गदिमांची वेबसाईट आता नव्या स्वरूपात

By Admin | Updated: June 16, 2014 18:36 IST2014-06-16T18:16:02+5:302014-06-16T18:36:43+5:30

सहज सोपे शब्द, भावसंपन्न व मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना करणारे महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखल्या जाणा-या ग. दि. माडगूळकर यांची वेबसाइट 'गदिमा.कॉम' नव्या स्वरूपात उपलब्ध झाली आहे.

Gadim's website is now in a new format | गदिमांची वेबसाईट आता नव्या स्वरूपात

गदिमांची वेबसाईट आता नव्या स्वरूपात

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १६ - सहज सोपे शब्द, भावसंपन्न व मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना करणारे महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखल्या जाणा-या ग. दि. माडगूळकर यांची वेबसाइट 'गदिमा.कॉम' आता नव्या स्वरूपात उपलब्ध झाली आहे. गदिमांच्या साहित्य-चित्रपटांचा अनमोल खजिना आता जगभरातील मराठी रसिकांसाठी www.gadima.com, www.madgulkar.com, www.geetramayan.com या तीन नावांनी उपलब्ध होत आहे. गदिमांच्या समग्र रचनांची ओळख करून देणारी वेबसाईट १९९८ सालीच सुरू करण्यात आली होती, ती , आता नवीन रुपात रसिकांसाठी पुन्हा उपलब्ध झाली आहे. गदिमांचे नातू सुमित्र श्रीधर माडगूळकर व नातसून प्राजक्ता सुमित्र माडगूळकर यांनी अथक प्रयत्न करून हा खजिना रसिकांसाठी आणला आहे. 
काय आहे वेबसाईटवर :- 
- गदिमांची 'खेडयामधले घर कौलारु','या चिमण्यांनो परत फिरा रे','इंद्रायणी काठी देवाची आळंदी','एक धागा सुखाचा','बुगडी माझी सांडली गं','नाच रे मोरा','एका तळ्यात होती','जिंकू किंव्हा मरु' सारखी असंख्य गाणी शब्दांसकट (lyrics) MP3 रुपात साईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच या वेबसाईटवर गीतांची चित्रपटगीते, भावगीते, बालगीते, लावण्या, भक्तिगीते,देशभक्तिपर गीते,सवाल जवाब,इतर गीते अशा वेगवेगळ्या स्वरुपात विभागणी करण्यात आली आहे. 
 
- गदिमांच्या कविता त्यांच्याच आवाजात ऐकणे ही रसिकांना आगळी वेगळी पर्वणीच आहे. त्यांच्या आवाजात 'जोगिया','जत्रेच्या रात्री','पूजास्थान' या कविता तसेच मराठी संस्कृती,मराठी सणांपासून ते गदिमांच्यातला कवी कसा घडत गेला हे सांगणारे गदिमांचे एक तासाचे भाषण 'मी कवी कसा झालो' हे रसिकांना ऐकायला मिळू शकते.  
 
 - गदिमांनी साईबाबांच्या गौरवार्थ लिहिलेली ही 'साई दरबार' गौरव गीते 'राम गुलाम' या टोपण नावाने लिहिली होती. त्यातील 'काकड आरती करितो साईनाथ देवा' हे गीत शिर्डीच्या साई मंदिरात सकाळी काकड आरती म्हणून तसेच 'शिर्डी पंढरपूर माझे' हे गीतही मंदिरात गायले जाते. वेबसाईटवर ही गीतेही उपलब्ध आहेत.
 
- तसेच गदिमांच्या आयुष्यातील विविध प्रसंग, त्यांनी लिहीलेल्या गाण्यांमागच्या रंजक कथा, विनोदी किस्से अशा अनेक गोष्टी लेखमालेच्या स्वरुपात गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर, गदिमांचे पुत्र श्रीधर माडगूळकर यांच्या लिखाणातून साईटवर उपलब्ध करण्यात आले आहे. एवढंच नव्हे तर दर आठवड्याला २-३ नवे लेख उपलब्ध होणार आहेत. 
 
- गदिमांच्या छायाचित्रांचे वेगळे दालनही साईटवर आहे. अनेक मोठमोठे साहित्यकार, लेखक,चित्रपट निर्माते,संगीतकार,गायक,कलाकार,राजकारणी यांच्याशी गदिमांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्या  जवळजवळ ३०० छायाचित्रे येथे आहेत. तसेच सुप्रसिध्द कॅलिग्राफिकार श्री.भालचंद्र लिमये यांनी गदिमांच्या निवडक २० गीते - कवितांवर केलेली कॅलिग्राफी (चित्रलिपी) साईटवर उपलब्ध करण्यात आली आहेत.
 
- साहित्य विभागात गदिमांच्या कविता, गीतरामायण, गीते, बालगीते-कविता शब्दरुपात देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांची कारकीर्द, साहित्य सूची ,संपूर्ण मराठी चित्रपट सूची, संपूर्ण हिंदी चित्रपट सूची, त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची सूची, गदिमांची वंशावळ आणि गदिमा प्रतिष्ठानबद्दल माहितीही साईटवर उपलब्ध आहे. 
 

Web Title: Gadim's website is now in a new format

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.