प्रथम तुला वंदितो!
By Admin | Updated: September 1, 2016 02:22 IST2016-09-01T02:22:13+5:302016-09-01T02:22:13+5:30
‘सा रे ग म प’ या संगीत शोमधून संगीतसृष्टीला सापडलेलं एक रत्न आणि आजच्या पिढीचा आघाडीचा गायक म्हणजे मंगेश बोरगावकर

प्रथम तुला वंदितो!
‘सा रे ग म प’ या संगीत शोमधून संगीतसृष्टीला सापडलेलं एक रत्न आणि आजच्या पिढीचा आघाडीचा गायक म्हणजे मंगेश बोरगावकर. संगीताचा वारसा घरातूनच लाभलेल्या मंगेशने आजवर सिनेमा, मालिका, विविध अल्बम आणि म्युझिक शोमधून आपल्या सुमधुर आवाजाने संगीतप्रेमींच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. सुरांची मोहिनी घालणारा मंगेश ‘श्री गणराया’चाही मोठा भक्त आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. याच पार्श्वभूमीवर मंगेश बोरगावकरने ‘लोकमत सीएनएक्स’च्या टीमसह गणेश मूर्तिशाळेचा फेरफटका मारला. या वेळी त्याच्यासह मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा...
माझं आणि श्री गणेशाचं एक वेगळं आणि अतूट नातं आहे. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही गणेशवंदनेनं होते. तशी माझ्या संगीतमय जीवनाची सुरुवातही श्री गणरायाच्या नावानंच झाली आहे. माझ्या घराला चार पिढ्यांचा संगीताचा वारसा आहे. त्यामुळे घरात संगीताचं वातावरण. वयाच्या ३-४ वर्षांपासून जेव्हा माझे काका आणि गुरू पंडित बाबूराव बोरगावकर यांच्याकडे मी शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी मला भूप रागातील पहिली बंदिश शिकवली, ज्यात गणपती बाप्पाचं वर्णन होतं. त्यामुळे एक प्रकारे माझ्या संगीतजीवनाची सुरुवातच गणेशाच्या आराधनेनं झालीय. त्यामुळे बाप्पाचं माझ्या जीवनात खूप खूप मोलाचं स्थान आहे.
गणेशोत्सवातही घरी भक्तीमय वातावरण असतं. आमचं सगळं कुटुंबच गणेशाच्या भक्तीत लीन होतं. आमच्या घरीही गौरी-गणपती असतात. त्यामुळे घरातलं वातावरण खूप छान आणि भक्तीमय असतं. गणरायाची अनेक रूपं आहेत. त्याचं प्रत्येक रूप आगळंवेगळं. हे प्रत्येक रूप डोळ्यांत साठवून ठेवावं, असंच असतं. बाप्पा माझ्यासाठी जणू एक मित्रच आहे. जो खूप खूप जवळचा वाटतो. त्याच्याकडे आपण कधीही मनमोकळेपणानं बोलू शकतो. देव असल्याचं कोणतंही दडपण वाटत नाही. मला मृदंग वाजवत असलेल्या श्री गणेशाचं साजरं रूप भावतं. लातूरला आमच्या गावी सरस्वती मंदिरामध्ये अशीच गणपती बाप्पाची मूर्ती आहे. ती बघतच राहावी असं वाटतं.
लोकमत सीएनएक्समुळे मला माझ्या जीवनातील एक अप्रतिम क्षण अनुभवण्याची संधी मिळाली. गणेश मूर्तिशाळेत मूर्तीवर सध्या अखेरचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर या मूर्तिशाळेत जाण्याची आणि मूर्तिकारांचं काम जवळून पाहण्याची तसंच अनुभवण्याची संधी लोकमत सीएनएक्समुळे लाभली. त्या मूर्तिशाळेतलं वातावरण एकदम वेगळं होतं. तिथं गेल्यावर एक प्रकारची ऊर्जा आल्यासारखं वाटलं. लहानमोठ्या अनेक मूर्ती तिथं होत्या. तिथले मूर्तिकार प्रत्येक मूर्तीला जणू जिवंत करीत होते. त्यांची मेहनत, त्यांची अद्भुत कला पाहायला मिळाली. हे कलाकार मात्र मागेच राहतात, त्यांच्याबद्दल फारसं कुणालाही माहीत नसतं याचं खूप वाईट वाटतं. मात्र, या कलाकारांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत मूर्तीवर हात फिरवण्याची संधी मिळाल्याची भावना अवर्णनीय होती.
