महोत्सव ‘कलात्मक’ चित्रपटांचे व्यासपीठ

By Admin | Updated: December 24, 2015 01:28 IST2015-12-24T01:28:24+5:302015-12-24T01:28:24+5:30

वर्षभर साधारणपणे शंभर मराठी चित्रपट निघतात. त्यातले केवळ बोटावर मोजण्याइतकेच चित्रपट यशस्वी होतात आणि बाकी चित्रपट डब्यात जातात

Festival of 'Artistic' Movies | महोत्सव ‘कलात्मक’ चित्रपटांचे व्यासपीठ

महोत्सव ‘कलात्मक’ चित्रपटांचे व्यासपीठ

वर्षभर साधारणपणे शंभर मराठी चित्रपट निघतात. त्यातले केवळ बोटावर मोजण्याइतकेच चित्रपट यशस्वी होतात आणि बाकी चित्रपट डब्यात जातात. याचे प्रमुख कारण मार्केटिंगचा अभाव असे मानले जाते. चित्रपटनिर्मितीमध्येच निर्मात्याचा पैसा इतका खर्च झालेला असतो, की मार्केटिंगसाठी निर्मात्यांकडे बजेट नाही अशी स्थिती येते. त्यामुळे हे चित्रपट चांगले जरी असले तरी ते लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘कलात्मक’ चित्रपटांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गेल्या काही वर्षांमध्ये व्यावसायिक चित्रपटांच्या पठडीमध्ये न मोडणारे असे हे कलात्मक चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय आणि चित्रपट महोत्सवांचा पर्याय खऱ्या अर्थाने निर्मात्यांसाठी खुला झाला आहे. दोन ते तीन वर्षांचा आढावा घेतला असता असे कितीतरी वेगळ्या धाटणीचे मराठी चित्रपट महोत्सवांमध्ये दाखल झाले... जे प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरले आणि त्यांनी चक्क विविध पुरस्कारांवर आपली मोहोरदेखील उमटवली. यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते ७२ मैल एक प्रवास, ख्वाडा सारख्या चित्रपटांचे. हे चित्रपट प्रदर्शित होण्याआधी महोत्सवामध्ये गाजले... प्रेक्षकांसह आंतरराष्ट्रीय ज्युरींकडूनही चित्रपटाचे मोठे कौतुक झाले आणि या दोन्ही चित्रपटांना ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला... ‘कोर्ट’ हा चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित चित्रपट त्याचे उदाहरण. समाजव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने चक्क ‘आॅस्कर’पर्यंत मजल मारली. महोत्सवामध्ये यशस्वी ठरलेल्या अशाच काही चित्रपटांचा परामर्श.
येलो : एका विशेष मुलीची ही कहाणी. तिला पायावर उभे करण्यासाठी आईने केलेली धडपड आणि दोघींच्या नात्याचा भावनिक पट महेश लिमये यांनी दिग्दर्शकीय कौशल्यातून उलगडला. रितेश देशमुख आणि उमंग ठाकूर यांनी निर्मित केलेल्या या चित्रपटाने गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ६१ व्या नॅशनल फिल्म अ‍ॅवार्डमध्ये स्पेशल ज्युरी अ‍ॅवार्डवर या चित्रपटाने आपले नाव कोरले.
७२ मैल एक प्रवास : ७२ मैल एक प्रवास हा अशोक व्हिटकर यांच्या ‘७२ मैल’ या कादंबरीवर आधारित असलेला असा हा चित्रपट. राजीव पाटील दिग्दर्शित आणि अक्षयकुमार व अश्विनी यार्दी निर्मित असलेल्या हा चित्रपट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकल्यानंतर सर्वांच्याच पसंतीस उतरला आणि राष्ट्रीय पुरस्कारदेखील या चित्रपटाने मिळविला. स्मिता तांबे हिच्या भूमिकेचे यात विशेष कौतुक झाले.
फँड्री : ‘फँड्री’ हा नागराज मंजुळे यांचा पदार्पणातला हा चित्रपट. समाजातील जातभेदावर प्रखरपणे भाष्य करणारा हा चित्रपट पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दाखविल्यानंतर अनेकांच्या पसंतीस उतरला. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाने ग्रँंड ज्युरी पारितोषिक पटकावले. ६१व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘बेस्ट फिल्म आॅफ डायरेक्टर’साठी इंदिरा गांधी अ‍ॅवार्ड चित्रपटाने मिळविले.
कोर्ट : भारतीय न्यायव्यवस्थेचे वास्तववादी चित्रण करणाऱ्या चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या चित्रपटाची दखल आॅस्कर समितीला घेणे देखील भाग पडले. व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसह मुंबई फिल्म फेस्टिव्हल (इंटरनॅशनल कॉम्पिटिशन), इंटरनॅशनल अथय्या गोल्डन आॅरेंज फिल्म फेस्टिव्हल आणि सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आदी विविध महोत्सवांमध्ये हा चित्रपट सादर झाले आणि अनेक पुरस्कार या चित्रपटाने मिळविले. उत्कृष्ट फिल्म म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देखील याने मिळविला.
किल्ला : किल्ला या लहान मुलांचे भावविश्व उलगडणाऱ्या चित्रपटाने ६२ नॅशनल फिल्म अ‍ॅवॉर्ड्समध्ये मराठीतील बेस्ट फिचर फिल्मचा पुरस्कार मिळवला होता. तर ६४व्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलसाठीही या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. इतकेच नाही, तर बेस्ट फिल्म जनरेशन क प्लस सेक्शनमध्ये क्रिस्टल बेअर आणि जनरेशन क प्लस सेक्शनचा पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे. याशिवाय एशिया पॅसिफिक स्क्रीन अ‍ॅवॉर्ड्समध्ये बेस्ट युथ फिचर फिल्म म्हणूनही किल्लाचे नॉमिनेशन झाले होते.
ख्वाडा : धनगर समाजावर होत असलेल्या अत्याचारांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन भाऊराव कऱ्हाडे यांनी केले. या चित्रपटाला नॅशनल फिल्म अ‍ॅवॉडर््समध्ये स्पेशल ज्युरी आणि बेस्ट आॅडिओग्राफीचा पुरस्कार देण्यात आला. तर पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट डिरेक्टरचा पुरस्कारही कऱ्हाडे यांना मिळाला. याशिवाय महाराष्ट्र स्टेट फिल्म अ‍ॅवॉडर््समध्ये बेस्ट रुरल फिल्म, बेस्ट डेब्यू प्रोड्युसर, बेस्ट कॉश्च्युम, बेस्ट रूरल डिरेक्टर आणि बेस्ट मेकअप अशा तब्बल ५ पुरस्कारांवर या चित्रपटाने आपले नाव कोरले.
एक हजाराची गोष्ट
श्रीहरी साठे दिग्दर्शित ‘एक हजाराची नोट’ या चित्रपटाचा विषय आणि उषा नाईक यांच्या अभिनयामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने गाजला. ४५व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसह इटलीच्या इशचिया फिल्म फेस्टिव्हल, दादासाहेब इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आदी विविध महोत्सवांमध्ये हा चित्रपट केवळ झळकलाच नाही तर विविध पुरस्कारही या चित्रपटाने मिळविले.

Web Title: Festival of 'Artistic' Movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.