उत्कंठावर्धक डावपेचांचे रहस्यरंजन!
By Admin | Updated: January 16, 2017 03:09 IST2017-01-16T03:09:11+5:302017-01-16T03:09:11+5:30
एखाद्या ओळखीच्या नाटकाचे नाव अचानक कानी पडताच, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि भूतकाळातल्या स्मृती नव्याने जाग्या होतात.

उत्कंठावर्धक डावपेचांचे रहस्यरंजन!
-राज चिंचणकर
एखाद्या ओळखीच्या नाटकाचे नाव अचानक कानी पडताच, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि भूतकाळातल्या स्मृती नव्याने जाग्या होतात. काही नाटकांच्या बाबतीत तर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. दीपस्तंभ या नाटकाचेच उदाहरण घेतले तर काही वर्षांपूर्वी या नाटकाने रंगभूमीवर जी काही जादू केली होती, ती विसरता येत नाही. नाटककार प्र.ल. मयेकर यांची दमदार लेखणी या नाट्यकृतीत अधिक टोकदार बनली होती आणि तिने रसिकांच्या मनावर गारुड केले होते. रंगभूमीवर हाच दीपस्तंभ आता नव्याने प्रकाशमान झाला असून, या नाटकातल्या वादळात भरकटलेल्यांना नव्याने दिशा दाखवण्याचे काम त्याने केले आहे.
थोडे रहस्य, थोडा थरार अशा खेळातून उत्कंठावर्धक बनलेल्या या नाटकाचे कथासूत्र मांडणे म्हणजे या दीपस्तंभालाच धक्का लावण्यासारखे होईल. अशा प्रकारच्या नाटकातल्या कथेची उत्कंठा अबाधित राहिली तरच ती शेवटपर्यंत टिकून राहते. प्र.ल. मयेकर यांनीही अशाच धाटणीतून या नाटकाचा सारा खेळ रंगवला आहे. यातल्या पात्रांकरवी त्यांनी या खेळात असे काही डावपेच टाकले आहेत, की सहज त्याचा उलगडा होऊ नये. अर्थात, अशा प्रकारच्या कथेचा पाया जितका भक्कम, तितकी त्यावर उभी राहणारी इमारतही भक्कम असणार. अगदी हेच या संहितेतून प्रकर्षाने उठून दिसते.
या संहितेला दिग्दर्शक जयंत जठार यांनी ज्या साच्यात बसवले आहे; तो साचा अफलातून आहे. संहितेच्या मागणीला रंगमंचावर मूर्त स्वरूप देणे म्हणजे काय याचे एक चांगले उदाहरण या नाटकाच्या निमित्ताने दिसून येते. दोन अंकांमध्ये पात्रांच्या माध्यमातून त्यांनी जो फरक आविष्कृत केला आहे, तो लक्षणीय आहे. उदाहरणच द्यायचे तर, या नाटकातले मध्यवर्ती पात्र असलेल्या मानसीचे देता येईल. संहितेबरहुकूम या व्यक्तिरेखेला त्यांनी दोन टोकांचे महत्त्व प्राप्त करून दिले आहे आणि ते या नाटकाचा प्लस-पॉइंट आहे. हा फरक ठळकपणे जाणवून दिल्याने नाटकाची उंची अधिक पटीने वाढली आहे. यात काही छोट्या उणिवा आहेत; मात्र नाटकाच्या एकंदर आवाक्यात त्या अस्पष्ट होत जातात. या नाटकाची कथा जुन्या काळात घडणारी आहे आणि ती नव्याने रंगभूमीवर आणताना दिग्दर्शकाने काळाची परिमाणे ओलांडलेली नाहीत. तशी त्याची आवश्यकताही नाही; परंतु त्यामुळे जुन्याचा गोडवा किंवा खुमारी नक्कीच राखली गेली आहे.
या नाटकात सर्व कलावंतांचे उत्तम टीमवर्क जुळलेले दिसून येत असले, तरी हे नाटक सर्वार्थाने नंदिता पाटकर हिचे आहे. तिने दोन्ही अंकांमध्ये वेगवेगळ्या शैलीच्या भूमिका रंगवत या नाटकात भन्नाट रंग भरले आहेत. पहिल्या अंकात मानसी साकारताना तिने राखलेला आब आणि साधेपणा म्हणजे सहजाभिनयाचे उदाहरण आहे, तर दुसऱ्या अंकात नंदिताने जो काही कायापालट केला आहे, तो आश्चर्यकारकच म्हणावा लागेल. उत्तम देहबोली आणि आवाजातल्या चढ-उतारांचे योग्य भान राखत नंदिताने या भूमिका रंगवल्या असून, दोन्ही अंकांत ती पूर्णत: छा गयी है असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अमृता मोरे हिने यात रंगवलेली निशासुद्धा दमदार असून, तिची अदाकारी लक्षवेधी आहे. शिरीष घाग यांनी यातला विश्वासराव टेचात उभा केला आहे. हरीश दुधाडे (नरेन) व सुशील इनामदार (डॉ. विक्र म) यांनी नाटकात अभिनयकौशल्याची दिमाखदार पेरणी केली आहे. सुजाता मराठे, संतोष परब व सुयश पुरोहित यांची साथ आहे.
प्रकाश मयेकर यांनी उभारलेल्या नेपथ्याने, राहुल रानडे यांच्या संगीताने आणि योगेश केळकर व रवी करमरकर यांच्या प्रकाशयोजनेने नाटकाचे रंगरूप चांगले खुलवले आहे. अंजली खोबरेकर यांची वेशभूषा, तसेच कृष्णा बोरकर व विद्याधर भट्टे यांची रंगभूषासुद्धा अचूक परिणाम साधणारी आहे. अनामिका-रसिका आणि सरगम-साईसाक्षी यांनी या नाटकाचा पडदा उघडून, रंगभूमीवर बऱ्याच काळानंतर रहस्यरंजनात्मक अशा नाट्यकृतीच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळवून दिला आहे.