चित्रपटातून गड-किल्ल्यांचे महत्त्व समजेल
By Admin | Updated: January 26, 2017 06:54 IST2017-01-26T06:54:47+5:302017-01-26T06:54:47+5:30
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे करण्यासाठी अनेक गडकिल्ले बांधले आणि जिंकले. याच सर्व गडकिल्ल्यांचे महत्त्व अनेक

चित्रपटातून गड-किल्ल्यांचे महत्त्व समजेल
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे करण्यासाठी अनेक गडकिल्ले बांधले आणि जिंकले. याच सर्व गडकिल्ल्यांचे महत्त्व अनेक तरुणांना हेमंत ढोमे लिखित-दिग्दर्शित ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटाच्या माध्यमातून नक्कीच समजेल, असे प्रतिपादन कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी किल्ले पन्हाळा येथे या चित्रपटाच्या संगीत लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने केले. या चित्रपटातील अभिनेता जितेंद्र जोशी म्हणाला, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती-धर्मातील लोकांना घेऊन काम करत होते. त्यामुळे जातीपातीचे राजकारण महाराजांच्या नावावर करू नये. माणसाची जातपात पाहू नये, त्याचे कर्तृत्व पाहावे असे मला वाटते. या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे महत्त्व अधोरेखित होते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक मावळ्यांनी आपले रक्त सांडून हा इतिहास घडवला आहे, याची जाण प्रत्येकाने ठेवली पाहिजे.
किल्ले पन्हाळा येथे झालेल्या संगीत लोकार्पण सोहळ्याला या चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया, निर्माते गोपाल तायवाडे-पाटील आणि निर्माती वैष्णवी जाधव, चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे, कलाकार अनिकेत विश्वासराव, रसिका सुनील, पर्ण पेठे, संगीतकार अमितराज, पन्हाळा नगराध्यक्षा रूपाली धडेल, कोल्हापूर मनपा नगरसेवक सचिन पाटील, पन्हाळा नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका आणि असंख्य शिवभक्त उपस्थित होते. ‘बघतोस काय मुजरा कर’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ३ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. आम्ही सर्व कलाकार गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी इथून पुढे खासदार संभाजीराजेंसोबत काम करायला तयार आहोत, असा निर्धार अभिनेता जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे व संगीतकार अमितराज
यांनी केला.