कोणतीही कला आत्मसात करण्यासाठी तिची साधना, मेहनत खूप गरजेची असते. संगीतक्षेत्रात रियाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसंच मूर्तिकलेतही प्रचंड मेहनत आणि कित्येक वर्षांची साधना असते. एखादा मुरलेला कलाकार आणि मूर्तिकारच त्या मूर्तीमध्ये भाव आणि जीव ओतू शकतो. त्यांची कला बघताना खूप छान वाटलं. तिथं एक सिद्धेश नावाचा कलाकार होता. तो दहा वर्षांपासून मूर्ती घडवण्याचं काम करतोय. कलेची ही सगळी एक प्रक्रिया आहे. त्यात विजय खातू हे मूर्तिकलेतलं खूप मोठं नाव आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय जास्त बोलू? मात्र ते आणि मूर्तिकार जे काही करतात, ते खरंच अप्रतिम आहे.
लोकमान्य टिळकांनी सर्व नागरिकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सगळे एकत्र येतील आणि ब्रिटिशांविरोधात एक जनआंदोलन, एक मोठी ताकद उभी राहील, अशी भावना त्यामागे होती. आज मात्र गणेशोत्सवाचं रूप पूर्णपणे पालटलं. आजचं आधुनिक रूपही आवडतं. आजच्या गणेशोत्सवाला भव्यता आली; मात्र उत्सवाच्या नावाखाली काही गोष्टी होतात त्या मात्र खटकतात. कारण, भव्यतेसोबत पर्यावरणाचं मोठं नुकसान होतंय. डीजेमुळे ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणावर पसरतंय. तसंच प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीमुळेही पर्यावरणाचं खूप मोठं नुकसान होतंय. त्यामुळे मला पारंपरिक पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा करणं योग्य वाटतं.
गणेशोत्सव म्हटलं की, खूप सारी धम्माल असते; त्यामुळे साहजिकच खूप साऱ्या आठवणी आणि किस्से असतात. आमचं सारं कुटुंब सांगीतिक आहे. घरातला प्रत्येक जण कलाकार असून तितकाच मोठा गणेशभक्त आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात ५-६ दिवस कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र यायचे. संपूर्ण महाराष्ट्रभर संगीताच्या कार्यक्रमासाठी दौरे व्हायचे. त्या सगळ्या आठवणी गणेशोत्सवाच्या निमित्ताने दाटून येतात. शिवाय, माझे वडील गणेशभक्त आहेत. त्यांच्याकडून गणेश अथर्वशीर्ष, गणेशकथा ऐकायला मिळायच्या. गणेशोत्सवाच्या या सगळ्या आठवणी आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रसिकांना माझं सांगणं आहे की, बाप्पाचा फेस्टिव्हल खूप खूप एन्जॉय करा. मात्र, माझी एवढीच विनंती आहे की, ध्वनिप्रदूषण टाळा. उत्सवाच्या नावावर होणारा गोंधळ, मस्ती आणि डीजे टाळा. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या प्लॅस्टर आॅफ पॅरिस, थर्माकॉल आणि प्लॅस्टिकचा वापर टाळा. तसंच, सांगीतिक मैफिलीचा आनंद घ्या आणि बाप्पाच्या उत्सवात लीन व्हा. गणपती बाप्पा मोरया! शब्दांकन : सुवर्णा जैन