‘सिंगल स्क्रीन’साठी वॉर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 21:05 IST2016-09-28T15:12:25+5:302016-09-28T21:05:10+5:30
सतीश डोंगरे शंभर वर्ष पूर्ण झालेल्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चित्रपटाचे यश आजही आकड्यांवरूनच ठरविले जाते. वर्षातील ५२ आठवड्यात सुमारे ...

‘सिंगल स्क्रीन’साठी वॉर
शंभर वर्ष पूर्ण झालेल्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चित्रपटाचे यश आजही आकड्यांवरूनच ठरविले जाते. वर्षातील ५२ आठवड्यात सुमारे २५० हिंदी चित्रपट रिलिज केले जात असल्यानेच कदाचित आकड्यांचा खेळ अधिक तीव्र झाला आहे. त्यातही एकाच आठवड्यात दोनपेक्षा अधिक चित्रपट रिलिज केल्यास त्यांच्यातील कमाईची स्पर्धा चांगलीच चिघळते. त्यासाठी वाटेल ते प्रयत्न निर्मात्यांकडून केले जाते. या वॉरमध्ये सगळ्यात प्रभावी अस्त्र हे सिंगल स्क्रीन असून, ते मिळवण्यासाठी आजही निर्माते धडपड करताना बघावयास मिळतात.
त्यातही जेव्हा दोन बड्या बॅनरचे चित्रपट एकाचवेळी रिलिज होतात, तेव्हा डिस्ट्रिब्युटर आणि आयोजकांमध्ये लॉबिंग सुरू होते. या दिवाळीला याचा प्रत्यय येण्याची शक्यता आहे. कारण रिलिजपूर्वीच वादाच्या भोवºयात अडकलेले करण जोहर यांचा ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि अजय देवगण याचा ‘शिवाय’ हे चित्रपट आपसात भिडणार आहेत. दोन्ही चित्रपट बड्या बॅनरचे असल्याने दोघांमध्ये जोरदार टक्कर होण्याची शक्यता आहे. सध्या या चित्रपटाच्या यश-अपयशावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. वास्तविक भारतात फिल्म डिस्ट्रिब्युशन विविध क्षेत्रांत विभागले आहे. मुंबई क्षेत्रात ३५ ते ४० टक्के चित्रपटाची कमाई होते. दिल्ली क्षेत्रात १८ ते २०, तर राजस्थानमध्ये १६ टक्के कमाई अपेक्षित असते. पंजाबमध्ये १० टक्के, पश्चिमेमधून १२ ते १४, तर दक्षिणेतून १० ते १२ टक्के हिंदी चित्रपट कमाई करतात. भारतात जवळपास ७५० मल्टिप्लेक्स थिएटर आहेत. ज्यात विविध प्रकारचे चित्रपट प्रदर्शित होतात. ज्यात ३००० हजार सिंगल स्क्रीन असून, त्यावर कब्जा मिळवण्यासाठी डिस्ट्रिब्युटर्समध्ये जोरदार वॉर सुरू असतो. ज्याला ‘स्क्रीन वॉर’ असे म्हटले जाते.
हा वॉर आपल्याला २०१२ मध्ये बघावयास मिळाला. जेव्हा यशराजचा ‘जब तक है जान’ आणि ‘सन आॅफ सरदार’ हे चित्रपट एकाच दिवशी रिलिज करण्यात आले होते. त्यावेळी ‘जब तक है जान’च्या रिलिजपूर्वीच सर्व सिंगल स्क्रीन बुक केले होते. त्यामुळे सन आॅफ सरदारला खूपच कमी सिंगल स्क्रीन थिएटर मिळाले होते. त्यावेळी अजय देवगण याने याचा जाहीरपणे विरोधही केला होता.
पुढे हा वॉर शाहरूखच्या २०१३ मध्ये आलेल्या चेन्नई एक्स्प्रेस आणि बालाजी फिल्मच्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ या चित्रपटांच्यावेळी बघावयास मिळाला. या दोन्ही चित्रपटांच्या रिलिजमध्ये जरी एक आठवड्याचे अंतर ठेवण्यात आले असले, तरी चेन्नई एक्स्प्रेसने दुसºया हप्त्याचेही सिंगल स्क्रीन बुक केले होते. त्यामुळे वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा या चित्रपटाला स्क्रीन मिळाले नाहीत.
२०१४ मध्येदेखील अशाचप्रकारचा वॉर बघावयास मिळाला. विशाल भारद्वाज यांच्या ‘हैदर’साठी अगोदरच सर्व सिंगल स्क्रीन बुक करण्यात आले होते. त्यामुळे ऋतिक रोशन याच्या ‘बॅँग बॅँग’ चित्रपटाला चांगलाच तोटा सहन करावा लागला.
संजय लीला भंसाली यांनी तर या वॉरमध्ये चांगलीच आघाडी घेतली होती. जेव्हा बाजीराव मस्तानी आणि शाहरूखच्या दिलवाले या चित्रपटांमध्ये सिंगल स्क्रीनवरून वाद सुरू होता, तेव्हा संजय लीला भंसाली यांनी एकाच वेळी ‘बजरंगी भाईजान, वेलकम बॅक आणि बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांसाठी सिंगल स्क्रीनवाल्यांशी डील केली होती. अर्थात ही डील पुढे वादात सापडली. कारण सर्वच स्तरातून त्यास विरोध दर्शविण्यात आला होता. काहींनी तर थेट कोर्टात धाव घेतली होती. पुढे ही डील रद्द करण्यात आली.
असाच समझोता नुकताच रिलिज झालेल्या ऋतिक रोशन याच्या मोहनजोदारो आणि रुस्तम या चित्रपटाच्या वेळी झाला होता. जेव्हा मोहनजोदारोसाठी जास्त स्क्रीन दिले गेले तेव्हा थिएटर मालकांना त्याचा चांगलाच फटका सोसावा लागला. यावर रुस्तमचे निर्माता नीरज पांडे यांनी अतिशय खोचक प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, जास्त स्क्रीन चित्रपटाच्या यशाचे गमक ठरू शकत नाही. चित्रपटाचा आशय आणि कथा प्रेक्षकांना भावणारी असायला हवी.