दुबळे कथानक अन परफॉर्मन्सही
By Admin | Updated: March 5, 2016 12:17 IST2016-03-05T02:08:20+5:302016-03-05T12:17:59+5:30
सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या प्रकाश झा यांचे चित्रपट बहुधा बिहारची पार्श्वभूमी असणारे असतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी अजय देवगणसोबत गंगाजल चित्रपट बनविला होता.

दुबळे कथानक अन परफॉर्मन्सही
सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या प्रकाश झा यांचे चित्रपट बहुधा बिहारची पार्श्वभूमी असणारे असतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी अजय देवगणसोबत गंगाजल चित्रपट बनविला होता. काही पोलीस अधिकाऱ्यांकडून गुन्हेगारांच्या डोळ्यांत अॅसिड टाकण्याचे दृश्य यात होते. प्रकाश झा यांनी अनेक वर्षांनंतर आता ‘जय गंगाजल’ बनविला आहे. अर्थात अजय देवगणच्या गंगाजलशी याचा काही संबंध नाही. साम्य एवढेच आहे की, दोन्ही चित्रपटांत पोलिसांशी संबंधित भ्रष्टाचार, अंतर्गत कटकारस्थाने आणि गुन्हेगारांशी हातमिळवणी हे दिसून येते. या चित्रपटातही एक प्रामाणिक पोलीस अधिकारी बेईमान पोलीस आणि नेते व गुन्हेगार यांच्याशी दोन हात करतो.
हे कथानक पोलीस अधिकारी आभा कपूरचे (प्रियंका चोप्रा) आहे. तिची बदली बांदीपूर जिल्ह्यात होते. येथे पोलिसातील भ्रष्ट अधिकारी बी.एन. सिंह (प्रकाश झा), आमदार (मानव कौल) आणि छोटे आमदार (निनाद कामत) यांची प्रशासनावर पकड आहे. अर्थात ते मनमानीही करतात. कायदा तोडणाऱ्या या गटाशी आभा कपूर संघर्ष करते आणि कठीण परिस्थितीतही त्यांना आपली जागा दाखवून देते.
उणिवा : प्रकाश झा यांनी या वेळेस कथानकात नवे असे काही केले नाही, जे की पहिल्या चित्रपटात पाहिले नाही. आपल्याच चित्रपटातील कथानकाचा काही भाग पुन्हा दाखविण्यात त्यांनी संकोच केलेला नाही. प्रामाणिक पोलीस अधिकारी, बेईमान गुन्हेगार आणि नेते यांच्याशी संबंधित चित्रपटात जे काही दाखविले जाते ते सर्व यात दाखविले आहे. तेही वास्तवतेपासून दूर फिल्मी शैलीत.
प्रकाश झा यांनी नवीन काय केले असेल तर स्वत:ला अभिनेत्याच्या स्वरूपात पडद्यावर दाखविले आहे. विनासंकोच हे सांगितले जाऊ शकते की, ते अभिनयात फारसा प्रभाव पाडू शकलेले नाहीत. आगामी काळात हेच बरे राहील की त्यांनी स्वत:ला पडद्यापासून दूर ठेवावे. प्रियंका चोप्राच्या अभिनयातही सहजता किंवा नवेपणा वाटत नाही. असे वाटते की तिने मन लावून अभिनय केलेला नाही. प्रियंकाचे चाहते हा चित्रपट पाहून फारसे खूश होणार नाहीत. मानव कौल हे चांगले अभिनेते आहेत. पण, बहुतेक वेळा ओव्हर अॅक्टिंगचे शिकार होतात. निनाद यांचा अभिनय चांगला आहे. गीत-संगीताच्या बाबतीत चित्रपट सर्वसाधारणच आहे. एकूणच हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा प्रभाव पाडू शकणार नाही, असे दिसते. प्रियंका चोप्राचे चाहते कदाचित हा चित्रपट एकवेळेस पाहणे पसंत करतील.