नट म्हणून कस लावणाऱ्या भूमिका पेलल्या
By Admin | Updated: July 17, 2015 04:50 IST2015-07-17T04:50:29+5:302015-07-17T04:50:29+5:30
‘सायलेन्स’, ‘बस्तीमध्ये मस्ती नाय’ अशा हटके डायलॉगबाजीने ‘टाइमपास-२’ गाजविणारा प्रियदर्शन जाधव रातोरात कॉमेडियन अॅक्टर म्हणून प्रकाशझोतात आला.

नट म्हणून कस लावणाऱ्या भूमिका पेलल्या
‘सायलेन्स’, ‘बस्तीमध्ये मस्ती नाय’ अशा हटके डायलॉगबाजीने ‘टाइमपास-२’ गाजविणारा प्रियदर्शन जाधव रातोरात कॉमेडियन अॅक्टर म्हणून प्रकाशझोतात आला. कॉमेडीशिवाय रोमँटिक भूमिकेतही प्रेक्षकांनी त्याला दिलखुलासपणे पसंती दिली; परंतु ‘टाइमपास-२’नंतर प्रियदर्शन करतोय तरी काय, असा त्याच्या चाहत्यांना प्रश्न आहे. नट म्हणून कस लावणाऱ्या कठीण भूमिकाही मला तितक्याच ताकदीने रूपेरी पडद्यावर साकारायची संधी मिळाली नाही, अशी खंत त्याने ‘सीएनएक्स’ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केली. कॉमेडियन अॅक्टर ही प्रतिमा पुसण्यासाठी गंभीर भूमिकांसाठी नाटकांकडे मोर्चा वळविलात का, या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणतो..
‘फू बाई फू ’, ‘शेजारी शेजारी.. सख्खे शेजारी’ आणि ‘टाइमपास-२’ अशा लहान व मोठ्या पडद्यावरील विनोदी धाटणीच्या भूमिका साकारल्यानंतर आपली इमेज केवळ एक कॉमेडीयनच होईल की काय याचे चान्सेस जास्त होते. ते टाळण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या भूमिका मिळविण्याचा प्रयत्न केला. ‘मिस्टर अॅन्ड मिसेस’ या नाटकात मला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आणि गंभीर प्रकृतीची भूमिका मी त्यात साकारली. चित्रपट, मालिकांमध्ये रोल मिळण्यामागची भूमिका विषद करताना प्रियदर्शन म्हणतो, आपण एक कलाकार म्हणून काम करीत असताना, प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देणे हे आपले कर्तव्य असते. कोणता रोल करायला मिळेल हे आपल्या हातात नसते. त्यामुळे मला आत्तापर्यंत मिळालेल्या भूमिका मी ड्रीमरोल असल्याप्रमाणेच साकारल्या. त्यामुळे माझ्यासाठी प्रत्येक रोल हा ड्रीमरोलच असतो. सुसाट नाटकाविषयी काय सांगशील असे विचारले असता तो म्हणतो, ‘सुसाट’ या नाटकामध्ये मला एका ध्येयवादी माणसाची अनोखी भूमिका साकारायला मिळत आहे. या नाटकाच्या दिग्दर्शनाची बाजूही सांभाळली आहे. एका ठिकाणाहून आपल्या ध्येयप्राप्तीसाठी निघालेला तरुण इच्छितस्थळी कधीच पोहोचू शकलेला नाही. त्यामुळे एकाच ठिकाणी संपूर्ण आयुष्य व्यथित करतो, अशी ती कथा आहे. ‘मस्का’ व ‘पुस्तक’ या आगामी चित्रपटांसाठी मी संवाद व पटकथा लेखनाचे काम करीत असल्याचे त्याने आवर्जून सांगितले.