‘छोट्या पडद्या’वर दिवाळी धमाका
By Admin | Updated: October 29, 2016 03:43 IST2016-10-29T03:43:58+5:302016-10-29T03:43:58+5:30
दिवाळी हा सण उत्साहाचा, जल्लोषाचा आणि सुखसमृद्धीचा. रोषणाई, आकाशकंदील, फराळ म्हणजे दिवाळी. सारे वातावरण मंगलमय आणि आसमंतात फक्त आनंदीआनंद म्हणजे दीपावली.

‘छोट्या पडद्या’वर दिवाळी धमाका
- Suvarna jain
दिवाळी हा सण उत्साहाचा, जल्लोषाचा आणि सुखसमृद्धीचा. रोषणाई, आकाशकंदील, फराळ म्हणजे दिवाळी. सारे वातावरण मंगलमय आणि आसमंतात फक्त आनंदीआनंद म्हणजे दीपावली. वर्षातून एकदा येणाऱ्या या दिव्यांच्या सणाच्या काळात वातावरण आल्हाददायक झाल्याचे पाहायला मिळते. तेजपर्व दिवाळीचा हा उत्साह घरोघरी पाहायला मिळतो. याच उत्साहापासून छोटा पडदा तरी कसा दूर राहील. छोट्या पडद्यावरही प्रकाशाचे पर्व असलेल्या दिवाळीचे जोरदार सेलिब्रेशन केले जाते.
रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी कलाकार मंडळी छोट्या पडद्यावरील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून दिवाळी सण साजरा करतात. महाराष्ट्राचा महामंच ‘कोण होईल मराठी करोडपती’च्या सेटवरही दीपावलीचे धमाकेदार सेलिब्रेशन करण्यात आले. या मराठमोळ्या रिअॅलिटी शोच्या सेटवर दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर आणि त्यांच्या पत्नी-अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी हजेरी लावली. या विशेष भागात मेधा मांजरेकर यांचे अनोखे रूप पाहायला मिळाले. ‘ये रातें, ये मौसम’ हे गाजलेले हिंदी गाणे महेश मांजरेकर यांच्यासाठी गाऊन जणू त्यांना पाडवा भेटच दिली. शोच्या माध्यमातून मांजरेकर दाम्पत्याने तब्बल साडेसहा लाख रुपयांची मदत एका सामाजिक संस्थेला केली.
या शोच्या सेटवर आणखी एका मराठी सेलिब्रेटीने हजेरी लावून दिवाळी सेलिब्रेशनला चार चाँद लावले. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिचा भाऊ संदेशसह ‘कोण होईल मराठी करोडपती’च्या सेटवर हजेरी लावली. सोनाली आणि संदेश पहिल्यांदाच या निमित्ताने एकत्र पाहायला मिळणार आहेत. दोघांनीही सेटवर भाऊबीजेचे सेलिब्रेशन तर केले आहेच; शिवाय गरजूंना मदतही केली.
अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर
ही जोडी छोट्या पडद्यावर मोठ्या आनंदात दिवाळी सेलिब्रेशनमध्ये रमली आहे. ‘लेक माझी लाडकी’ मालिकेच्या टीमसह जल्लोषात सेलिब्रेशन करण्यात आले. विशेष म्हणजे, वास्तवात पती पत्नी असलेली नारकर जोडी मालिकेतही पती-पत्नीची भूमिका साकारत आहेत. त्यामुळे अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर या दोघांचे दिवाळी सेलिब्रेशन रसिकांना अनुभवता येणार आहे. पाडव्यानिमित्त ऐश्वर्या नारकर यांनी अविनाशचे औक्षण केले. ऐश्वर्याला अविनाशने दिवाळीनिमित्त एक खास गिफ्टही दिले आहे. अशा या पती-पत्नींच्या आयुष्यातील प्रेम, विश्वास आणि आदर वृद्धिंगत करणारा दिवाळी पाडवा छोट्या पडद्यावर रंगणार आहे.
छोट्या पडद्यावरील ‘गणपती बाप्पा मोरया’ या
मालिकेतही दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला. श्रीगणेश आणि महादेव यांना पार्वती उटणे लावून अभ्यंगस्नान
घालते. त्यानंतर पाडव्याच्या दिवशी पार्वती महादेवाला औक्षण करून खीर भरवते. त्याबदल्यात महादेव पार्वतीला डमरू आणि त्रिशूल यांपासून बनवलेले मंगळसूत्र भेट देतात. ‘गणपती बाप्पा मोरया’ मालिकेत भाऊबीजसुद्धा तितक्याच उत्साहात साजरी झाली.
‘गं सहाजणी’ मालिकेतही दिवाळी धमाका पाहायला मिळाला.
या मालिकेतील एम.यू.पी. अर्थात मंजुळाबाई उसने परतेफेड बँकेत हास्याचे कारंजे उडाले. कामिनी, मीना, दामिनी,
सुश्मिता, भीमा आणि झुबेदा या सहा मैत्रिणींनी बँकेच्या गेट टुगेदर पार्टीत रंगलेल्या स्पर्धेत बक्षिसांची लयलूट केली.
बँकेचे खडूस मॅनेजर आणि मालिकेतल्या गं सहाजणी यांच्यात एक खास स्पर्धाही रंगली. दिवाळीच्या या खास भागासाठी एम.यू.पी. बँकेत खास आणि तितकीच आकर्षक सजावट करण्यात आली होती.
‘श्रावणबाळ रॉकस्टार’ या मालिकेच्या टीमनेही दिवाळीचे सेलिब्रेशन करताना सर्वच कलाकारांनी भरपूर मस्ती केली. या मालिकेतील केतकी अर्थात कामिनी ही उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नर्तिका आहे, हे जगजाहीर आहे. मात्र, ती एक उत्तम गायिकासुद्धा आहे, हे या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये दिसून आले. सर्वांसह धम्माल मस्ती करताना तिने सुंदर गाणे गाऊन मनोरंजन केले. कामिनीप्रमाणेच संचिता अर्थात नीतूही एक उत्तम मिमिक्री आर्टिस्ट आहे. तिने या वेळी डोरेमॉन कार्टूनमधील नोबेतोच्या हुबेहूब आवाजात दिवाळी शुभेच्छा देऊन साऱ्यांनाच आश्चयार्चा सुखद धक्का दिला.