बॉलीवूडला दरवर्षी मिळते प्रेक्षकांकडून ‘ईदी’

By Admin | Updated: July 8, 2016 03:17 IST2016-07-08T03:17:56+5:302016-07-08T03:17:56+5:30

सलमान खानचा ‘सुलतान’ हा चित्रपट ईदच्या निमित्ताने प्रदर्शित झाला आहे. याआधीही सलमानचे वाँटेड, दबंग, किक, बॉडीगार्ड, एक था टायगर, बजरंगी भाईजान यांसारखे चित्रपट

Every year Bollywood receives 'Idi' | बॉलीवूडला दरवर्षी मिळते प्रेक्षकांकडून ‘ईदी’

बॉलीवूडला दरवर्षी मिळते प्रेक्षकांकडून ‘ईदी’

सलमान खानचा ‘सुलतान’ हा चित्रपट ईदच्या निमित्ताने प्रदर्शित झाला आहे. याआधीही सलमानचे वाँटेड, दबंग, किक, बॉडीगार्ड, एक था टायगर, बजरंगी भाईजान यांसारखे चित्रपट ‘ईद’लाच प्रदर्शित झाले होते. ईदला ‘बिग बजेट’ आणि चांगली स्टारकास्ट असलेले चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंड हा काही बॉलीवूडमध्ये आताच रूजू झालेला नाही. नव्वदीच्या दशकापासूनच आपल्याला हा ट्रेंड पाहायला मिळतो. पण पूर्वी ‘ईद’ला चित्रपट प्रदर्शित झाले तरी ते हिट होतीलच असे नव्हते. पण मल्टिप्लेक्सच्या आगमनानंतर ही परिस्थिती खूप बदललेली आहे. २००५ पर्यंत मल्टिप्लेक्सचे चांगलेच पेव आपल्याकडे फुटलेले होते. त्यामुळे त्यानंतरच्या ईदला प्रदर्शित झालेल्यांपैकी अनेक चित्रपट हे हिट ठरले आहेत. 1991 पासून ईदला प्रदर्शित झालेल्या चित्रपटांकडे आणि त्यांच्या व्यवसायाकडे एक नजर टाकूया...

या सगळ्या चित्रपटांच्या व्यवसायाकडे आपण पाहिल्यास एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते. २००५ सालच्या आधी ईदच्या दिवशी प्रदर्शित होऊनही ‘बॉक्स आॅफिस’वर प्रचंड कमाई करणारे खूपच कमी चित्रपट आहेत. कभी खुशी कभी गम, कल हो ना हो, वीर झारा, गरम मसाला, डॉन, भुलभूलय्या असे या दिवशी प्रदर्शित झालेले चित्रपट हिट ठरले. पण २००९ च्या ईदनंतर ईद ही केवळ सलमानच्या चित्रपटांसाठी राखीव असलेली आपल्याला पाहायला मिळाली. ‘वाँटेड’नंतर प्रत्येक रमजान ईदला आलेल्या सलमानच्या चित्रपटाने तिकीटबारीवर प्रचंड कमाई केली. केवळ २०१३ ला शाहरूख खानचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानेदेखील रेकॉर्डतोड कमाई केली. त्यामुळे २००९ नंतरची प्रत्येकच ‘रमजान ईद’ बॉक्स आॅफिससाठी खूपच लकी ठरली. या वर्षी ईदला प्रदर्शित झालेल्या ‘सुलतान’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३५ कोटींहून अधिक गल्ला जमवला. आज सलमान ‘ईदचा बादशहा’ मानला जात असला तरी सलमाननेही याआधी ईदला अनेक फ्लॉप चित्रपट दिले आहेत. ईद, दिवाळी, ख्रिसमस या सणांना आपल्या कुटुंबासमवेत अथवा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत चित्रपट पाहायला जाणाऱ्या लोकांची संख्या ही खूप असते. त्यामुळे या दिवशी चित्रपट प्रदर्शित करणे हे निर्मात्यांसाठी फायदेशीर असते. अनेक निर्माते कित्येक महिने आधीच ही तारीख ठरवतात.

