्टॅल्जियाचा वर्षाव
रेडिटर्सनी ९०च्या दशकातील शाहरुखची जादू पुन्हा अनुभवली. 'डीडीएलजे'मधील राज, 'कुछ कुछ होता है'मधील राहुल, आणि 'कल हो ना हो'मधील अमान यांची आठवण त्यांनी काढली. एका फॅनने लिहिले, ''लहानपणी माझे आवडते पात्र म्हणजे 'ओम शांती ओम'मधील दोन्ही ओम्स, 'डीडीएलजे'मधील राज आणि 'कुछ कुछ होता है'मधील राहुल होते. पण आता मोठा झाल्यावर मला 'चक दे इंडिया'मधील कबीर खान, 'स्वदेस'मधील मोहन, 'पहेली'मधील भूत आणि 'वीर-झारा'मधील वीर खूप आवडतात.''
'लव्हर बॉय'पासून 'लेजेंड'पर्यंतचा प्रवास
अनेक रेडिटर्सनी नमूद केलं की शाहरुखचा करिअर प्रवास केवळ रोमँटिक हिरोपर्यंत सीमित राहिला नाही, तो पुढे जाऊन 'चक दे इंडिया', 'स्वदेस' आणि 'जवान'सारख्या चित्रपटांमधील हटके आणि गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखा साकारू लागला. एका रेडिटरने 'चक दे इंडिया'मधील त्याच्या अभिनयाला ''राष्ट्रीय पुरस्कारास पात्र'' म्हटलं, तर दुसऱ्याने 'माय नेम इज खान'ला ''त्याचं सर्वोत्तम काम'' म्हटलं.