दोन गायकींचा संगम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 02:21 IST2017-02-27T02:21:26+5:302017-02-27T02:21:26+5:30
विसाव्या शतकात हिंदुस्थानी संगीतात अनेक महान कलाकार होऊन गेले.

दोन गायकींचा संगम
-अमरेंद्र धनेश्वर
विसाव्या शतकात हिंदुस्थानी संगीतात अनेक महान कलाकार होऊन गेले. ज्या काळात संप्रेषणाची फार साधने नव्हती आणि फक्त खासगी मैफली होत असत त्या काळातही मौखिक प्रसिद्धीद्वारे कलाकारांची कीर्ती एका महानगरातून दुसऱ्या महानगरात पोहोचत असे. अशा माध्यमातून सुरुवातीला गौहर जान आणि मौजुद्दीन आणि त्याचबरोबर फैयाज खान खाँसाहेबांची कीर्ती मुंबई आणि कोलकाता शहरात पसरली. त्यामुळे तिथे सुमारे १९४५ पर्यंत फैयाज खान यांचे राज्य होते.
फैयाज खान यांचे निधन १९४९ मध्ये झाले. त्यानंतर मात्र बडे गुलाम अली खान आणि अमीर खान या दोन उस्तादांचे वर्चस्व कोलकाता शहरावर होते. दोघांच्या गायकीत आणि व्यक्तिमत्त्वात प्रचंड तफावत आणि फरक. बडे गुलाम हे अत्यंत रंगतदार आणि बहिर्मुखी. याउलट अमीर खान हे अंतर्मुखी आणि चिंतनशील. पण तरीही दोघांना तितकेच चाहते आणि रसिक कोलकात्यात भेटले म्हणून ते तिथेच वास्तव्य करून राहिले. त्यामुळे दोघांकडेही शिकणारे कलाकार तिथे आढळतात.
संगीता बंदोपाध्याय या पंजाब घराण्याचे ज्येष्ठ तबलावादक शंखो चटर्जी यांच्या कन्या. लहानपणापासून त्यांच्यावर उत्तम संगीताचे संस्कार झाले. अमीर खान यांचे शिष्य कमल बॅनर्जी यांच्याकडे त्या शिकल्या. त्यानंतर बडे गुलामांच्या गायकीचे संस्कारही त्यांच्यावर झाले. खाँसाहेबांचे शिष्य आणि सुपुत्र मुनब्बर अली खान यांच्याकडे त्या पतियाळा घराण्याची गायकी शिकल्या. या दोन्ही गायकींचा मिलाफ त्यांच्या गायनात दिसतो. नुकतेच ठाणे (पू.) परिसरातील ‘नादब्रह्म’ सभागृहात त्यांचे गायन ऐकले. त्यांनी सुरुवातीला ‘मधुवंती’ रागातील बडा ख्याल गायला. शुद्ध रिषभ, शुद्ध धैवत आणि मधूनच डोकावणारा कोमल निषाद असा हा राग आहे. या रागाचे मोहक रूप गायनातून प्रकट झाले.
बडे गुलाम अलींनी प्रसिद्ध केलेला ‘कौथिकध्वनी’ हा राग त्यांनी ऐकवला. अत्यंत भावस्पर्शी असे हे गायन होते. बासरीवादक किरण हेगडे यांनी ‘मारवा’ वाजवला. रागाचा मूड त्यांनी छान सांभाळला. मिलिंद नाईक (तबला) आणि मंदार दीक्षित (हार्मोनियम) यांची साथ उत्तम होती.
>कुमार गंधर्व फाउंडेशन
‘कुमार गंधर्व फाउंडेशन’तर्फे दरवर्षी कुमार गंधर्व सन्मान देण्यात येतो. ५१ हजार रु. रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवारी नेहरू केंद्र वरळी या संकुलातील ‘हॉल आॅफ कल्चर’मध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. ‘हिंदुस्थानी संगीतातील साहित्याचे महत्त्व’ या विषयावर एक परिसंवादही होणार असून त्यात विदुषी नीला भागवत, श्यामरंग शुक्ल, डॉ. भुवनेश्वर तिवारी, प्रभाकर गुप्ता आणि पांडुरंग ठाकरे सहभागी होणार आहेत.