‘आव्हानात्मक भूमिका साकारणे भावते ’
By Admin | Updated: June 11, 2017 03:07 IST2017-06-11T03:07:50+5:302017-06-11T03:07:50+5:30
‘तुमच्यासाठी काय पण...’ या डायलॉगमुळे छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेला अभिनेता संग्राम साळवी आता नव्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला आला आहे.

‘आव्हानात्मक भूमिका साकारणे भावते ’
- Suvarna Jain
‘तुमच्यासाठी काय पण...’ या डायलॉगमुळे छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेला अभिनेता संग्राम साळवी आता नव्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला आला आहे. कुलस्वामिनी या नव्या मालिकेतून संग्राम नव्या अंदाजात रसिकांसमोर आला आहे. या भूमिकेमुळे रसिकांना तिरस्कार वाटत असला तरी हेच भूमिकेचं यश असल्याचं संग्रामनं सांगितलं आहे. याच मालिकेच्या निमित्ताने संग्राम साळवीशी साधलेला हा संवाद....
एका मालिकेतील यशानंतर नवी मालिका, नवी भूमिका याविषयी जाणून घ्यायला आवडेल ?
- याअगोदरच्या मालिकेनं मला खरी ओळख मिळवून दिली. या मालिकेतील भूमिका माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. या भूमिकेनं मला सारं काही दिलं. रसिकांचं भरभरून प्रेम आणि ओळख या भूमिकेमुळेच मिळाली. या मालिकेतील ‘तुमच्यासाठी काय पण’ हा डायलॉगही चांगलाच हिट झाला होता. आता या मालिकेनंतर कुलस्वामिनी या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आलो आहे. देवयानी आणि या नव्या मालिकेतील भूमिका पूर्णपणे वेगळ्या आहेत. या मालिकेत राजस नावाची भूमिका साकारत आहे. राजस हा श्रीमंत घराण्यातील आहे. तो कुणालाही आदर देत नाही. इतकंच काय, तर आपल्या वडिलांशीही तो उद्धटपणे बोलतो, वागतो. राजसचं हे वागणं पाहून कुणालाही त्याचा तिरस्कार वाटेल. रसिकांनाही त्याचा प्रचंड राग येतो. त्यांची अशी प्रतिक्रिया म्हणजेच ही भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरते, असं म्हणावे लागेल. असाच वेगळा प्रयत्न करण्याचा माझा प्रयत्न होता. तसंच मला आव्हानात्मक भूमिका साकारायची होती. या मालिकेच्या एका सीनमध्ये मी वडिलांशी उद्धटपणे बोलतो. हा सीन पाहून अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. माझ्या आईलाही राजसचं वागणं काही आवडलं नव्हतं. मात्र, हेच माझ्या भूमिकेचं यश आहे, असं मला वाटतं. सोशल मीडियावरही रसिकांच्या या भूमिकेबाबत प्रतिक्रिया येत आहेत.
कलाकारांना एखादा सीन साकारताना कठीण प्रसंगांतून जावं लागतं. असाच तुझ्याबाबत अवघडलेला किंवा तुला भावुक करून गेलेला प्रसंग कोणता आहे?
- या मालिकेतील माझ्या भूमिकेला रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. ही भूमिका पाहून रसिक मला भेटण्यासाठी थेट साताऱ्यावरून येत असत. आताही असाच काहीसा वेगळा प्रयत्न मी केला आहे. मुळात कम्फर्ट सोडून आव्हानात्मक भूमिका साकारणं मला आवडतं. राजस या भूमिकेबाबतही हेच म्हणता येईल. या मालिकेतील एका सीनमध्ये म्हातारी बाई भेटायला येते. तिच्या हातात फोटो असतो. त्यावेळी तिला राजस उडवून लावतो. मात्र, हा सीन चित्रित झाल्यानंतर माझं मला वाईट वाटलं. मी त्या बाईंना जाऊन भेटलो. हा सीन होता; त्यामुळे असा वागावं लागल्याचं मी त्यांना सांगितलं.
या मालिकेतून छोटा पडदा गाजवल्यानंतर आता मोठ्या पडद्यावरही तू येणार आहेस, असं कळतंय, तर याविषयी काय सांगशील ?
- या मालिकेसोबत लवकरच मी नागेश भोसले यांच्या ‘संचार’ या सिनेमात भूमिका साकारत आहे. राजन खान यांच्या कादंबरीवर आधारित हा सिनेमा असेल. या सिनेमातील कथा ही गावातील गोष्ट असून त्यात मी सुधाकर नावाची भूमिका साकारणार आहे. ब्लॅक टाइप अशा प्रकारची कथा या सिनेमात रसिकांना पाहायला मिळेल. याशिवाय स्वप्ना वाघमारे यांच्या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमाचं नाव अजून ठरलेलं नाही.
नव्या मालिकेसह तुझ्या जीवनातील नवी इनिंग म्हणजेच वैवाहिक इनिंगही लवकरच सुरू होणार आहे, तर याबाबत काय सांगशील ?
- अभिनेत्री खुशबू तावडेसोबत मी लवकरच रेशीमगाठीत अडकणार आहे. नुकतंच आम्हा दोघांचा साखरपुडा पार पडला. हा साखरपुडा काही तरी वेगळ्या पद्धतीने करण्याचं खुशबूने ठरवलं होतं. त्यामुळे डोंबिवली-बदलापूरदरम्यान असलेल्या घरकुल या संस्थेत जाऊन आम्ही आमचा साखरपुडा केला. घरकुल संस्थेत गतिमंद व्यक्तींचा सांभाळ केला जातो. या संस्थेतील अशा ६०-६५ वयोगटातील व्यक्तींसह आम्ही आमचा साखरपुडा साजरा केला.
अशाच वेगळ्या आणि हटक्या पद्धतीने लग्न करण्याचाही आमचा मानस आहे. याच वर्षी आम्ही विवाहबंधनात अडकणार असून लग्नाची तारीख अजून ठरलेली नाही.
आगामी काळात तुला वेबसिरीज किंवा नाटकात काम करायला आवडेल का ?
- मला वेबसिरीजमध्ये काम करण्याची इच्छा आहे. मध्यंतरी वेबसिरीजमध्ये कामाची आॅफर आली होती. मात्र काही कारणांमुळे ती करता आली नाही. याशिवाय शॉर्टफिल्ममध्येही काम केलं आहे. खुशबू तावडेसोबत ‘सांजबहर’ नावाची शॉर्टफिल्म केली आहे. चंद्रशेखर गोखले यांनी ही शॉर्टफिल्म लिहीली होती. याशिवाय आगामी काळात नाटकात काम करण्याचीही इच्छा आहे. एखाद्या नाटकात चांगली भूमिका मिळाल्यास काम करायला नक्की आवडेल.