लग्नानंतरही ‘करिअर’ सुसाट
By Admin | Updated: September 9, 2015 05:00 IST2015-09-09T05:00:24+5:302015-09-09T05:00:24+5:30
चित्रपट, मग ते बॉलिवूड असो किंवा मराठी... तो पाहण्याचा दृष्टिकोन काय असतो? तर विषय, आशयघनता, सादरीकरण, मांडणी, तंत्रज्ञानाचा वापर, छायाचित्रण अशा अनेक

लग्नानंतरही ‘करिअर’ सुसाट
- मृण्मयी मराठे
चित्रपट, मग ते बॉलिवूड असो किंवा मराठी... तो पाहण्याचा दृष्टिकोन काय असतो? तर विषय, आशयघनता, सादरीकरण, मांडणी, तंत्रज्ञानाचा वापर, छायाचित्रण अशा अनेक गोष्टींमुळे तो चित्रपट अपील होतो. अशा स्वरूपाची अनेक उत्तरं प्रेक्षकांकडून ऐकायला मिळतात. पण, ही झाली थोडीफार ‘क्लासी’ उत्तरं! मात्र जो खरा चाहता असेल, तो नक्कीच सांगेल की, चित्रपटाला आम्ही हजेरी लावतो ते अभिनेता किंवा अभिनेत्रींसाठी. हेही तितकंच प्रांजळ उत्तर म्हणावं लागेल. या ‘फॅन्स’मुळेच चित्रपट यशस्वितेची शिखरं गाठू शकतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही; परंतु एकमात्र खरं आहे की, अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींच्या फॅन्स फॉलोअर्सची संख्याही अधिक आहे.
आता हेच पाहा ना, बॉलिवूडमध्ये अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील जुही चावला, माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, ऐश्वर्या राय-बच्चन या सेलिब्रिटींची नावे घेता येतील. आता तुम्ही म्हणाल आत्ताच्या लेटेस्ट-फ्रेश लूकच्या अभिनेत्रीही कितीतरी आहेत, ज्यांचे चित्रपट गाजलेले असूनही या अभिनेत्रींची नावे न घेता, याच अभिनेत्रींचा उल्लेख का करावासा वाटला? तर त्यामागेही एक कारण आहे. या सर्व अभिनेत्रींचे ‘शुभमंगल’ झालेले आहे, हेच त्यातील ‘गमक’ आहे. लग्नानंतर त्यातील काही जणींनी चित्रपटात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला खरा, म्हणजे माधुरीने ‘आजा नचले’मधून कमबॅक केले. पण, तिला प्रेक्षकांनी स्वीकारले नाही. जुही चावलाने तर मुख्य भूमिकेत पडद्यावर येण्याची रिस्कच घेतली नाही. ती ‘पहेली’मध्ये सहायक अभिनेत्री म्हणूनच आली. शिल्पा तर चित्रपटाच्या फंदातच पडली नाही. एखाद्या रिअॅलिटी शोची परीक्षक होण्यातच तिने धन्यता मानली. थोडक्यात काय तर बॉलिवूडमधील लग्न झालेल्या अभिनेत्रींना प्रेक्षकांनी तितकेसे आपलेसे केले नाही. याउलट मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जरा वेगळा ‘टे्रंड’ रुजला आहे. बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींना लग्नानंतर मुख्य भूमिका कधी मिळाल्या नाहीत. पण, मराठीमधल्या अभिनेत्रींसाठी ‘लग्न’ म्हणजे, खऱ्या अर्थाने करिअरच्या झगमगाटाचे रूपेरी सोनपाऊल ठरले.
सई ताम्हणकरचे नशीब लग्नानंतर खऱ्या अर्थाने फळफळल्याचे दिसते. ‘पोर बाजार’, ‘गुरुपौर्णिमा’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ आणि ‘क्लासमेट्स’सारख्या चित्रपटांमधून तिला मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. तेजस्विनी पंडितच्या ‘कँडल मार्च’, एक तारा’ या चित्रपटांमधील ग्लॅमरस भूमिकांनासुद्धा प्रेक्षकांनी पसंती दिली. प्रिया बापटच्या ‘हॅपी जर्नी’ आणि ‘टाइमप्लीज’लाही प्रेक्षकांनी उचलून धरले. तर, ऊर्मिला कानिटकर-कोठारे हिने ‘अनवट’, ‘बावरे प्रेम हे’ आणि ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ असे तीन यशस्वी चित्रपट दिले. या यादीत प्रिया मराठे, अमृता खानविलकर यांच्यासह दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, गायिका अशी बरीच नावे जोडता येतील. एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते हे तर सुपरिचित आहेच... पण या अभिनेत्रींचा विचार केला, तर त्यांच्या यशामध्ये त्यांच्या नवऱ्याचादेखील तितकाच वाटा आहे, त्यांच्या प्रोत्साहन आणि पाठिंब्याशिवाय त्या काहीच करू शकल्या नसत्या... काय बरोबर ना!
माझी बोल्ड आणि ब्युटीफूल प्रतिमासुद्धा याला कारणीभूत आहे. सुदैवाने लग्नानंतरही मी कोणते कपडे घालावेत, कोणत्या भूमिका निवडाव्यात याचे माझ्यावर बंधन नाही. माझ्या कामाला मी प्राधान्य देते. मला समजूतदार सासू-सासरे आणि नवरा मिळाला, हे माझं भाग्य आहे.
- सई ताम्हणकर, अभिनेत्री
मला वाटतं तुमचं लग्न झालं आहे किंवा नाही यापेक्षा अधिक तुमचं काम आणि मेहनत जास्त मॅटर करते, मला तर प्रामाणिकपणे वाटतं की लग्नानंतर माझ्या करिअरची अधिक भरभराट झाली आहे.
- प्रिया बापट, अभिनेत्री