हिंदवी स्वराज्याचे धगधगते अग्निकुंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 15:58 IST2017-06-13T02:32:11+5:302023-08-08T15:58:30+5:30
जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय, अशा उत्स्फूर्त घोषणांनी अवघे नाट्यगृह दुमदुमून जाते आणि तत्क्षणी रंगभूमीवर ‘शंभूराजे’

हिंदवी स्वराज्याचे धगधगते अग्निकुंड!
- राज चिंचणकर
नाटक : "शंभूराजे"
जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय, अशा उत्स्फूर्त घोषणांनी अवघे नाट्यगृह दुमदुमून जाते आणि तत्क्षणी रंगभूमीवर ‘शंभूराजे’ या नाटकाचा पडदा दिमाखात उघडला गेल्याची निश्चित अशी वर्दी मिळते. छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट उलगणारे हे ऐतिहासिक नाटक प्रचंड जोशात रंगभूमीवर सादर होते आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अस्तित्वाने हिंदवी स्वराज्याच्या धगधगत्या अग्निकुंडाच्या ज्वाला रसिकमनांवर बरसत राहतात.
छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची मोहीम सुरू असताना शंभूराजे तिचे साक्षीदार होते. वडिलांचा पराक्रम ते जवळून पाहात होते. शिवाजी महाराजांच्या पश्चात शंभूराजे छत्रपती झाले, परंतु त्यांचा हा प्रवास अतिशय खडतर होता. परकीय आक्रमणांना तोंड देत असतानाच, घरभेद्यांच्या त्रासाला त्यांना सामोरे जावे लागले. केवळ दगाफटका झाल्याने औरंगजेबाचे बंदी होण्याची वेळ त्यांच्यावर आली. मात्र, तशा स्थितीतही त्यांचा मराठी बाणा कायम राहिला. हिंदवी स्वराज्याच्या या पराक्रमी छाव्याने औरंजेबालाही भीक घातली नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा हा सगळा जीवनपट या नाटकातून धडाक्यात दृगोच्चर होतो.
नाटककार सुरेश चिखले यांनी या नाटकासाठी म्यानातून बाहेर काढलेली लेखणी अतिशय धारधार आहे. संभाजी महाराजांचे कार्य, कर्तृत्व, राष्ट्राभिमान याची दृश्यात्मकता मांडताना त्यांची लेखणी त्वेषाने लिहिती झाली आहे. अंगात वीरश्री संचारायला लावणाऱ्या त्यांच्या संवादांनी हे नाट्य मनावर कधी स्वार होते, ते समजतही नाही. दिग्दर्शक अनिल गवस यांनी लेखकाला अभिप्रेत असलेले हे नाट्य तेवढ्याच ताकदीने मंचित केले आहे. त्यांना कलावंतांची मिळालेली दणदणीत साथही महत्त्वाची आहे.
रंगभूमीवर नटाच्या ‘एन्ट्री’ला टाळी मिळणे हे भाग्य समजले जाते. या नाटकात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे, तसेच छत्रपती शिवराय रंगवणारे शंतनू मोघे या दोघांच्या वाट्याला हा बहुमान येतो. अर्थात, या दोघांच्या धडाकेबाज अस्तित्वाची उमटलेली ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणायला हवी. केवळ अमोल कोल्हे यांच्यासाठीच शंभूराजेंची भूमिका लिहिली गेली असावी, याचा साक्षात्कार त्यांनी या नाटकातून घडवून दिला आहे. पिताप्रेमासाठी व्याकूळ झालेले काळीज, परकीय आक्रमणाशी सुरू असलेला सामना, घरच्याच मंडळींकडून होणारा त्रास, माथ्यावर आलेला आरोप खोडून काढण्यासाठीचा प्रयास, मनात कुठेतरी डावलले जात असल्याची भावना आणि बंदिवान झाल्यावरचे धगधगते रूप असे विविध आयाम अमोल कोल्हे यांनी ज्या तऱ्हेने दृगोच्चर केले आहेत, त्याला मानाचा मुजराच करावा लागेल. विशेषत: बंदिवानाच्या रूपातला त्यांचा आवेश आणि कणखर बाणा मोहित करणारा आहे.
शंतनू मोघे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि गणोजी शिर्के या दोन भूमिका रंगवल्या असून, त्यात त्यांनी धडाकेबाज काम केले आहे. शिवरायांची भूमिका ही तुलनेने छोटी असली, तरी त्यात ते भाव खाऊन जातात, तर गणोजी शिर्के त्यांनी ज्या टेचात उभा केला आहे, त्याला दाद द्यावी तेवढी कमीच ठरेल. नैसर्गिक देहबोलीचा उत्तम वापर करून घेत त्यांनी साकारलेल्या या तडाखेबंद भूमिका लक्षवेधी ठरतात.
शर्मिष्ठा राऊत हिने येसूबाई रंगवताना बहारदार कामगिरी केली आहे. एकीकडे बंधुप्रेम, तर दुसरीकडे पतिनिष्ठा यात अडकलेली येसूबाई जेव्हा गणोजीवर समशेर उपसते, तेव्हाचा तिचा अविर्भाव पाहण्यासारखा आहे. विलास सावंत यांनी यात हंबीरराव मोठ्या ताकदीने साकारला आहे आणि तो चांगली छाप पाडून जातो. महेश कोकाटे (अण्णाजी दत्तो), रोहन भालेकर (कवी कलश), देवा सरदार (मोरोपंत व रायप्पा), पंढरी मेदगे (बाळाजीपंत), राजन शंकर बने (औरंगजेब), विलास सावंत (मुकर्रबखान), लतिका सावंत (सोयराबाई) या कलावंतांची उत्तम साथ या नाटकाला मिळाली आहे. नंदलाल रेळे यांचे पार्श्वसंगीत, शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना आणि संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य नाटकाची गरज पूर्ण करणारे आहे. यातल्या ऐतिहासिक पात्रांची करण्यात आलेली वेशभूषा आणि रंगभूषेलाही मोठे श्रेय द्यावे लागेल. ‘कलावैभव’ आणि ‘जगदंब क्रिएशन्स’ यांनी या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर इतिहासाच्या पानांमधला भरजरी नजराणा पेश केला आहे. हे नाटक अनुभवताना अस्सल मर्द मराठ्याची औलाद असणाऱ्यांचे रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही.