‘स्टंट करताना मी कधीतरी घाबरतो’
By Admin | Updated: May 14, 2017 01:12 IST2017-05-14T01:12:48+5:302017-05-14T01:12:48+5:30
‘गोलमाल’, ‘सिंघम’, ‘चेन्नई एक्स्पेस’ यांसारख्या हिट चित्रपटांची निर्मिती रोहित शेट्टीने केली आहे.

‘स्टंट करताना मी कधीतरी घाबरतो’
प्राजक्ता चिटणीस
‘गोलमाल’, ‘सिंघम’, ‘चेन्नई एक्स्पेस’ यांसारख्या हिट चित्रपटांची निर्मिती रोहित शेट्टीने केली आहे. त्याने काही वर्षांपूर्वी ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते; पण गेल्या काही वर्षांपासून तो त्याच्या चित्रपटात व्यग्र असल्याने तो ‘खतरों के खिलाडी’ पासून दूर राहिला आहे; पण आता तो पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत आहे. या कार्यक्रमाबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...
‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमाच्या यंदाच्या सीझनमध्ये प्रेक्षकांना काय वेगळे पाहायला मिळणार आहे?
- यंदाच्या कार्यक्रमाचा फॉरमॅट खूप बदलला आहे. यंदाच्या फॉरमॅटवर कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमने खूपच मेहनत घेतली आहे. या सीझनमध्ये प्रेक्षकांना खूप वेगळे स्टंट पाहायला मिळणार आहेत. तसेच, यंदाच्या सीझनमधील अनेक स्पर्धक हे छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत. तसेच, आम्ही या सीझनचे ‘स्पेन’ मध्ये चित्रीकरण करणार असल्याने अनेक वेगळे प्राणीदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा सीझन प्रेक्षकांना अधिक आवडेल याची मला खात्री आहे.
छोट्या पडद्यावर काम करणे आणि चित्रपटाची निर्मिती करणे यात तुला काय फरक जाणवतो?
- छोट्या पडद्यावर काम करत असताना तुम्ही लोकांशी खूपच लवकर जोडले जाता. तुमचा चेहरा ते रोज पाहात असतात. त्यामुळे त्यांना तुम्ही खूप जवळचे वाटता. ‘खतरों की खिलाडी’ या कार्यक्रमाचे चित्रीकरण करताना मी छोट्या पडद्यासाठी काम करतोय असे मला कधीच वाटले नाही. कारण, याचे चित्रीकरण करताना मी एका अॅक्शन चित्रपटाचेच चित्रीकरण करत आहे असेच मला नेहमी वाटते.
तुला स्वत:ला कधी स्टंट करताना भीती वाटते का?
- मला स्टंट करताना भीती वाटत नाही, असे मी बोललो तर ते खोटे ठरेल. स्टंट करताना थोडीशी तरी भीती मनात नेहमी असते. पण, मी वयाच्या 16व्या वर्षांपासून काम करत आहे. इतक्या लहान वयापासून मी स्टंट करत असल्याने स्टंट करताना माझ्यात आत्मविश्वास अधिक असतो. तसेच, स्टंट करताना त्याच्याशी संबंधित तांत्रिक गोष्टी तुम्हाला माहीत असल्यास ते करणे सोपे जाते, असे मला वाटते.
तू अनेक वर्षे बॉलिवूड इंडस्ट्रीचा भाग आहेस, गेल्या काही वर्षांत इंडस्ट्रीत स्टंटमध्ये किती बदल झाला आहे असे तुला वाटते?
- गेल्या अनेक वर्षांपासून आपली इंडस्ट्री तांत्रिकदृष्ट्या खूप सबळ बनली आहे. मी सुरुवातीला ज्यावेळी इंडस्ट्रीत काम करत होतो, त्यावेळी स्टंट करताना कलाकार किंवा त्यांचे ड्यूप्लिकेट अवघड स्टंट स्वत: करीत असत. पूर्वी चार-पाच मजल्यांवरूनदेखील कलाकार उडी मारत असत. पण, आता उड्या मारताना केबलची मदत घेतली जाते. अजय देवगणने चौथ्या मजल्यावरून उडी मारताना मी स्वत: पाहिले आहे.