फुल आॅन सलमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2016 03:22 IST2016-07-07T03:22:45+5:302016-07-07T03:22:45+5:30

नेहमीप्रमाणे सलमान त्याच्या चाहत्यांसाठी सिनेमाच्या रूपात ‘ईदी’ घेऊन आलाय. अर्थात रुपेरी पडद्यावर सुलतान दाखल झालाय... मोठ्या जल्लोषात रुपेरी पडद्यावर रंगतोय एक कुस्तीचा

Full An Salman | फुल आॅन सलमान

फुल आॅन सलमान

- जान्हवी सामंत

सुलतान (हिंदी चित्रपट)

नेहमीप्रमाणे सलमान त्याच्या चाहत्यांसाठी सिनेमाच्या रूपात ‘ईदी’ घेऊन आलाय. अर्थात रुपेरी पडद्यावर सुलतान दाखल झालाय... मोठ्या जल्लोषात रुपेरी पडद्यावर रंगतोय एक कुस्तीचा आखाडा... संपूर्ण सिनेमाचा भार हा सलमाननं उचललाय. त्यामुळे सलमान म्हणजे सिनेमासाठी कॅप्टन आॅफ द शिप आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
कुस्तीपटू असलेल्या आरफा (अनुष्का शर्मा) नावाच्या मुलीच्या प्रेमात सुलतान (सलमान खान) पडतो. सलमान हा साधा डिश टीव्ही आॅपरेटर असतो आणि एका साधारण माणसाबरोबर आरफाला तिचं भावी आयुष्य घालवायचं नसतं. आॅलिम्पिकमधील कुस्ती स्पर्धा जिंकून कुस्तीपटूसोबत लग्न करण्याचं तिचं स्वप्न असतं. तिच्या प्रेमापोटी सुलतान कुस्तीपटू बनण्याचा निर्णय घेतो. सहजपणे तो राज्य पातळीवर कुस्तीच्या स्पर्धा जिंकून बक्षिसंही मिळवतो. त्याच्या या कुस्तीच्या यशामुळे आरफा सुलतानच्या
प्रेमात पडते आणि त्याच्याशी लग्नही करते.
सलमानने साकारलेला हरियाणवी सुलतान भाव खाऊन जातो, मात्र अनुष्कानं साकारलेली पंजाबी कुडी सलमानसमोर फिकी पडते. याआधीही अनेक सिनेमांत तिने पंजाबी कुडी साकारलीय. त्यामुळे तिच्या भूमिकेत असं फारसं नावीन्य जाणवत नाही. अब्बास जाफरच्या दिग्दर्शनामुळे ही फिल्म एका ईसीजी (ELECTRONIC CARDIOGRAM) प्रमाणे वाटते. मध्येच सिनेमाला गती येते तर कधी त्याचा वेग मंदावतो, तर सिनेमा कधी रटाळ तर कधी इंटरेस्टिंग वाटतो. उगाच काही गोष्टी सिनेमात ओढूनताणून टाकलेल्या वाटतात, जे आरामात टाळता आलं असतं. पूर्वी ९०च्या दशकातल्या मिथुन चक्रवर्तीच्या सिनेमामध्ये असा मेलोड्रामा बघायला मिळायचा. उगाच ओढूनताणून काही गोष्टी टाकल्या जायच्या. त्याचप्रकारे काहीसं सुलतानबद्दल झालंय असं आवर्जून म्हणावं लागेल. या सिनेमाची ३० मिनिटांची लांबी कमी करता आली असती, असं सिनेमा पाहतांना सतत वाटत राहतं. सिनेमाचा गावरान बाज मनाला भिडतो.
सिनेमाची दोन भागांत मांडणी करण्यात आलीय. पहिल्या भागात सलमान २० वर्षांच्या युवकाची भूमिका साकारतो. विशेष म्हणजे, सिनेमात बऱ्याच वेळा सलमान शर्टलेस दिसतो. त्यामुळे त्याच्या अंदाजावर शिट्या-टाळ्यांचा वर्षाव होतो. त्याचा सुलतान बनण्यापासून ते त्याच्या प्रेम मिळवण्यापर्यंतचा काळ अतिशय चांगल्या प्रकारे मांडण्यात आलाय. सुलतान मनोरंजन करतो का? तर या प्रश्नाचे उत्तर होय आहे. सलमानच्या इतर सिनेमांप्रमाणेच हा सिनेमा फुल एंटरटेनिंग आहे. सिनेमा नक्कीच पाहावा.
बॉक्स आॅफिसवरही सलमानच्या इतर सिनेमांप्रमाणेच तो रेकॉर्डब्रेक कमाई करणार यात शंका नाही. सिनेमा पाहून एकच ओळ आठवते, ती म्हणजे शेवटी प्रत्येक कुस्तीपटूला आखाड्यात स्वत:साठी स्वत:चाच सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे सलमान दरवर्षीप्रमाणे स्वत:चाच रेकार्डब्रेक करण्याच्या तयारीत दिसतोय.

Web Title: Full An Salman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.