‘‘स्मॉल बजेट सिनेमांचं भविष्य उज्ज्वल’’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2017 05:45 IST2017-01-11T05:45:11+5:302017-01-11T05:45:11+5:30

सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान किंवा इतर कुणीही सुपरस्टार आणि बडे बडे दिग्दर्शक यामुळेच सिनेमा हिट ठरतात

"The future of small budget cinema is bright" | ‘‘स्मॉल बजेट सिनेमांचं भविष्य उज्ज्वल’’

‘‘स्मॉल बजेट सिनेमांचं भविष्य उज्ज्वल’’

- Suvarna Jain -

सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान किंवा इतर कुणीही सुपरस्टार आणि बडे बडे दिग्दर्शक यामुळेच सिनेमा हिट ठरतात, हे समीकरण बदलण्याचं काम केलंय ते बॉलिवूडची निर्माती गुनीत मोंगा हिने. सिनेमाच्या यशासाठी त्याचे बजेट महत्त्वाचे नसून सिनेमाची कथाच सर्वश्रेष्ठ असते, हे गुनीत मोंगानं सिद्ध केलंय. गँग्स आॅफ वासेपूर, लंच बॉक्स आणि मसान अशा एक ना अनेक सिनेमांनी भारतीय रसिकांसोबत जगभरातल्या रसिकांवर जादू केलीय. हीच गुनीत आता तिचा हरामखोर नावाचा सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहे. याचनिमित्ताने तिच्याशी साधलेला हा संवाद...

सामाजिक विषय हा तुझ्या सिनेमांचा गाभा असतो. असे सिनेमा बनवताना कोणत्या गोष्टींचा तू विचार करते?
एक चांगला सिनेमा बनवण्याचे माझे कायम ध्येय असते. सिनेमा हे मनोरंजनाचे माध्यम आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. मात्र आज सिनेमा हा समाजमनाचा आरसाही समजला जातो. त्यामुळेच सिनेमाच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रबोधन करण्याची संधी असते. त्यामुळे सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनासह रसिकांचं प्रबोधन झाले तर सोने पे सुहागा असे मला वाटते. तिकीट खिडकीवर अशा विषयांना, सिनेमांना किती यश मिळते हा मुद्दा गौण असला तरी त्यातून मिळणारे मानसिक समाधान हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

 ‘हरामखोर’ हा सिनेमा त्याच्या शीर्षकामुळे सुरुवातीपासून चर्चेत आहे. हेच शीर्षक देण्याचं काही खास कारण?
‘हरामखोर’ या सिनेमाची कथा विद्यार्थिनी आणि एका शिक्षकाच्या अवतीभवती फिरते. या शिक्षकाचे त्या विद्यार्थिनीवर असलेले प्रेम यावर हा सिनेमा भाष्य करतो. मुळात अशा घटना किंवा असे प्रकार छोट्या-छोट्या गावातच नाही, तर शहरातही घडत असतात. मात्र त्यावर उघडपणे बोलण्यास कुणीही धजावत नाही. त्यामुळे सिनेमाचा दिग्दर्शक श्लोक शर्माने यावर पूर्ण अभ्यास करून त्याची कथा लिहिलीय. गेली चार वर्षे या सिनेमावर आम्ही काम करतोय. हरामखोर या शब्दाचा अर्थ या सिनेमाच्या कथेतच दडला आहे. हा सिनेमा पाहिल्यावर रसिकांना त्या शब्दाचा अर्थ उलगडेल. सिनेमा पाहिल्यानंतरच रसिकांच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे मला वाटते. विशेष म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी आणि श्वेता त्रिपाठी यांनी त्यांच्या भूमिका चोख साकारल्या आहेत.
सध्या सोशल मीडिया हे माध्यम प्रभावी ठरत आहे. त्यामुळे या सिनेमासाठी तू सोशल मीडियाचा आधार घेतला. त्याचा कितपत फायदा झाला?
सोशल मीडियावर हरामखोर सिनेमाचा ट्रेलर टाकताच त्याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अवघ्या काही तासांतच त्याला तरुणाईची आणि रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळू लागली. तीन दिवसांतच हा ट्रेलर सुपरहिट ठरला. रसिकांच्या सोशल मीडियावरील कमेंट माझ्यासाठी प्रेरणादायी ठरल्या. त्या सगळ्या कमेंट वाचून माझ्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे समाधान वाटते आहे. या सिनेमालाही सेन्सॉरचा सामना करावा लागला. हा काळ माझ्यासाठी कठीण होता. हाच सिनेमा नाही तर माझ्या इतर दोन-तीन सिनेमांनाही सेन्सॉरची आडकाठी आली. चांगला विषय असून सिनेमा रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतक्या अडचणी येतात, ही भावनाच खूप त्रासदायक असते. मात्र सगळ्या अडचणींवर मात करीत सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी मागे टाकत सिनेमाच्या रिलीजवर सगळ्या नजरा खिळल्या आहेत. या सिनेमाने 13 व्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल आॅफ लॉस एंजेलिस आणि १७ व्या मामि फेस्टिव्हलमध्येही पुरस्कारांची कमाई केली आहे. विधू विनोद चोप्रानेही या सिनेमासाठी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे या माध्यमातून मी त्यांचेही आभार व्यक्त करते आहे.

स्मॉल बजेट सिनेमाचे भविष्य कसे असेल असे तुला
वाटते?

बिग बजेट सिनेमा बॉक्स आॅफिसवर धुमाकूळ घालतात. या सिनेमांना तिकीट खिडकीवर बरेच यश मिळते. रसिकांच्या प्रेमामुळे या सिनेमांची तिकीट खिडकीवर कोटीच्या कोटी उड्डाणे होत असतात. मात्र छोट्या बजेट असलेल्या सिनेमात त्याची कथाच ही नायक असते. सिनेमा कोणताही असला तरी उत्तम दर्जाची कथाच रसिकांना थिएटरकडे खेचून आणते. अशा सिनेमांना मग रसिक डोक्यावर घेतातच. त्यामुळे स्मॉल बजेट सिनेमांना रसिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून येत्या काळात या सिनेमांचं भविष्य उज्ज्वल आहे, असे मला निश्चितच वाटते.

Web Title: "The future of small budget cinema is bright"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.