तीन सण तीन खानांच्या नावावर
गेल्या १० वर्षांत आपल्याकडे मल्टिप्लेक्सची संख्या वाढली आहे. येथील तिकीटदर हे खूप जास्त असतात. तसेच एकाच दिवसात अनेक शो या मल्टिप्लेक्समध्ये दाखवले जातात. सणाच्या दिवशी लोक आवर्जून चित्रपट पाहायला जातात. त्यामुळे या दिवशी चित्रपट प्रदर्शित झाला की, या मल्टिप्लेक्सच्या दरांमुळे पहिल्या तीनच दिवसांत चित्रपटाची करोडोची कमाई होते. त्यामुळे या दिवशी चित्रपट प्रदर्शित करणे हे व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय चांगले असते. आज सलमान खान, आमीर खान आणि शाहरूख खान या तीन खानांचा बॉलीवूडवर दबदबा आहे. त्या तिघांपैकी कोणत्याही दोघांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले तर एकाच्या चित्रपटाला फटका बसतो. त्यामुळे या तिघांनी प्रत्येक सण वाटून घेतला असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सण म्हटला की, दोन दिवस तरी सुटी असते. त्यामुळे या दोन-तीन दिवसांत चित्रपटाचा व्यवसाय चांगला होतो. सलमानचे चित्रपट ईदला, शाहरूखचे दिवाळीत आणि आमीरचे चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित होत असल्याचे आपल्याला गेल्या ६-७ वर्षांत पाहायला मिळत आहे. या तिघांसमोर कोणत्या इतर अभिनेत्याचा चित्रपट तग धरू शकत नाही हे बॉलीवूडमधील मंडळींना चांगलेच माहीत असल्याने निर्मातेही त्यांच्यासोबत चित्रपट प्रदर्शित करणे टाळतात. आपल्या बॉलीवूडच्या चित्रपटांचा विचार केला तर वर्षाच्या मध्यानंतर आलेले चित्रपट हे बॉक्स आॅफिसवर अधिक चांगली कमाई करतात असेच आपल्याला पाहायला मिळते. आणि हे तिन्ही सण हे याच दरम्यान येत असल्याने त्याचा फायदाही चित्रपटांना नक्कीच होतो. - एन.पी. यादव, ट्रेड अ‍ॅनालिस्ट

1991 : अजूबा - फ्लॉप
1991 : अफसाना प्यार का - फ्लॉप
1992 : बेटा - ब्लॉकबस्टर हिट
1993 : क्षत्रिय - फ्लॉप
1993 : अनारी - हिट
1994 : लाडला - सुपरहिट
1995 : सुरक्षा - फ्लॉप
1995 : पांडव - फ्लॉप
1995 : नाजायज - अ‍ॅव्हरेज
1997 : जुडवा - हिट
1997 : यशवंत - सेमी हिट
1998 : विनाशक - फ्लॉप
1998 : हफ्ता वसुली - फ्लॉप
1999 : हम आपके दिल में रहते है - सुपरहिट
1999 : आ अब लौट चले - अ‍ॅव्हरेज
2000 : मेला - फ्लॉप
2000 : खिलाडी 420 - फ्लॉप
2001 : कभी खुशी कभी गम -
आॅल टाइम ब्लॉकबस्टर
2002 : कर्ज - फ्लॉप
2003 : कल हो ना हो - हिट
2004 : वीर झारा - सुपरहिट
2004 : ऐतराज - अ‍ॅव्हरेज
2005 : गरम मसाला - हिट
2005 : क्योंकी - फ्लॉप
2006 : डॉन - हिट
2006 : जान - ए - मन - फ्लॉप
2007 : भूलभुलय्या - हिट
2007 : लागा चुनरी मैं दाग - फ्लॉप
2008 : किडमॅप - फ्लॉप
2008 : द्रोणा - फ्लॉप
2009 : वाँटेड - हिट
2009 : दिल बोले हडिप्पा - फ्लॉप
2010 : दबंग - ब्लॉकबस्टर
2011 : बॉडीगार्ड - ब्लॉकबस्टर
2012 : एक था टायगर - ब्लॉकबस्टर
2013 : चेन्नई एक्स्प्रेस - ब्लॉकबस्टर
2014 : किक - ब्लॉकबस्टर
2015 : बजरंगी भाईजान -
आॅल टाइम ब्लॉकबस्टर

Web Title: Every year Bollywood receives 'Idi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.