‘बायोपिकचा प्रवास होता खडतर’-अर्जुन रामपाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 19:19 IST2017-09-08T13:49:36+5:302017-09-08T19:19:36+5:30
शमा भगत बॉलिवूडमध्ये वर्चस्व निर्माण करायचे असेल तर केवळ गुड लुक्स असून फायदा नाही तर अभिनयदेखील तितक्याच ताकदीचा असायला ...

‘बायोपिकचा प्रवास होता खडतर’-अर्जुन रामपाल
बॉलिवूडमध्ये वर्चस्व निर्माण करायचे असेल तर केवळ गुड लुक्स असून फायदा नाही तर अभिनयदेखील तितक्याच ताकदीचा असायला हवा. अभिनय-गुड लुक्स यांच्या आधारे कलाकार यशाच्या एकेक पायऱ्या सर करत जातो. अभिनेता अर्जुन रामपाल याचाही प्रवास काहीसा तसाच. ‘ओम शांती ओम’,‘कहानी २’,‘राजनीती’ आणि ‘रॉक आॅन’ यासारख्या चित्रपटांमध्ये त्याने त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला. गत १५ वर्षांपासून त्याने बॉलिवूडमध्ये उत्कृष्ट अभिनयासह चित्रपट साकारले. सध्या तो ‘डॅडी’ या बायोपिकमुळे चर्चेत असून याविषयी आणि एकंदरितच आत्तापर्यंतच्या त्याच्या प्रवासाविषयी मारलेल्या या गप्पा...
* निर्माता म्हणून तुझा हा पहिलाच चित्रपट. काय वाटतं प्रेक्षकांच्या प्रतिसादाविषयी?
- ‘डॅडी’ हा केवळ चित्रपट नसून गँगस्टर अरूण गवळी यांच्या संपूर्ण जीवनावर आधारित बायोपिक आहे. ‘डॅडी’ची जर्नी काही सोपी नव्हती. साचेबद्ध चित्रपट जसा असतो, तसा हा बिल्कुल नाही. मी स्वत: यावर ३ महिने काम के ले आहे. फक्त चित्रपटाची निर्मिती करणं आणि प्रेक्षकांसमोर बायोपिक ठेवणं इतकी ती सोपी गोष्ट नक्कीच नव्हती.
* अरूण गवळी यांच्यावर चित्रपट बनवावा, असे का वाटले?
- खरंतर, अरूण गवळी यांचा रोल मला आॅफर झाला, तेव्हा स्क्रिप्टवर विशेष काम झालेले नव्हते. मला केवळ चित्रपट करायचा म्हणून बनवायचा नव्हता. मग मी सखोल अभ्यास करण्यासाठी स्क्रिप्टवर काम करायला सुरूवात केली. अरूण गवळी यांच्या नजीकच्या लोकांना भेटू लागलो. आम्हाला त्याची कौटुंबिक परिस्थिती, पोलिसांचे दृष्टीकोन आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी संपर्क करणं गरजेचं होतं. अशाप्रकारे ‘डॅडी’ ला सुरूवात झाली आणि तसाच अभ्यासपूर्ण शेवटही.
* अरूण गवळींच्या आयुष्याविषयी तुला नेमकं काय प्रेक्षकांना दाखवायचं आहे?
- अरूण गवळी यांच्या जीवनावर आधारित ही बायोपिक असून त्यांच्या आयुष्यातील सर्व सत्य घटना मला लोकांसमोर आणायच्या होत्या. गवळींनी त्यांच्या आयुष्यात अशा काही गोष्टी केल्या ज्या त्यांना स्वत:हून देखील आवडल्या नाहीत. त्याच्या कुटुंबियांनी हालअपेष्टा सहन कराव्यात, असे त्यांना कधीच वाटले नव्हते. त्यांचं खरं आयुष्य मला पडद्यावर साकारायचं होतं, हाच एकमेव उद्देश माझ्या डोळयासमोर होता.
* अरूण गवळींसारखं दिसण्यासाठी तुला वजन घटवावं लागलं का?
- गँगस्टर अरूण गवळी यांच्यासारखं हुबेहूब दिसण्यासाठी मला वजन घटवावं लागणार होतं. सुरूवातीला मी ११ ते १२ किलो वजन घटवलं. त्यानंतर मी जीममध्ये जाणं बंद के लं. कारण अरूण गवळी कधीही जीममध्ये जात नव्हते. चित्रपटाचा दुसरा भाग शूट करण्यासाठी मला वजन वाढवावं लागणार होतं. मग मी भरपूर कार्बाेहायड्रेट्स खायला सुरूवात केली. तब्बल ८ किलोंनी माझं वजन वाढवलं.
* इंडस्ट्रीत तुला १५ वर्षं झाली. कसं वाटतंय मागे वळून पाहताना?
- मोजक्याच पण चांगल्या भूमिका साकारणं हाच पहिल्यापासून माझा उद्देश राहिलेला आहे. यश संपादन करणं आणि ते टिकवणं हे सर्वस्वी नशीब आणि कष्टावर अवलंबून असतं. या मार्गात टिकाकारही खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या टीकेमुळे आपल्या कामात सुधारणा होते, कधीकधी ते त्रासदायकही ठरतं. मला असं वाटतं की, मी जे संपादन करायचं ठरवलं होतं ते मिळवलं आहे.