ऑडिशनच्या नावाखाली 'हिरामंडी'च्या ताजदारची फसवणूक; म्हणाला, 'माझ्याकडून पैसे घेतले आणि दुसऱ्या दिवशी...'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 11:12 AM2024-05-16T11:12:22+5:302024-05-16T11:18:09+5:30
Taha shah: हिरामंडीमध्ये ताजदार बलोच ही भूमिका अभिनेता ताह शाह याने साकारली असून त्याने स्ट्रगल काळातील आठवणींना उजाळा दिला आहे.
संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansale) यांची 'हिरामंडी' ही वेब सीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. या सीरिजच्या माध्यमातून भन्साळींनी ओटीटीवर पदार्पण केलं. मल्टीस्टारर असलेली ही सीरिज रिलीज झाल्यापासून सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्येच सध्या त्यातील ताजदार म्हणजेच अभिनेता ताहा शाह चर्चेत आला आहे. ऑडिशनच्या नावाखाली त्याची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा खुलासा त्याने केला आहे.
अभिनेता ताहा शाह (Taha shah) याने हिरामंडीमध्ये ताजदार बलोच ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या सीरिजमधील त्याची पर्सनालिटी आणि लूक पाहून अनेक तरुणी त्याच्यावर घायाळ झाल्या आहेत. अलिकडेच त्याने 'इंस्टेंट बॉलिवूड'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने अनेकदा तो स्कॅमचा शिकार झाल्याचं सांगितलं.
"मी कॅमेरासमोर जाहीरपणे सांगतो की लोकांशी ओळख वाढावी म्हणून मी पार्ट्यांमध्ये जातो. या ओळखीमुळे लगेच कोणी मला मदत करणार नाही. पण, वेळप्रसंगी माझे फोन नक्कीच ते उचलतील. मी कास्टिंग डायरेक्टरला फोन करायचा प्रयत्न केला आणि सहा वर्ष त्यांनी एकदाही माझा फोन उचलला नाही. मी माझ्या कॅलेंडरप्रमाणे चालतो. जर मी एखाद्या व्यक्तीला फोन केला असेल तर दोन आठवड्यानंतर पुन्हा फोन करतो. त्यामुळे माझ्या कॅलेंडरवर हजारो नावांची यादी लिहिली आहे. साधारणपणे मी दिवसाला ४० लोकांना फोन करतो", असं ताहा शाह म्हणाला.
ऑडिशनच्या काळातील आठवणींना उजाळा
"यशराजसोबत काम करण्यापूर्वी मी एका दिवसाला ८ ऑडिशन द्यायचो. बऱ्याचदा मी ऑडिशनसाठी ४ ते १० हजार रुपयेदेखील दिले आहेत. यात तीन ते चार वेळा माझी फसवणूक सुद्धा झाली आहे. यात ते लोक माझ्याकडून पैसे घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी सगळं ऑफिस रिकामं झालेलं असायचं. त्या जागी कोणीच नसायचं."
दरम्यान, "मी एका ऑडिशनसाठी १३ तास लाइनमध्ये उभा सुद्धा होतो. पण, शेवटी मी तो प्रोजेक्ट सोडला. कारण, ते मला ४ वर्ष त्या प्रोजेक्टमध्ये अडकवून ठेवण्याच्या विचारात होते."