बॉलिवूडचा टायगर साकारणार हॉलिवूडचा "रॅम्बो"
By Admin | Updated: May 20, 2017 12:51 IST2017-05-20T12:51:07+5:302017-05-20T12:51:07+5:30
हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट "रॅम्बो"चा रिमेक करण्यात येणार असून मुख्य भूमिकेसाठी टायगर श्रॉफची वर्णी लागली आहे

बॉलिवूडचा टायगर साकारणार हॉलिवूडचा "रॅम्बो"
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट "रॅम्बो"चा रिमेक करण्यात येणार असून मुख्य भूमिकेसाठी टायगर श्रॉफची वर्णी लागली आहे. हॉलिवूडच्या उत्कृष्ट अॅक्शन चित्रपटांमध्ये सामील असलेल्या "रॅम्बो" चित्रपटातील मुख्य पात्र सिल्व्हस्टर स्टेलॉन यांनी साकारलं होतं. या चित्रपटाचे सिक्वेलही आले. "रॅम्बो" चित्रपटाचा मुख्य भाग होते सिल्व्हस्टर स्टेलॉन. एकट्याच्या खांद्यावर त्यांनी चित्रपट यशस्वी केला होता. आता बॉलिवूडने या आयकॉनिक चित्रपटाचा रिमेक करण्याचं ठरवलं आहे. टायगर श्रॉफ यावेळी सिल्व्हस्टर स्टेलॉन यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
टायगर श्रॉफने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला असून यामध्ये त्याची झलक पाहायला मिळते. पोस्टवरुन तरी टायगर श्रॉफ या भूमिकेसाठी अत्यंत योग्य निवड असल्याचं जाणवत आहे. पण सिल्व्हस्टर स्टेलॉन यांची उंची तो गाठू शकेल की नाही हे पाहण्यासाठी चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे. विशेष म्हणजे सिल्व्हस्टर स्टेलॉन यांनीदेखील चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अनेकांनी टायगर श्रॉफला मुख्य भूमिकेत घेण्यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ह्रतिक रोशन आणि सिद्धार्थ मल्होत्रासारखे अभिनेते रेसमध्ये असताना टायगर श्रॉफची निवड केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण चित्रपटाचं पोस्टर पाहून सध्या तरी त्यांना उत्तर मिळालं आहे असं म्हणायला हरकत नाही.
सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. एम. कॅपिटल वेंचर, ओरिजिनल एंटरटेनमेंट, इम्पॅक्ट फिल्म्स आणि सिद्धार्थ आनंद पिक्चर्स या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची अपेक्षा आहे