धोनीचा स्क्रीनवरही 'मास्टर स्ट्रोक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2016 05:36 IST2016-10-07T05:36:43+5:302016-10-07T05:36:43+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या बायोपिकने बॉक्स आॅफिसवर

Dhoni's screen 'master stroke' | धोनीचा स्क्रीनवरही 'मास्टर स्ट्रोक'

धोनीचा स्क्रीनवरही 'मास्टर स्ट्रोक'

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या बायोपिकने बॉक्स आॅफिसवर सध्या धूम उडवून दिली असून, ओपनिंग वीकेंडमध्ये ६६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे खिलाडी अक्षयकुमार, शाहरूख खान यांना पिछाडीवर टाकून हा चित्रपट येत्या काही दिवसांत अनेक रेकॉर्ड ब्रेक करेल, असा अंदाज वर्तवला जातो आहे.
नीरज पांडे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ४० देशांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. या बायोपिकमध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने धोनीची भूमिका अतिशय खुबीने साकारल्याने त्याला क्रिकेट जगतासह क्रिकेट फॅन्सकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २१.३ कोटी रुपयांची ओपनिंग केल्याने या वर्षी रिलीज झालेल्या शाहरुखच्या ‘फॅन’ला (१९ कोटी) व अक्षयच्या ‘रुस्तम’ला मागे टाकले आहे. मात्र, ‘सुलतान’चा
(३० कोटी) रेकॉर्ड मोडण्यात चित्रपट अपयशी ठरला आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारीदेखील या चित्रपटाने कमाईचा आकडा कायम ठेवून २०.६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. रविवारी (२४.१० कोटी) कमाईत भर पडल्याने तीनच दिवसांत तब्बल ६६ कोटी रुपये कमावले आहेत.
याअगोदर सलमानचा ‘सुलतान’ २०१६मध्ये सर्वाधिक ओपनिंग वीकेंडमध्ये कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाने १८०.३ कोटी रुपयांची कमाई केली होती. दरम्यान, हा चित्रपट ‘सुलतान’च्या कमाईच्या तुलनेत निम्म्यावर असला, तरी ओपनिंग वीकेंडमध्ये कमाई करण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे, तर पहिल्याच वीकेंडमध्ये ५० कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला आहे. या अगोदर ‘सुलतान, हाउसफुल-३, फॅन आणि रुस्तम’ या चित्रपटांनी ५० कोटींचा गल्ला
जमवला होता.
दरम्यान, चित्रपटाची कथा आणि त्याला मिळत असलेला प्रतिसाद पाहता, हा चित्रपट येत्या काळात कमाईचे अनेक रेकॉर्ड ब्रेक करेल, असे बोलले जात आहे. २०१६मध्ये ‘सुलतान’ने ४५० कोटींपेक्षा अधिक, तर अक्षयच्या ‘रुस्तम’ने १२९ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे हा चित्रपट किती कमाई करेल, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. ‘लोकल बॉय’ला पसंती
रांची येथे लोकल बॉय
महेंद्रसिंह धोनी याचा बायोपिक बघण्यासाठी तुफान गर्दी होत आहे. तरुणांमध्ये या चित्रपटाबाबत विशेष उत्साह बघावयास मिळत आहे. रांचीमधील बहुतेक मल्टिप्लेक्स आणि थिएटरमधील शो हाउसफुल जात आहेत. रविवारी बऱ्याचशा मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांच्या तिकिटांसाठी रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या.
क्रिकेट सिनेमांमध्ये धोनी आघाडीवर
आतापर्यंत क्रिकेट या विषयावर आधारित असलेल्या चित्रपटांमध्ये धोनीचा बायोपिक कमाईच्या बाबतीत आघाडीवर आहे. नुकताच रिलीज झालेल्या माजी कर्णधार अजहरुद्दीनवर आधारित असलेल्या ‘अजहर’ या बायोपिकला प्रेक्षकांनी सपशेल नाकारले होते. मात्र, धोनीच्या बायोपिकने प्रेक्षकांना चित्रपटागृहात आणण्यास भाग पाडले.

Web Title: Dhoni's screen 'master stroke'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.