आयुष्याला खऱ्या अर्थाने भिडणारे भिडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 16:03 IST2017-05-24T00:37:59+5:302023-08-08T16:03:04+5:30
‘ओली की सुकी’मधील नीडर रावडी गँगचे भिडू खऱ्या आयुष्यात पण तितकेच जिद्दी आणि खंबीर आहेत. घरची बेताची परिस्थिती, वडिलांचे हरपलेले छत्र अशा अडचणींना न घाबरता जिद्दीने त्यातून

आयुष्याला खऱ्या अर्थाने भिडणारे भिडू
‘ओली की सुकी’मधील नीडर रावडी गँगचे भिडू खऱ्या आयुष्यात पण तितकेच जिद्दी आणि खंबीर आहेत. घरची बेताची परिस्थिती, वडिलांचे हरपलेले छत्र अशा अडचणींना न घाबरता जिद्दीने त्यातून ते आजवर मार्ग काढत आहेत. ओली की सुकीमध्ये ‘हाडक्याची’ भूमिका साकारणारा चिन्मय संतला अभिनयाची आवड असल्याने आणि वडिलांच्या भक्कम पाठबळामुळे अभिनयाकडे वळला. पण, १२वीचे वर्ष खंबीरपणे पाठीशी उभ्या राहणाऱ्या बाबांचा झालेला मृत्यू या परिस्थितीने खचून न जाता चिन्मयने अभ्यास आणि अभिनय या दोन्हींचा उत्तम ताळमेळ साधून चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. अभिनयाकडे निव्वळ छंद म्हणून न बघता उत्तमोत्तम भूमिका करून बाबांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याचा त्याचा संकल्प आहे.
प्रथमेश शिवलेला देखील वडील नाहीत. आईची वडापावची गाडी आहे. लहान वयामुळे प्रथमेशला आर्थिक परिस्थितीची जाणीव नव्हती. पण, चित्रपटातील भूमिका जगतांना त्याला खऱ्या आयुष्यातील परिस्थितीची जाणीव झाली आणि आता तो मन लावून अभ्यास करण्याबरोबरच आईला मदत म्हणून छोटीमोठी कामे करून घराला हातभार लावण्याचा प्रयत्न करतो. त्याने या चित्रपटासाठी मिळालेले मानधन देखील आईला दुचाकी घेण्यासाठी वापरले. पुण्यातील झोपडपट्टीत राहणाऱ्या अरुण गावडेला त्याचे वडील नक्की काय करतात, या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही. मोठ्या भावाला नोकरी मिळाल्यावर आता चांगले दिवस येतील, या विचाराने हुरळून गेलेले त्याच्या घरातले त्याला अचानक झालेल्या अपघातामुळे खचून गेले. परंतु, अरुणची जिद्द नाही खचली. वाटेल तितके कष्ट करून भावावर चांगले उपचार करण्याचा त्याचा मानस आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देणारे हे हिरो आपल्याला २६ मे रोजी ‘ओली की सुकी’मधून भेटणार आहेत. त्यामुळे आपल्या नजीकच्या चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघू या आणि त्यांच्या जिद्दीला सलाम करू या.