डबल रोलमध्ये नायिकांचाही बोलबाला
By Admin | Updated: October 5, 2015 12:26 IST2015-10-04T22:09:52+5:302015-10-05T12:26:46+5:30
चित्रपटसृष्टीत स्वत:च्या कामाचे योग्य मूल्यमापन व्हावे, असे वाटत असेल तर आपल्यातील गुणांचे वेगळेपण सिद्ध करावे लागते. अभिनय, संवाद, विचारस्पष्टता यांच्यामुळे भूमिका समृद्ध होत जाते.

डबल रोलमध्ये नायिकांचाही बोलबाला
चित्रपटसृष्टीत स्वत:च्या कामाचे योग्य मूल्यमापन व्हावे, असे वाटत असेल तर आपल्यातील गुणांचे वेगळेपण सिद्ध करावे लागते. अभिनय, संवाद, विचारस्पष्टता यांच्यामुळे भूमिका समृद्ध होत जाते. चित्रपट तयार होण्याच्या प्रक्रियेत तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका पार पाडत असले, तरीही जो प्रभाव अभिनयाने पडतो तो इतर कशानेही निर्माण करता येत नाही. त्यामुळे हाच अभिनयातील फरक स्पष्ट करण्यासाठी काळाच्या ओघात दुहेरी भूमिका ही संकल्पना पुढे आली. याच क्रमात आता सलमान खान ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये डबल रोलमध्ये दिसणार अशी चर्चा आहे. डबल रोल म्हटले की तशीही नायकांचीच चर्चा होेते. परंतु बॉलीवूडमध्ये काही नायिका अशाही आहेत, ज्यांनी अशा भूमिकांचे अक्षरश: सोने केले आहे. यात राखी गुलजारपासून ते कंगणा राणावतपर्यंत अनेकींचा समावेश आहे. त्यावरच एक नजर...
माधुरी दीक्षित : ‘संगीत’ आणि ‘आँसू बने अंगारे’ या चित्रपटात माधुरी दीक्षित हिने डबल रोल साकारला आहे. ‘आँसू बने अंगारे’मध्ये ती आई आणि मुलीची भूमिका साकारते. तिची आई आणि दीर यांच्याविरोधात ती लढा देते. रवी (जितेंद्र) सोबत होणाऱ्या लग्नात बाधा येऊ नये, यासाठी प्रयत्न करते. तिच्यावर होत असलेल्या अन्यायाला ती विरोध करते.
राखी : ‘शर्मिली’ चित्रपटात कामिनी आणि कांचन या दोन जुळ्या बहिणींची भूमिका राखी गुलजार यांनी अजरामर केली. शशी कपूर एका बहिणीच्या प्रेमात पडतो आणि त्याला कळते, की तो दुसऱ्या बहिणीशीच लग्न करतो आहे. त्यांच्या चेहऱ्यांमधील वेगळेपणामुळे हे सारे घडते आहे, हे त्याला कळून चुकते. या चित्रपटातील राखीचा अभिनय अतिशय भावस्पर्शी होता.
काजोल : दुश्मन चित्रपटात काजोलने अतिशय उत्कृष्ट अभिनयाचे सादरीकरण केले आहे. तनुजा चंद्रा यांच्या या चित्रपटात तिने सोनिया आणि नैना या जुळ्या बहिणींची भूमिका साकारली आहे. सोनियावर झालेल्या बलात्काराचा बदला तिची बहीण नैना घेते. या चित्रपटासाठी काजोलला स्टार स्क्रीन अॅवॉर्ड फॉर बेस्ट अॅक्ट्रेस मिळाला.
दीपिका पदुकोन : सध्याच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक दीपिका पदुकोन आहे. दर्जेदार अभिनय, योग्य स्क्रिप्ट निवड यांच्यामुळे तिने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. तिचा ‘पीकू’ मधील अभिनय कौतुकास्पद होता तसेच ‘चांदणी चौक टू चायना’मध्ये तिने दुहेरी भूमिका साकारली आहे.
श्रीदेवी : ‘खुदा गवाह’, ‘लम्हे’ आणि ‘चालबाज’ यासारख्या चित्रपटांमध्ये श्रीदेवीने दुहेरी भूमिका साकारली आहे. ‘सीता और गीता’ या हेमा मालिनीच्या चित्रपटाची प्रेरणा घेऊन श्रीदेवीने तिने साकारलेल्या भूमिकांनाही न्याय दिला. तिने यात मंजू नावाच्या डान्सरचा अभिनय केला असून, श्रीमंत सूरज (सनी देओल) च्या प्रेमात पडते. दुसरीकडे अंजू तिच्या काकाच्या जाचातून सुटते आणि मंजू तिला घरी घेऊन येते. दोघी जुळ्या बहिणी शेवटी एकत्र येतात. -
हेमा मालिनी : दिलीप कुमारच्या ‘राम और श्याम’ची प्रेरणा घेऊन हेमा मालिनीचा ‘सीता और गीता’ हा चित्रपट आला. हेमा मालिनीच्या करिअरमधील हा चित्रपट तिच्या सर्वात आवडीचा चित्रपट आहे. गीता एकदम बिनधास्त तर सीता शांत, सुस्वभावी असते. गीताच्या येण्यामुळे कॉमेडीला सुरुवात होऊन सीतावरील सर्व अत्याचार संपतात, असे या चित्रपटात दाखविण्यात आले होते.
कंगणा राणावत : कंगणा राणावतने आतापर्यंत निवडक काही चित्रपटांमध्येच काम केले असून त्या चित्रपटाचा दर्जा, कथानक बघून त्यात काम करायचे की नाही हे ती ठरवते. तिला ‘फॅशन’,‘ क्वीन’ या चित्रपटांसाठी नॅशनल अॅवॉर्डने सन्मानित केले आहे. ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’मध्ये तिने दुहेरी भूमिका साकारली आहे. यातील तिच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले.