प्रेमाच्या पलीकडल्या विश्वाची ओळख
By Admin | Updated: August 28, 2015 05:24 IST2015-08-28T05:24:19+5:302015-08-28T05:24:19+5:30
संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ने मैत्रीची अनोखी सफर घडविली, तर ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ने प्रेमाच्या सुंदर नात्याची वीण बांधली. आता त्यांचा ‘तू ही रे’ हा चित्रपट प्रेक्षकांना प्रेमाच्या पलीकडल्या

प्रेमाच्या पलीकडल्या विश्वाची ओळख
संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ने मैत्रीची अनोखी सफर घडविली, तर ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ने प्रेमाच्या सुंदर नात्याची वीण बांधली. आता त्यांचा ‘तू ही रे’ हा चित्रपट प्रेक्षकांना प्रेमाच्या पलीकडल्या विश्वाची ओळख करून देणार आहे. आयुष्यात ‘टर्निंग पॉइंट’ कसा येऊ शकतो, याची झलक चित्रपटामधून पाहायला मिळणार असल्याने सर्वांनाच या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. खरेतर हा संजय जाधव यांचाच काय; पण अगदी अभिनेता स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांच्या ‘जॉनर’चा चित्रपट नसूनही त्यांनी हे आव्हान कसं पेललं, हे त्यांनी ‘सीएनएक्सशी’ बोलताना उलगडले.
रोमॅन्टिक प्रतिमा तोडण्यास ‘इंटरेस्ट’ नाही : स्वप्निल जोशी
’तू ही रे’मध्ये ’सिद्धार्थ’ नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याचे लग्नापूर्वी आणि लग्नानंतरचे आयुष्य यात दिसणार आहे. लग्नापूर्वी तो कोल्हापूरचा एक रांगडा तरुण आहे, नंतर त्याचे नंदिनीशी (सई ताम्हणकर) लग्न होते. परिस्थितीनुसार आपले लाईफ पूर्णपणे बदलून जाते. दहा वर्षांपूर्वी जे निर्णय आपण बिनधास्तपणे घेत असतो, ते लग्नानंतर घेताना खूप विचार करावा लागतो. प्रत्येक वेळी घाबरणं हे हार मानण्यासारखे नसते, ती ‘मॅच्युरिटी’पण असू शकते. हे कशामुळे घडतं ते या चित्रपटामधून पाहायला मिळेल. माझ्या इतर चित्रपटांप्रमाणे हीदेखील रोमॅन्टिक भूमिकाच आहे. इतर भूमिका मला करता येत नाहीत असे नाही; पण प्रेक्षकांनीच माझी ‘रोमॅन्टिक’ प्रतिमा तयार केली आहे. ती तोडण्यात मला इंटरेस्ट नाही. कारण मी एक ‘एंटरटेनर’ आहे. प्रेक्षकांना जे हवं आहे तेच देण्याचा मी प्रयत्न करीत आहे.
खऱ्या आयुष्यातही ‘नंदिनी’सारखीच : सई ताम्हणकर
‘तू ही रे’मध्ये सिद्धार्थची टिपिकल बायको मटेरिअल असलेली नंदिनी साकारली आहे. नवऱ्यावर तिचे खूप प्रेम आहे; पण तितकीच त्याच्याबाबत ती पझेसिव्हदेखील आहे. ती त्याला स्पेस देत नाही. दोघांना आठ वर्षांची मुलगीपण आहे. ही भूमिका केल्यानंतर जाणवले, की मी रिअल लाईफमध्ये थोडीफार अशीच आहे. आपल्या भूमिकेकडे त्रयस्थपणे बघणे काहीसे मुश्किल आहे. चित्रपटातले काही सीन्स पाहिल्यानंतर अजून चांगले करता आले असते असे वाटले; पण वेळ निघून गेली होती. पण काही सीन्समधून नवीनही काहीतरी देता आले, याचे समाधानही मिळाले. वेगळ्या भूमिका मिळाल्या की मी त्या स्वीकारते; मग लोक काय म्हणतील असा विचार मी कधी करीत नाही. आजवर सगळ्या भूमिका केल्या; पण ‘निगेटिव्ह’ भूमिका करायची संधी अद्यापही मिळालेली नाही, त्या भूमिकेच्या मी प्रतीक्षेत आहे.
शंभर टक्के देण्याचा प्रयत्न : तेजस्विनी पंडित
’भैरवी भानुशाली’ अशा एका गर्भश्रीमंत मुलीची भूमिका मी केली आहे. बाबांच्या शब्दापलीकडे न जाणारी, अत्यंत शिस्तीत वाढलेली, खूप अबोल आणि कमी वेळा व्यक्त होणारी अशी ही मुलगी आहे. तिला एकदाच प्रेम होते आणि ती वेड्यासारखी सिद्धार्थच्या प्रेमात पडते. अचानक तिचे आयुष्य ‘यू टर्न’ घेते. ते कसं हे पडद्यावर पाहणंच योग्य ठरेल. आजवरच्या प्रत्येक भूमिका तितक्याच समरसून केल्या आहेत, मग ती सिंधुताई सपकाळ असो किंवा ‘कँडल मार्च’ असो. नेहमी १00 टक्केच देण्याचा मी प्रयत्न करते. त्यातून माझ्यातच प्रगती होते, असे मला वाटते. आतापर्यंत ग्लॅमरस भूमिका मी कधी केलीच नाही असं नाही; ‘गैर’मध्ये तशी भूमिका केली; पण तो चित्रपट विशेष चालला नाही. पण हा चित्रपट करताना मी लुक्सच्या बाबतीत खूप कॉंंन्शस झाले. ती चित्रपटात गरज नव्हती. या चित्रपटात दोन अभिनेत्री असल्या तरी त्याचे दडपण किंवा न्यूनगंड वाटला नाही, उलट सई आणि मी दोघींनी मस्त एंजॉय केले.
हा माझा ‘जॉनर’ नव्हे : संजय जाधव
हा चित्रपट माझ्या जॉनरचा नसूनही या विषयाला मी हात घातला आहे. एक मुलगा आणि दोन मुली पाहून तो प्रेमाचा त्रिकोण किंवा विवाहबाह्य संबंधावर आधारित चित्रपट असेल, असे वाटू शकते. पण विषय हा त्यापेक्षा खूप वेगळा आहे. प्रत्येकाच्या घरात घडणारी ही स्टोरी आहे. सचिन पिळगावकर यांनी जेव्हा चित्रपट पाहिला तेव्हा हृषी दा जिवंत असते तर त्यांना नक्कीच हा चित्रपट दाखविला असतो; कारण हा त्यांचा धाटणीचा चित्रपट आहे. ही मला मिळालेली खूप मोठी पावती आहे.