वास्तव शोधाचे संदर्भासहित स्पष्टीकरण

By Admin | Updated: June 13, 2015 04:21 IST2015-06-13T04:21:44+5:302015-06-13T04:21:44+5:30

अनेकविध स्तरांचा मिळून समाज बनला आहे आणि या समाजातला प्रत्येक जण व्यवस्थेच्या जाळ्यात अलगद सापडलेला आहे.

Contextual explanation of the real search | वास्तव शोधाचे संदर्भासहित स्पष्टीकरण

वास्तव शोधाचे संदर्भासहित स्पष्टीकरण


अनेकविध स्तरांचा मिळून समाज बनला आहे आणि या समाजातला प्रत्येक जण व्यवस्थेच्या जाळ्यात अलगद सापडलेला आहे. या जाळ्यात सर्वसामान्य माणूस अधिकाधिक गुरफटला जातो आणि लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असलेला पत्रकार सामान्यजनांच्या बाजूने उभे राहत जागल्याची भूमिका पार पाडतो. ‘नागरिक’ या चित्रपटात एक पत्रकार स्वत:चे कर्तव्य बजावत राजकारण व समाजकारणाचे खरे चित्र मांडत जातो आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकत हा चित्रपट वास्तव शोधाचे संदर्भासहित स्पष्टीकरण देत एकूणच व्यवस्थेविषयी भाष्य करत जातो.
श्याम जगदाळे हा एका दैनिकाचा मुख्य राजकीय वार्ताहर आहे. त्याच्या ‘नागरिक’ या सदरातून तो समाजातले एक प्रकरण उघडकीस आणतो. राजकारण्यांचा पोलखोल करत असतानाच राजकारणी व बिल्डर्सच्या अभद्र युतीवरसुद्धा तो प्रकाश टाकतो. दुसरीकडे, एका पक्षाचा सर्वेसर्वा असलेला विकास पाटील हा प्रचंड महत्त्वाकांक्षी असा राजकारणी आहे. त्याची आकांक्षा आणि श्यामची लेखणी यांचा टकराव व्यवस्थेच्या कॅनव्हासवर सतत होत राहतो. यातून निर्माण होते ते ईर्षा आणि संघर्षाचे जाळे. राजकारण्यांच्या इच्छा-आकांक्षा, तत्त्वनिष्ठ पत्रकारितेचा घेतलेला वसा आणि सर्वसामान्यांचे रोजचे जगणे याचा परामर्श घेत या ‘नागरिक’चे पाऊल पुढे पडत जाते.
पत्रकारितेला समाजमनाचा आरसा असे म्हटले जाते आणि या आरशात या चित्रपटाचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. पण हे प्रतिबिंब धूसर वाटेवरून मार्गक्रमण करत राहते. दिग्दर्शक जयप्रद देसाई याने एक हटके विषय निवडून त्यावर घेतलेली मेहनत स्पष्ट दिसते. समाज, व्यवस्था, राजकारण, भ्रष्टाचार, सामान्य माणूस आणि त्यांच्या एकूणच अस्तित्वाचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटाचे लेखक महेश केळुसकर यांनी केला आहे. त्यांचे संवाद थेट मनात उतरत जातात. त्यांच्यासह जयप्रद देसाईने पटकथा लिहिली आहे. पण ती सलग न वाटता तुटक वाटते. यात काहीवेळा संदर्भ शोधावे लागतात. जयप्रदची दिग्दर्शक म्हणून कामगिरी चांगली आहे. टाईट क्लोजअप्सचा मुक्त वापर करून प्रत्येक व्यक्तिरेखा ठसठशीत कशी होईल याचा केलेला प्रयत्न जाणवतो आणि प्रत्येक पात्र केवळ मुद्र्राभिनयातून जास्तीतजास्त कसे व्यक्त होईल, यावरचा त्याचा कटाक्षही लक्षात येतो. चित्रपटात वास्तवदर्शीपणाचे प्रतिबिंब त्याने प्रत्येक फ्रेममधून घडवले आहे. मात्र कलात्मक मूल्य वाढवत सामाजिक प्रतिबिंब घडवण्याच्या प्रयत्नात चित्रपट अनेकदा चित्रात्मक चौकटीमध्ये गुंतून पडल्यासारखा वाटतो. कलात्मकतेचा यातला डोस जरा जड झाला आहे.
देवेंद्र गोलतकर यांचा कॅमेरा चित्रपटभर भोवतालचे सूक्ष्म चित्रीकरण करत फिरला आहे. परिणामी, यात बारीकसारीक गोष्टी भन्नाट टिपल्या गेल्या आहेत. दिग्दर्शकाचीही कॅमेऱ्यावर मोठी भिस्त आहे आणि तो त्याच्या प्रेमात पडल्याचेही अनेक ठिकाणी अधोरेखित होत जाते. रसूल पुकुट्टी व अमृत प्रीतम यांची साऊंड डिझायनिंगची कामगिरी खिळवून ठेवणारी आहे.

Web Title: Contextual explanation of the real search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.