पौगंडावस्थेतील मुलांच्या जीवनविश्वाचे दर्शन घडविणारा ‘चायना मोबाइल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2016 01:27 IST2016-01-06T01:27:43+5:302016-01-06T01:27:43+5:30
‘वर्तुळ आणि गल्ली या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमध्ये गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते आणि युवा दिग्दर्शक संतोष राम यांनी ‘चायना मोबाइल’ चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा केली

पौगंडावस्थेतील मुलांच्या जीवनविश्वाचे दर्शन घडविणारा ‘चायना मोबाइल’
‘वर्तुळ आणि गल्ली या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमध्ये गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते आणि युवा दिग्दर्शक संतोष राम यांनी ‘चायना मोबाइल’ चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा केली. पौगंडावस्थेतील मुलांच्या जीवनविश्वाचे दर्शन, तसेच मराठवाड्यातील दुष्काळाचे जीवनवास्तव पडद्यावर आणण्याचा प्रयत्न राम यांनी केला असून, पटकथाकार, दिग्दर्शक व निर्माता अशा तिहेरी भूमिकेमध्ये ते दिसणार आहेत. विशेष म्हणजे, फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय)च्या माजी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञ म्हणून जवाबदारी पेलली आहे.
या चित्रपटाविषयी संतोष राम सांगतात, ‘प्रेम, राजकारण आणि मैत्री या मानवी भावभावनांभोवती चित्रपटाची पटकथा विणलेली आहे. लघुपटानंतर गेल्या दोन वर्षांपासून चित्रपट काढण्याच्या प्रयत्नात होतो, पण विषय गवसला आणि दीड ते दोन वर्षांपासून त्यावर रीसर्च सुरू होते. दोन मित्रांची ही कथा असून, शहराकडे येण्याची ओढ, त्यातून आलेले जगणे , मुलीवर बसलेले प्रेम अशी चित्रपटाची गुंफण करण्यात आली आहे. तिच्यासाठी काही गोष्टी साध्य करण्याच्या प्रयत्नात ‘चायना मोबाइल’ त्यांच्या हातात पडतो.. त्यातून उद्भवणाऱ्या अडीअडचणींसह नशाखोरी आणि राजकारणावर तो प्रकाश टाकतो. ख्वाडा, फँड्रीच्या धर्तीवरचा हा एक मेलोड्रॅमिक चित्रपट आहे. लातूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये या चित्रपटाचे शूटिंग दि. २० जानेवारीपासून सुरू होणार असून, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये ‘चायना मोबाइल’ घेऊन जाण्याचा मानस आहे.’