विनोद खन्ना यांची शेवटची ही इच्छा राहिली अपूर्ण, या ठिकाणी जाण्याची होती त्यांची तीव्र इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 14:01 IST2025-10-06T14:00:23+5:302025-10-06T14:01:00+5:30
Vinod Khanna : विनोद खन्ना आज आपल्यात नसले तरी त्यांच्याबद्दलच्या आठवणी आणि किस्से आजही ताजे आहेत.

विनोद खन्ना यांची शेवटची ही इच्छा राहिली अपूर्ण, या ठिकाणी जाण्याची होती त्यांची तीव्र इच्छा
हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) यांचा स्टारडम खास आणि वेगळा होता. एकेकाळी अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही अधिक दबदबा असलेले विनोद खन्ना आज आपल्यात नसले तरी त्यांच्याबद्दलच्या आठवणी आणि किस्से आजही ताजे आहेत. ६ ऑक्टोबर म्हणजेच आज विनोद खन्ना यांची जयंती आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला अभिनेत्याच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगणार आहोत. दुर्दैवाने, विनोद खन्ना यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकले नाही.
देखणे व्यक्तिमत्त्वासाठी विनोद खन्ना ओळखले जायचे. खलनायक म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारे विनोद खन्ना यांनी पडद्यावर नायक म्हणूनही दीर्घकाळ राज्य केले. सुपरस्टारचा दर्जा आणि प्रसिद्धी त्यांच्याकडे भरपूर होती, पण तरीही त्यांना नेहमी वाटायचं की त्यांना पाकिस्तानला जाण्याची संधी कधी मिळेल. खरेतर, ६ ऑक्टोबर १९४६ रोजी विनोद खन्ना यांचा जन्म पाकिस्तानमधील पेशावर येथे झाला होता. मात्र, फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात राहिले. या कारणामुळे विनोद खन्ना यांचे वडिलोपार्जित घर कायमचे सुटले.
विनोद खन्नांना जायचं होतं पाकिस्तानला
२०१४ मध्ये खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सांस्कृतिक वारसा परिषदेचे सरचिटणीस शकील वहीदुल्लाह यांच्याशी झालेल्या भेटीत विनोद खन्ना यांनी आपल्या या इच्छेबद्दल मनमोकळेपणाने सांगितले होते. अभिनेत्याने सांगितले होते की, त्यांना एकदा पाकिस्तानला जाऊन आपलं पुश्तैनी घर बघायचं होतं. मात्र, त्यांची ही शेवटची इच्छा नेहमीसाठी अपूर्ण राहिली. केवळ विनोद खन्नाच नव्हे, तर मनोज कुमार, देव आनंद आणि दिलीप कुमार यांसारखे अनेक बॉलिवूड सुपरस्टार्सही पाकिस्तानशी संबंध ठेवून होते.
विनोद खन्ना यांचे गाजलेले चित्रपट
१९६८ साली रिलीज झालेल्या 'मन के मीत' या चित्रपटातून विनोद खन्ना यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांतून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. मेरा गांव मेरा देश, हेरा फेरी, अमर अकबर एंथोनी, मुकद्दर का सिकंदर, परवरिश, कुर्बानी, चांदनी, दबंग हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. २७ एप्रिल, २०१७ रोजी मूत्राशयाच्या कर्करोगामुळे विनोद खन्ना यांचे निधन झाले. पण एक अभिनेता म्हणून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपला एक खास वारसा मागे ठेवला आहे.